शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र, भारत) येथील दैनंदिन ठळक घडामोडींचा वृत्तांत देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी निर्मिलेला ब्लॉग.
ग्रंथमहोत्सवात संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या
विद्यार्थ्यांचा सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रम
शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभातील ग्रंथमहोत्सवानिमित्ताने आयोजित 'स्वररंग' कार्यक्रमात सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.
शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभातील ग्रंथमहोत्सवानिमित्ताने आयोजित 'स्वररंग' कार्यक्रमात सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनी.
शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभातील ग्रंथमहोत्सवानिमित्ताने आयोजित 'स्वररंग' कार्यक्रमास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.
कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत
समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवामध्ये संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्वररंग’ या सांगितिक सांस्कृतिक
कार्यक्रमामध्ये अवघे विद्यापीठ रंगले. संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत
केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी चित्रपट गीतांसह सुफी, लोकधारा, लावणी आणि कव्वालीचे अत्यंत बहारदार सादरीकरण केले. दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या
या कार्यक्रमात पंधराहून अधिक गाणी विद्यार्थ्यांनी सादर करून सारे सभागृह
मंत्रमुग्ध करून सोडले.
गायक सौरभ बुवा, ऋचा गावंदे, अनिकेत निर्मळे,
प्रियांका मिरजकर, मयुरी जाधव आणि अन्य विद्यार्थ्यांसह
प्रशांत देसाई (तबला), विक्रम परीट (ढोलकी), आकाश साळोखे (पियानो), मनोज जोशी (ऑक्टोपॅड) यांनी
संगीतसाथ केली, तर श्रीधर जाधव यांनी साऊंड सिस्टीमची जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा
व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी
डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश
गायकवाड, बॅ. बाळासाहेब ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, अंतर्गत लेखापरीक्षक अजित चौगुले, उपकुलसचिव प्रिया
देशमुख, लेखापाल वैशाली थोरात, संगीत व
नाटयशास्त्र अधिविभागाचे डॉ. विनोद ठाकूर-देसाई, डॉ. निखिल भगत,
डॉ. प्रकाश बिलावर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक,
प्रशासकीय अधिकारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीस पालखीपूजनाने कमला महाविद्यालयात प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीने कोल्हापूर शहरात वाचनसंस्कृतीचा जागर केला.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीने कोल्हापूर शहरात वाचनसंस्कृतीचा जागर केला.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी विद्यापीठाच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ढोल व ताशा पथकांनी फेर धरून जोरदार सादरीकरण केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. धनंजय सुतार, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रकाश बिलावर आदी.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील स्टॉलवर मांडलेल्या ग्रंथांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील स्टॉलवर मांडलेल्या ग्रंथांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील विद्यापीठाच्या स्टॉलची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन व डॉ. धनंजय सुतार.
शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवातील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या स्टॉलची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.
कोल्हापूर, दि. १६
डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सवी
अर्थात ६० वा दीक्षान्त समारंभ येत्या सोमवारी (दि. १८) साजरा होत आहे. या सोहळ्याची
सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात
येणारी ग्रंथदिंडी आणि ग्रंथमहोत्सव हे शहरवासियांसह
विद्यार्थी-विद्यार्थिनींच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. यंदाही ग्रंथदिंडीमधील
७०० हून अधिक जणांच्या सहभागाने हीच बाब अधोरेखित केली.
आज सकाळी कमला महाविद्यालय येथे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे
पूजन करण्यात आले. पालखीमध्ये भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, संत
नामदेव गाथा यांसह राजा शिवछत्रपती, राजर्षी शाहू स्मरणिका, आर्टिफिशियल इंटेलिजन्स
हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. तेथून टाळमृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला.
वाचनसंस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा
पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाली. प्रांगणातील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी
अखेरीस राजमाता जिजाईसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित
करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून
वाहात होता.
ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव, डॉ. विलास शिंदे,
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव,वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय
सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. पी.टी.गायकवाड, निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे
प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उप-ग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, कमला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.
तेजस्विनी मुडेकर, डॉ. सुजय पाटील यांच्यासह बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा
योजनेचे विविध महाविद्यालयांतील समन्वयक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी
झाले. ग्रंथदिंडीमध्ये डॉ. आर.पी. आढाव, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. वसंत भागवत, तानाजी कांबळे, अमित गुरव, कैलास पवार, रवींद्र मांगले, उर्मिला कदम,श्रीमती. कुंभार, स्वाती डिग्रे, नीता पाटील हे विविध
महाविद्यालयांतील ग्रंथपालही सहभागी झाले.
वैविध्यपूर्ण विषयांवरील ग्रंथांची वाचकांना पर्वणी
ग्रंथदिंडीनंतर सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या आमराई परिसरात कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या
प्रतिमांना पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून हे उद्घाटन झाले. त्यानंतर
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ प्रकाशन विभागाच्या स्टॉलचे
उद्घाटन करण्यात आले. स्थानिकांसह राज्यभरातील २२ प्रकाशक व ग्रंथविक्रेते
महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरील हजारो ग्रंथ
वाचकांना पाहणी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रंथप्रेमी व वाचनवेड्या व्यक्तींसाठी
हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे.
या सर्व स्टॉलची कुलगुरूंसह अधिकाऱ्यांनी फिरून पाहणी केली आणि सहभागींना
शुभेच्छा व धन्यवाद दिले. याखेरीज हँडीहेल्प या संस्थेने दिव्यांगांनी बनविलेल्या
वस्तूंच्या विक्रीचा स्टॉल मांडला आहे. या ठिकाणी अन्नपदार्थ विक्रीचे ७ स्टॉल
आहेत. एम.बी.ए. अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचेही त्यात ३ स्टॉल आहेत.
तसेच स्टार्टअप उपक्रमास वाहिलेलेही काही स्टॉल आहेत. या विद्यार्थ्यांना कुलगुरू
डॉ. शिर्के यांनी, केवळ पदार्थ विक्री करण्याचे उद्दिष्ट बाळगू नका, तर आपले
स्वतःचे बिझनेस मॉडेल कसे विकसित कराल, त्याचे सादरीकरण तयार करण्याची सूचना केली.
सदर ग्रंथमहोत्सवात उद्या (दि. १७) सकाळी ११ वाजता संगीत व नाट्यशास्त्र
अधिविभागाच्या वतीने राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात ‘स्वररंग’
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी खुला
आहे. या कार्यक्रमासह तीन दिवस चालू असणाऱ्या या ग्रंथमहोत्सवाचा रसिक वाचकांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुतार यांनी केले आहे.
कोल्हापूर, दि. १५ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. (मास.कॉम.) अधिविभागाची विद्यार्थिनी साईसिमरन हिदायत घाशी (मूळ गाव बत्तीस शिराळा) हिला सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक, तर जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरची विद्यार्थिनी बिल्कीस हिदायत गवंडी (मु.पो. आगर, ता. शिरोळ) हिला कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी होत असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभात त्यांना ही पदके प्रदान करण्यात येतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-
विद्यापीठात १३व्या
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठात आयोजित १३व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) वीरेंद्र चित्राव, धीरज जाधव, सी.जी. रानडे, शरद आजगेकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. आसावरी जाधव.
शिवाजी विद्यापीठात आयोजित १३व्या किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवांतर्गत मांडण्यात आलेल्या पर्यावरणविषयक प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत वीरेंद्र चित्राव, डॉ. रसिया पडळकर, धीरज जाधव, सी.जी. रानडे, शरद आजगेकर व डॉ. आसावरी जाधव.
कोल्हापूर, दि. १३ डिसेंबर: वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने कोल्हापूरसह राज्यभरात
पर्यावरणपूरक उपक्रमांना गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे
गौरवोद्गार महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी आज येथे केले. शिवाजी
विद्यापीठ आणि किर्लोस्कर उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात
आलेल्या १३ वा वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज विद्यापीठाच्या वि.स.
खांडेकर भाषा भवनात उद्घाटन झाले. या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
यावेळी मंचावर किर्लोस्कर उद्योग समूहाचे व्हाईस प्रेसिडेंटसी. जी. रानडे, मनुष्यबळ विकास विभागाचे
प्रमुख धीरज जाधव, पर्यावरण शास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.
आसावरी जाधव, समन्वयक शरद आजगेकर वडॉ. रसिया पडळकर उपस्थित होते.
श्री. चित्राव म्हणाले, वसुंधरा महोत्सवाने कोल्हापूर परिसरात पर्यावरणविषयक
जाणिवांचा प्रसार करण्याची भूमिका बजावली. महोत्सवात सादर होणाऱ्या विविध
चित्रकृतींच्या माध्यमातून जगभरातले प्रयोग स्थानिकांपर्यंत पोहोचले. त्यामधून
प्रेरणा घेऊन अनेक तरुण पर्यावरण चळवळीत कार्यरत झाले. या महोत्सवाच्या माध्यमातून
आजवर कोल्हापूरमध्ये राबविण्यात आलेले पर्यावरणपूरक उपक्रम राज्यात सर्वत्र गौरवले गेले आहेत. आता या महोत्सवाशी शिवाजी विद्यापीठ जोडले
गेल्यामुळे भविष्यात विद्यापीठाच्या
सहकार्याने ते जास्तीत जास्त युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यात यश येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चित्राव यांनी महोत्सवाच्या 'सकस अन्न, समृद्ध निसर्ग,
आणि आरोग्यपूर्ण समाज' या संकल्पनेची माहिती दिली.
वसुंधरा महोत्सवाचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्षीय
मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या शाश्वत धोरणासंदर्भात मांडणी केली. विद्यापीठ राबवित असलेल्या जल संधारण, ऊर्जा बचत आणि हरित परिसर या उपक्रमांसह भविष्यातीलही पर्यावरणपूरक
योजना योजना सांगितल्या.किर्लोस्कर आणि शिवाजी विद्यापीठ या दोन समविचारी संस्था एकत्र आल्यामुळे आता पर्यावरणपूरक बाबी समाजातील तळागाळापर्यंत पोचवता येतील, अशी आशा
त्यांनी व्यक्त केली. उद्योग आणि विद्यापीठ
यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यावरणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी
व्यक्त केली.
यावेळी श्री.रानडे यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाच्या हरित उपक्रमांची, तर धीरज जाधव यांनी समूहाच्या सामाजिक
बांधिलकीच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविकात पर्यावरण शास्त्र विभागाच्या उपक्रमांचीमाहिती दिली.
महोत्सवात फोटोग्राफी
स्पर्धा, चित्र - शिल्प प्रदर्शन,
पर्यावरणपूरक सेवा प्रदर्शन असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. पुढील दोन
दिवसांत(१४व १५ डिसेंबर)नवीन चित्रपट, चर्चासत्र व प्रदर्शनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
शिवाजी विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. मीना पोतदार, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रकाश गायकवाड आदी
शिवाजी विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेतील प्रकल्पांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. मीना पोतदार, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.
शिवाजी विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.
कोल्हापूर, दि.
१३ डिसेंबर: शिवाजी
विद्यापीठात आज भरविण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा
महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांची प्रचिती
आली. सद्यस्थितीत मानवी समुदायाला भेडसावणाऱ्या व्यक्तीगत समस्यांपासून ते सामाजिक
समस्यांपर्यंत आपापल्या परीने संशोधकीय मार्गाने उत्तर देण्याचा प्रयत्न या
महोत्सवात दिसून आला. या स्पर्धेत सुमारे ३५० पदवी, पदव्युत्तर व संशोधक
विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले संशोधनपर प्रकल्प, पोस्टर सादर केले. विद्यार्थी
विकास विभाग व भूगोल अधिविभाग यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.
विद्यापीठ
परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे
उद्दीष्ट बाळगून विद्यापीठ दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करते. जिल्हास्तरीय
महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर आज विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा
महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू, डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत
पाटील स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पदवी,
पदव्युत्तर स्तरीय विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी अशा तीन स्तरांमध्ये वर्गीकृत
असलेल्या या विद्यापीठस्तरीय आविष्कार महोत्सवात मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच
वैद्यकीय आणि फार्मसी या सहा श्रेणींमध्ये प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विज्ञान
व तंत्रज्ञानाच्या आधारे नागरिक, शेतकरी यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे
निराकरण करण्यासाठीचे प्रकल्प होते. पर्यावरणीय समस्यांवर जैविक विघटनशील
प्लास्टीकसारखे पर्याय सादर करणारे प्रकल्पही होते. शिवाय, तृतीयपंथीयांपासून
वंचित घटकांच्या सामाजिक समावेशनासाठी, लोकांच्या मानसिक तणावावरील
उपाययोजनांपर्यंतच्या प्रकल्पांचाही समावेश होता. यामधून विद्यार्थ्यांमधील
सामाजिक जाणिवांची प्रचिती उपस्थितांना आली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह
मान्यवरांनी फिरून सर्व प्रकल्पांची पाहणी केली आणि इतक्या मोठ्या संख्येने या
संशोधन स्पर्धेत सहभाग दर्शविल्याबद्दल संशोधक विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले.
यावेळी वाणिज्य
व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता
डॉ. मेघा गुळवणी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, भूगोल
अधिविभागाच्या डॉ. मीना पोतदार, डॉ. जगदीश सपकाळे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक
डॉ. तानाजी चौगुले, डॉ. सोमनाथ पवार आदी उपस्थित होते. विविध अधिविभागांतील तसेच महाविद्यालयांतील
शिक्षकांनी परीक्षक म्हणून तसेच समन्वयक म्हणूनही काम पाहिले.
कोल्हापूर , दि. ९ डिसेंबर: 'विकसित भारत@२०४७' या पोर्टलचे उद्घाटन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचे ११ डिसेंबर रोजी सकाळी नवी दिल्लीहून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यांचे शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन सहक्षेपण करण्यात येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने 'विकसित भारत @२०४७' युवकांचा आवाज हा कार्यक्रम ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केला आहे. यावेळी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'विकसित भारत @ २०४७' या पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मा. नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेसाठी २५ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना माजी खासदार तथा जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर. शेजारी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख.
कोल्हापूर, दि. ९ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा रायगडचे माजी खासदार व रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतीगृह योजनेसाठी २५ लाख रूपयांची देणगी दिली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांना विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेची माहिती समजली. त्यावेळी त्यांनी २५ लाख रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या या अतिशय उपयुक्त व समाजाभिमुख योजनेसाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या 'महान शिवाजी' या महाग्रंथाची प्रत भेट देऊन श्री. ठाकूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाने गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी लोकसहभागातून वसतीगृह साकारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, तो स्तुत्य असल्याचे सांगून त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, असे वाटल्याने आपण त्यात सहभागी होत असल्याची भावना श्री. ठाकूर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या १९७२ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असणाऱ्या रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत शिक्षण घेतले. श्री. ठाकूर यांनी १९६८ ते १९७२ या कालावधीत रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथून १९७२ मध्ये मराठी विषयातून शिवाजी विद्यापीठाची बी.ए. पदवी प्राप्त केली आहे. एक कष्टाळू उद्योजक ते सामाजिक जाणीवांनी समृद्ध दातृत्वसंपन्न लोकनेता असा त्यांचा प्रवास राहिला आहे. सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १९९८ ते २००४ या कालावधीत कुलाबा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
ठाकूर यांच्या दातृत्वाची प्रचिती: कुलगुरू डॉ. शिर्के
माजी खासदार रामशेठ ठाकूर हे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेची माहिती समजली. लोकसहभागातून मुलींसाठी वसतीगृह साकारत असल्याचे समजताच त्यांनी विनाविलंब २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला, ही फार मोठी बाब आहे. त्यांच्या दातृत्वाबद्दल आजवर ऐकून होतो, मात्र या निमित्ताने त्याची प्रचितीच आली. त्यांचे हे दातृत्व अनेकांसाठी पथदर्शी स्वरूपाचे आहे. लोकस्मृती योजना त्यांच्यासारख्या अगणित दात्यांमुळे लवकरात लवकर साकार होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी व्यक्त केला.