Wednesday, 7 February 2018

गुणवत्ताधारित उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रयत्न आवश्यक: डॉ. आर. एस.माळी

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. आर.एस. माळी, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. विद्याधर खंडागळे, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. मुरली भानारकर, डॉ. कविता ओझा.



Dr. R.S. Mali
कोल्हापूर, दि. ७ फेब्रुवारी: सद्यस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत महत्वाचे असून सर्वच शैक्षणिक संस्थांनी गुणवत्ताधारित शिक्षणावर भर देणे आणि त्यासाठी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. आर. एस.माळी यांनी केले. शिवाजी विद्यापीठात रविवारी (दि. ४) आयोजित आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उच्च शिक्षणात जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम व सुधारणा या विषयावर प्रा. माळी बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग, माहिती तंत्रज्ञान अधिविभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण हे एक महत्त्वाचे आव्हान आहे, पण ही बाब अवघड नाही. मात्र त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्वच घटकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
त्यानंतर प्रथम सत्रात डॉ. मोहन गौतम म्हणालेउच्च शिक्षणात युरोपियन व इतर राष्ट्रांमध्ये अभ्यासक्रमात सांस्कृतिक एकीकरणाच्या भूमिकेतून बहुविध सांस्कृतिकता टिकविली जात असलेचे सांगितले. सत्राध्यक्ष म्हणून प्रा. डॉ.भारती पाटील यांनी काम पाहिले.
लंडन विद्यापीठातील डॉ. सुभेन्द्र डोईफोडे यांनी परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर व प्रभाव वाढवायला हवा. त्यासाठी भारतीय उच्च शिक्षणात आवश्यक ते बदल होण्याच्या दृष्टीने विचारमंथन होऊन तातडीने कृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रा. डॉ. ए.एम.गुरव सत्राध्यक्ष होते.
यावेळी परिषदेच्या समन्वयक डॉ. प्रतिभा पाटणकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर.के. कामत यांनी परिषदेचे महत्त्व सांगितले. यावेळी आयोजन समितीतील डॉ. मुरली भानारकर, डॉ. कविता ओझा, डॉ. विद्याधर खंडागळे यांच्यासह अन्य सदस्य, विद्यार्थी, संशोधक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी संशोधक, विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले.

Thursday, 1 February 2018

उच्चशिक्षण गुणवत्ता व संशोधनाला चालना देणारा अर्थसंकल्प: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे




कोल्हापूर, दि. १ फेब्रुवारी: सन २०१८-१९चा केंद्रीय अर्थसंकल्प हा उच्चशिक्षण गुणवत्ता व संशोधनाला चालना देणारा आहे. अर्थसंकल्पातील राईज बाय २०२२ (रिव्हायटलाइझिंग इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड सिस्टीम्स इन एज्युकेशन) आणि पीएमआरएफ (प्राईम मिनिस्टर्स रिसर्च फेलोज्) या दोन अभिनव बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे की, ब्लॅकबोर्ड टू डिजीटल बोर्ड पद्धतीने उच्चशिक्षणातील गुणवत्तेच्या जोपासनेचे लक्ष्य अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. त्यामधून संशोधन व तद्अनुषंगिक पायाभूत सुविधा विकासासाठी राईज बाय २०२२ ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. याअंतर्गत पुढील चार वर्षांत सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच, पंतप्रधान संशोधन फेलो (पीएमआरएफ) प्रकल्पांतर्गत दरवर्षी देशातील आघाडीच्या संस्थांमधून बी.टेक. झालेले एक हजार विद्यार्थी निवडून त्यांना आयआयटी व आयआयएस्सीसारख्या संस्थांमधून पीएच.डी. करण्यासाठी फेलोशीप देण्यात येईल. या संशोधकांनी संबंधित संस्थांमध्ये दर आठवड्याला किमान काही तास अध्यापन करणे अपेक्षित आहे. प्लॅनिंग व आर्किटेक्चरसाठी दोन पूर्णकालिक संस्थांची उभारणी आणि त्याच धर्तीवर आयआयटी व एनआयआयआयटीमध्ये १८ स्वायत्त संस्थांची उभारणी करण्याचा उपक्रमही महत्त्वाचा आहे. इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स या योजनेला या आधीच सुरवात करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे दाखल झालेल्या एकूण शंभर प्रस्तावांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. ही योजनाही उच्चशिक्षण गुणवत्ता व पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्याखेरीज, वडोदरा येथे स्वतंत्र रेल्वे विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा सुद्धा अभिनव स्वरुपाची आहे. असेही डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे.

रसायनशास्त्राच्या विविध शाखांत समन्वयातून

आधुनिक संशोधनाला प्रोत्साहनाची गरज: प्रा. देऑन शॉन


शिवाजी विद्यापीठात 'अॅडव्हान्सेस इन केमिकल सायन्सेस' या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, प्रा. अनिल घुले, रिलायन्सचे डॉ. संजीव कट्टी, कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, दक्षिण कोरियाचे प्रा. देऑन शॉन व रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. जी.एस. गोकावी.
कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे

प्रा. देऑन शॉन

विद्यापीठात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

कोल्हापूर, दि. १ फेब्रुवारी: जागतिक स्तरावर रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये समन्वय निर्माण करून आधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्याची निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन दक्षिण कोरियातील हॅनयांग विद्यापीठातील वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ प्रा. देऑन शॉन यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठात आज अॅडव्हान्सेस इन केमिकल सायन्सेस या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला. या उद्घाटन समारंभात प्रा. शॉन बोलत होते. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रा. देऑन शॉन
प्रा. शॉन म्हणाले, आयुष्याची सर्व क्षेत्रे रसायनशास्त्राने व्यापलेली आहेत. या पार्श्वभूमीवर रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये अनेकविध आधुनिक संशोधन सुरू आहे. या संशोधनाची व्याप्ती वाढविण्यासाठी या सर्व शाखांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने या आंतरराष्ट्रीय परिषदेला मोठे महत्त्व आहे.
शिवाजी विद्यापीठ आणि हॅनयांग विद्यापीठ यांच्यात गेल्या पंधरा वर्षांपासून अत्यंत दृढ स्वरुपाचे संशोधकीय व शैक्षणिक संबंध प्रस्थापित झाले असल्याचे सांगून प्रा. शॉन म्हणाले, उभय विद्यापीठांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांतर्गत जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे संशोधन करणे शक्य झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील प्रा. सी.डी. लोखंडे, प्रा. एस.आर. पाटील, प्रा. विजय फुलारी, प्रा. एस.एस. कोळेकर या संशोधकांनी विविध प्रकारचे आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प हॅनयांग विद्यापीठाच्या सहकार्याने राबविले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन विद्यार्थी व सध्या नांदेड विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. आर.एस. माने पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी हॅनयांग विद्यापीठात आले असताना त्यांनी त्या कालावधीत शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले, हा हॅनयांग विद्यापीठाच्या इतिहासातील विक्रम आहे. आजही ते या विद्यापीठाशी संयुक्त प्रकल्पाद्वारे जोडलेले आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. संजीव कट्टी
रिलायन्स उद्योग समूहाच्या संशोधन व विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.संजीव कट्टी म्हणाले, हरित रसायनशास्त्र आणि हरित अभियांत्रिकी या शाखांमध्ये संशोधनाचा विकास होणे ही आजघडीची सर्वात मोठी गरज आहे. त्या दृष्टीने रसायनशास्त्रज्ञांमध्ये विचारमंथन होण्याची आवश्यकता आहे.
आधुनिक जगाच्या गरजा भागविण्यासाठी सातत्याने बदलणारे व विकास पावणारे शास्त्र म्हणजे रसायनशास्त्र असल्याचे सांगून अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, रसायनशास्त्र ही सर्वाधिक मोठी विज्ञानशाखा असून त्यामध्ये निरंतर संशोधन सुरू आहे. जागतिक स्तरावर एकूण प्रकाशित होणाऱ्या संशोधनामध्ये निम्म्याहून अधिक संशोधन हे एकट्या रसायनशास्त्रामधील आहे.  विज्ञानाच्या सर्वच शाखांना व्यापून उरणारे असे हे शास्त्र असून आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या माध्यमातून ते अधिकच व्यापक होत चालले आहे. विशेषतः औषधनिर्माण शास्त्राच्या विकासामध्ये रसायनशास्त्राने बजावलेल्या बहुमोल कामगिरीला तोड नाही, असेही ते म्हणाले.
या परिषदेत शिवाजी विद्यापीठाने तैवान येथील नॅशनल तैवान सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या जगातील आघाडीच्या दोनशे विद्यापीठांत समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केला. मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
परिषदेचे समन्वयक प्रा. अनिल घुले यांनी स्वागत केले. रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. जी.एस. गोकावी यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव डॉ. सागर डेळेकर यांनी आभार मानले.
दरम्यान, या परिषदेत तैवान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांसह भारताच्या विविध विद्यापीठांतून सुमारे तीनशेहून अधिक संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले आहेत.