![]() |
| शिवाजी विद्यापीठात पूर व्यवस्थापनविषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. वेंकटेश मेरवाडे. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. अभिलाष आर. आणि आशिष दोशी. |
कोल्हापूर, दि.
२ जुलै: पूर ही नैसर्गिक आपत्ती असली तरी आधुनिक तंत्रज्ञान, अचूक
पूर मॉडेलिंग आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून त्याचे परिणाम मोठ्या
प्रमाणात कमी करता येऊ शकतात. समाज आणि समुदाय सुरक्षित ठेवण्यासाठी पूर
व्यवस्थापन क्षेत्रात कौशल्य, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील जलसंपदा
व पूर मॉडेलिंग तज्ज्ञ डॉ. वेंकटेश मेरवाडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात भूगोल अधिविभाग,
सेंटर फॉर क्लायमॅट चेंज अँड सस्टेनॅबिलीटी स्टडीज आणि अॅक्वास्फिअर क्लब यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित पूर व्यवस्थापन व पूर मॉडेलिंग विषयावरील कार्यशाळेच्या
उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रकाश राऊत होते.
डॉ. मेरवाडे म्हणाले, काही
दिवसांपूर्वी राज्यात पावसाअभावी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता
होती. मात्र, दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पूरस्थितीही
उद्भवू शकते. पूर कोणालाही अपेक्षित नसला तरी तो वास्तव आहे. त्यामुळे अशा
आपत्तींचा अभ्यास करून त्यासाठी सक्षम नियोजन करणे ही काळाची गरज आहे. समाज
सुरक्षित ठेवण्यासाठी पूर व्यवस्थापन क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे
आवश्यक असून, त्यासाठी अचूक पूर मॉडेलिंग, भौगोलिक
माहिती प्रणाली (GIS), आधुनिक संगणकीय तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित
तज्ज्ञांची आवश्यकता आहे. पूर व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रिया अधिक परिणामकारक
करण्यासाठी एक-आयामी (1D) आणि द्वि-आयामी (2D) पूर
मॉडेलिंग तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत सहभागी संशोधक, विद्यार्थी
आणि विविध संस्थांमधून आलेल्या प्रतिनिधींना 1D व 2D पूर
मॉडेलिंगविषयी सखोल माहिती देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून, कार्यशाळेतील
प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि चर्चांमधून सहभागींची संशोधन क्षमता अधिक विकसित होईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश राऊत
यांनी पूर व्यवस्थापनासाठी आधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पूर मॉडेलिंगचे महत्त्व
अधोरेखित केले. कोल्हापूर शहराला दर दोन-तीन वर्षांनी मोठ्या पुरांचा सामना करावा
लागत असल्याने पूरपूर्व नियोजनासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक
असल्याचे त्यांनी सांगितले. पूर मॉडेलिंगमध्ये भूभागाची उंची (Elevation),
उतार (Slope), नदीपासूनचे अंतर, मातीचा
प्रकार, जमिनीचा वापर, पर्जन्यमान, जलप्रवाह
आणि नदी जाळे यांसारख्या घटकांचा अचूक अभ्यास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट
केले. शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाने GIS प्रयोगशाळा, GIS पदव्युत्तर
पदविका अभ्यासक्रम तसेच अत्याधुनिक माहिती संच (डेटा) विकसित करून या क्षेत्रात
भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. ArcGIS,
QGIS आणि HEC-RAS यांसारख्या
आधुनिक साधनांच्या साहाय्याने पूर मॉडेलिंग अधिक परिणामकारक होत असून, या
कार्यशाळेमुळे महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी, संशोधक
आणि तज्ज्ञांना पूर व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळेल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंचावर बेळगावच्या नॅशनल
इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. अभिलाष आर. आणि सिग्मा इन्फ्राप्लॅन
इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे आशिष दोशी उपस्थित होते. भूगोल
अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी स्वागत केले. प्रशांत पाटील यांनी
परिचय करून दिला, तर आशिष दोशी यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment