आपण सारेच क्वांटम विश्वाचे रहिवासी: पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा. समोर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
![]() |
| अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. एच.सी. वर्मा, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे. |
कोल्हापूर, दि. ९
जुलै: संपूर्ण विश्व हे प्रचलित शास्त्रीय (क्लासिकल)
नियमांपेक्षा पुंज भौतिकीय (क्वांटम) नियमांवर चालते. प्रकाशाचे
वर्तन, अणूंची रचना, चुंबकत्व, विद्युतवाहकता, अर्धसंवाहक, अणुऊर्जा,
सूर्याची ऊर्जा आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान यामागे क्वांटम
भौतिकशास्त्र कार्यरत आहे. त्यामुळे क्वांटम भौतिकशास्त्र केवळ प्रयोगशाळेतील विषय
नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारसंधींची निर्मिती होणार आहे. आपण सारेच क्वांटम विश्वात जगत आहोत, असे
प्रतिपादन पदार्थविज्ञानाचे ज्येष्ठ संशोधक, शिक्षक आणि आयआयटी
कानपूरचे प्राध्यापक पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा
भौतिकशास्त्र विभाग आणि दि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्स यांच्या संयुक्त
विद्यमाने विद्यापीठात आज डॉ. वर्मा यांचे "क्वांटम भौतिकशास्त्र आणि
भौतिकशास्त्रातील रोजगार संधी" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत
अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे
प्रमुख उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. एच.
सी. वर्मा यांनी विद्यार्थ्यांना क्वांटम भौतिकशास्त्राची संकल्पना अत्यंत सोप्या
उदाहरणांतून समजावून सांगितली. त्यांनी आपल्या विद्यार्थीजीवनातील आयआयटी
कानपूरमधील अनुभव, संशोधनातील संघर्ष, संगणक प्रोग्रामिंगची सुरुवात आणि विज्ञानातील जिज्ञासेचे महत्त्व यांचीही
प्रेरणादायी मांडणी केली.
डॉ. वर्मा म्हणाले, न्यूटनचे नियम, गुरुत्वाकर्षण,
विद्युतचुंबकत्व किंवा ऊष्मागतिकीचे नियम अनेक घटना स्पष्ट करतात;
मात्र तांबे वीज का वाहून नेतो, प्लास्टिक
विद्युतरोधक का असते, लोखंडच चुंबकीय का असते किंवा काच
पारदर्शक आणि पारा अपारदर्शक का असतो, याचे उत्तर केवळ पारंपरिक
शास्त्रीय (क्लासिक) भौतिकशास्त्र देऊ शकत नाही. या सर्व घटनांचे स्पष्टीकरण
क्वांटम भौतिकशास्त्रामध्ये मिळते. क्वांटम भौतिकशास्त्रातील ऊर्जा क्वांटीकरण,
वेव्ह-पार्टिकल द्वैधस्वरूप, अनिश्चितता,
क्वांटम टनेलिंग, सुपरपोझिशन यांसारख्या
संकल्पना त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या.
अणुभट्टीतील अणुभंजन, सूर्याच्या केंद्रातील अणुसंम्मीलन,
स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप आणि आधुनिक सेमीकंडक्टर तंत्रज्ञान
ही क्वांटम सिद्धांताची यशस्वी उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, भौतिकशास्त्रातील
पदव्युत्तर शिक्षणानंतर केवळ अध्यापन किंवा संशोधन हेच पर्याय उपलब्ध नसतात. भारत
सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनअंतर्गत देशात क्वांटम संगणन, क्वांटम माहितीशास्त्र, क्वांटम संप्रेषण आणि
क्वांटम सुरक्षा या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून आगामी काळात
मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. या मिशनसाठी केंद्र सरकारने सुमारे सहा
हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून विविध आयआयटी, संशोधन
संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होणार
असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, इस्रो, सीएसआयआर, भाभा अणुसंधान केंद्र, भौतिकी
संशोधन प्रयोगशाळा, प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट, यांसह विविध राष्ट्रीय
प्रयोगशाळा, वैज्ञानिक संस्था, डेटा विश्लेषण,
कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान व्यवस्थापन,
संशोधन प्रशासन तसेच उद्योग क्षेत्रात भौतिकशास्त्राच्या
विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विज्ञान
शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित होत असल्यामुळे उद्योगक्षेत्र
त्यांना प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘वेतनापेक्षा
योगदानाचा विचार महत्त्वाचा’
मोठ्या वेतनाच्या
तुलनेत स्वतःच्या क्षमतेचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा विचार करा. देशाच्या
वैज्ञानिक प्रगतीसाठी सक्षम शिक्षक, संशोधक
आणि वैज्ञानिक तयार होणे ही काळाची गरज आहे, असे सांगतानाच त्यांनी
विद्यार्थ्यांनी विज्ञानातील करिअरकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवर्जून सांगितले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी क्वांटम
भौतिकशास्त्रातील विविध संकल्पना, संशोधन आणि करिअरच्या
संधींबाबत प्रश्न विचारले. डॉ. वर्मा यांनी त्यांची सविस्तर आणि सोप्या भाषेत
उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी भौतिकशास्त्र हे सर्व आधुनिक विज्ञान व
तंत्रज्ञानाचा पाया असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, एज कॉम्प्युटिंग
आणि उच्च कार्यक्षम संगणन (High Performance Computing) यांसारख्या
आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी क्वांटम भौतिकशास्त्र असून, भविष्यातील वैज्ञानिक क्रांतीचे नेतृत्व हे याच क्षेत्रातून होणार आहे. मूलभूत
विज्ञान आणि उपयोजित विज्ञान यांतील दरी भरून काढल्याशिवाय देशाचा वैज्ञानिक विकास
अशक्य असून विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी
केले. पद्मश्री डॉ. वर्मा यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील
नवीन दिशा आणि करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळेल, असा
विश्वास व्यक्त केला.
यावेळी भौतिकशास्त्र
अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही
मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मानसिंग टाकळे यांनी स्वागत,
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नीलेश तरवाळ यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिविभाग प्रमुख, महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठातील विज्ञानाचे विद्यार्थी, विविध महाविद्यालयांसह
शहरातील शालेय विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय होती.





No comments:
Post a Comment