Friday, 3 January 2025

दिव्यांगाप्रती समाजामध्ये जाणीव-जागृती निर्माण होणे महत्त्वाचे: डॉ. विनय कुमार पाठक

 

शिवाजी विद्यापीठात दिव्यांगांविषयी आयोजित विशेष परिसंवादाच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. विनय कुमार पाठक. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रभंजन माने, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. मनोहर वासवानी आदी

 

(दिव्यांगविषयक परिसंवाद उद्घाटन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. जानेवारी: दिव्यांग व्यक्तींप्रती समाजामध्ये चेतना, जाणीव-जागृती निर्माण करणे फार महत्वाचे कार्य आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे योगदान मोलाचे ठरते, असे प्रतिपादन  अखिल भारतीय विकलांग चेतना परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय कुमार पाठक यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील हिंदी इंग्रजी अधिविभाग आणि अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद (त्तीसगड, बिलासपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने 'विकलांग विमर्श के निकष पर भाषा और साहित्य' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन समारंभ विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहा झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. पाठक म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसंदर्भात काम करणे हीच खरी मानव सेवा आहे. विकलांगता निश्चित स्वरूपात दूर हो शकते. अशी व्यक्ती अनेक कामे करण्यास सक्षम असतात.  समाजाने त्यांच्याप्रती फक्त दयाभाव दाखविण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहि केले पाहिजे. त्यामुळे समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणे सहज शक्य होईल. दिव्यांगांमध्ये चेतना निर्माण करण्याचे महान कार्य त्तीसगड, महाराष्ट्रासह देशा अनेक ठिकाणी होत आहे. विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुसह्य करण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे. हे कार्य संपूर्ण देशामध्ये चेतना आणि ऊर्जा निर्माण करणारे ठरेल.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात भारतीय भाषांसोबत सामाजिक विज्ञान शाखांच्या वतीने संयुक्त संशोधन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादामधील विचारमंथन मार्गदर्शक स्वरुपाचे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. प्रभंजन माने, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी मनोगते व्यक्त केली.

सुवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपटयास पाणी घालून परिसंवादाचे द्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. गीता दोडमणी यांनी हिंदीतून मराठीत अनुवादित केलेल्या विकलांग विमर्श: दशा आणि दिशा या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

डॉ. मनोहर वासवानी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. अक्षय सरवदे यांनी आभार मानले. डॉ. सुषमा चौगले मृणाल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी हैद्राबाद येथील इंग्रजी विदेशी भाषा विद्यापीठाचे डॉ.अमित कुमार, दिल्लीतील डॉ. प्रीती गच्चे, त्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ.चंद्रभूषण वाजपेयी, परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.मदन मोहन अग्रवाल, डॉ.सुरेश माहेश्वरी, डॉ.चंद्रकांत लंगरे, डॉ.राजश्री बारवेकर, डॉ.दिपक भादले, डॉ.प्रकाश मुं यांच्यासह देशभरातून शंभरहून अधिक विद्यार्थी या परिसंवादासाठी उपस्थित राहिले आहेत.

शिवाजी विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

 



कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील महिला शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. प्रल्हाद माने, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. मीना पोतदार, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. कविता वड्राळे आदी उपस्थित होते.

भूचुंबकत्व क्षेत्रातील संशोधनास आय.आय.जी.चे शिवाजी विद्यापीठास पूर्ण सहकार्य

 संचालक डॉ. ए.पी. डिमरी यांची ग्वाही; विद्यापीठात एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक डॉ. ए.पी. डिमरी. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. राजेंद्र सोनकवडे.



शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक डॉ. ए.पी. डिमरी. मंचावर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. राजेंद्र सोनकवडे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक डॉ. ए.पी. डिमरी. 


शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या निमित्ताने आयोजित पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करताना भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संचालक डॉ. ए.पी. डिमरी, डॉ. सी.डी. लोखंडे, डॉ. राजेंद्र सोनकवडे आदी. 

(राष्ट्रीय कार्यशाळेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: अवकाश आणि भूचुंबकत्वाच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी उपलब्ध असून त्यांचा शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे संयुक्त संशोधन प्रकल्पांना सर्वोतोपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे (आय.आय.जी.) संचालक डॉ. ए.पी. डिमरी यांनी आज येथे दिली.

शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त असलेल्या नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅटमॉस्फिअर-आयनोस्फिअर डायनॅमिक्स: ऑब्झर्व्हेशन्स अँड डेटा अ‍ॅनालिसिस (AIDON 2025)” ही एकदिवसीय कार्यशाळा आज शिवाजी विद्यापीठात पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डिमरी बोलत होते. पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.

डॉ. डिमरी म्हणाले, गेल्या दोन दिवसांत शिवाजी विद्यापीठातील एम.एफ. रडार सुविधा तसेच पन्हाळा येथील विद्यापीठाचे अवकाश केंद्र यांची पाहणी केली. या सुविधा अद्यावत असून त्याद्वारे अतिशय उत्तम दर्जाचे माहिती संकलन या दोन्ही ठिकाणी होत आहे. तथापि, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी केवळ या माहितीवर अवलंबून न राहता आय.आय.जी.ला भेट द्यावी. तेथे विविध प्रकारच्या संशोधन सुविधा आणि डाटा उपलब्ध आहे. त्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन अधिक परिपूर्ण करता येईल. आय.आय.जी. येथे विद्यार्थ्यांना मोफत निवास व्यवस्था पुरविण्यात येईल.

अधिक व्यापक परिषद घेऊ

शिवाजी विद्यापीठातील संशोधन सुविधा पाहून आपण अत्यंत प्रभावित झालो असून आय.आय.जी.सह आयुका, पुणे, इस्रो इत्यादी राष्ट्रीय आघाडीच्या संस्थांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठात एक अधिक व्यापक स्वरुपाची परिषद आयोजित करण्याचा मानस निर्माण झाला आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अधिविभागाचे प्रमुख डॉ. सोनकवडे त्या कामी कळीची भूमिका बजावतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रा. आर.व्ही. भोसले यांनी पन्हाळा अवकाश केंद्र उभारणीसाठी घेतलेले परिश्रम आणि पाठपुरावा यांची माहिती दिली. ते म्हणाले, कोल्हापूरचे अवकाश संशोधन आणि भूचुंबकत्व या क्षेत्रांच्या दृष्टीने वैज्ञानिक महत्त्व नेमके काय आहे, असे प्रा. भोसले यांनी विचारले असता, त्यांनी कोल्हापूरचे भौगोलिक वैशिष्ट्य सांगितले होते. ते असे की, हे ठिकाण विषुववृत्तीय विद्युतलहरींचा अभ्यास करण्यासाठी अतिशय योग्य आहे. पृथ्वीच्या आयनोस्फिअरच्या विषुववृत्तीय प्रदेशात दिवसा पूर्वेकडे वाहणाऱ्या नॅनो विद्युत प्रवाहाची ही एक अरुंद पट्टी असते. तिचा अभ्यास करण्यासाठी येथील भूचुंबकीय वेधशाळेमधून खूप चांगली निरीक्षणे नोंदविता येतात. त्यामुळे वातावरणातील मध्य आणि उच्च स्तरांचा अभ्यास व संशोधन करणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या समग्र निरीक्षणांचा, माहितीचा योग्य वापर करून अधिकाधिक सक्षम संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय भूचुंबकत्व संस्थेसमवेत शिवाजी विद्यापीठाचे १९८६ पासून संशोधकीय सहकार्यसंबंध राहिले आहेत. येथून पुढेही ते वृद्धिंगत होत राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजीव व्हटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. ए.व्ही. मोहोळकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. सत्यजीत पाटील, डॉ. सिबा दास, डॉ. विजय कुंभार, डॉ. मक्सूद वाईकर आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत एस. गुरुबरण, डॉ. आलोक ताओरी, डॉ. सतीशकुमार, डॉ. श्रीपती, डॉ. गोपी सिमला आणि डॉ. नवीन परिहार या तज्ज्ञांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यशाळेत विषयतज्ज्ञांच्या व्याख्यानासह डेटा विश्लेषण तंत्रांवरील प्रात्यक्षिकेही झाली. कार्यशाळेत देशभरातील राष्ट्रीय संशोधन संस्थांमधील शंभरहून अधिक युवा संशोधक, पदव्युत्तर व पीएच.डी. स्तरावरील विद्यार्थी सहभागी झाले.


Thursday, 2 January 2025

महर्षी शिंदे यांच्याकडून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सैद्धांतिक मांडणी: संपत देसाई

 

कॉ. संपत देसाई

शिवाजी विद्यापीठात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत आणि महर्षी वि.रा. शिंदे स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रभंजन माने व डॉ. नंदकुमार मोरे.


(संपत देसाई यांच्या व्याख्यानाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २ जानेवारी: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सर्वप्रथम सैद्धांतिक मांडणी केली आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी हयातभर प्रखर प्रयत्न केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे आज महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महर्षी शिंदे आणि महाराष्ट्रातील जातिनिर्मूलनाचे लढे या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, महर्षी शिंदे हे अस्पृश्यांच्या प्रश्नांवर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करणारे समाजसंशोधक होते. या प्रश्नाच्या सोडवणुकीची निकड त्यांना भासत होती. त्यासाठी त्यांनी या समस्येच्या अनुषंगाने उपलब्ध माहितीचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास व संशोधन करण्यावर भर दिला. देशविदेशांत उपलब्ध माहितीचे वाचन व संशोधन केले. खानेसुमारीचा अभ्यास व विश्लेषण केले. त्यातून भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची साधार मांडणी ते करू शकले. आणि पुढे त्यांनी या कार्यास स्वतःला वाहून घेतले. स्पृश्यांच्या मनात अस्पृश्यांविषयी सहानुभूती आणि सहभाव निर्माण करण्याचा निर्धार करून ते कामाला लागले. त्यांच्या अथक प्रयत्नांतूनच हा मुद्दा राष्ट्रीय सभेच्या कार्यतालिकेवर आला आणि १९१७च्या कलकत्ता अधिवेशनात अस्पृश्यताविरोधी ठराव पारित करण्यात आला. महर्षी शिंदे यांनी धार्मिक अंधश्रद्धांवर प्रहार करण्याचेही काम केले.

आधुनिक काळातही उत्पन्नाची साधने आणि मार्ग जातिव्यवस्थेच्या उतरंडीनुसार ठरविले जातात. या आधुनिक जातिव्यवस्थेला धक्के देण्याची गरज आज निर्माण झाली असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

श्री. देसाई यांनी आपल्या भाषणामध्ये भगवान गौतम बुद्ध, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरूजी, दलित पँथर, कॉ. शरद पाटील, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, १९७०च्या दशकात उदयास आलेली स्त्रीमुक्तीची चळवळ आणि उच्चजाती परीघातून तिचे जाति-पितृसत्ता अंतापर्यंत झालेले विचारपरिवर्तन, बाबा आढाव यांची एक गाव, एक पाणवठा चळवळ, मागोवा गट आणि त्यातून उदयास आलेली डॉ. भारत पाटणकर, वाहरू सोनावणे यांचा श्रमिक मुक्ती दल आणि समन्यायी पाणी वाटप चळवळ उभारणीला सूक्ष्म पातळीवर कारणीभूत असलेली जातिनिर्मूलनाची चळवळ यांचा समग्र वेध घेतला. महर्षी शिंदे यांच्या चळवळीचा पायाविस्तार गेल्या शतकभरात झालेल्या या सर्व चळवळींपर्यंत झाला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संपत देसाई यांच्या जातिनिर्मूलन लढ्याच्या व्यापक पट मांडणी कौशल्याचे कौतुक केले. तसेच, विद्यापीठामध्ये अनेक अभ्यासक्रम सामाजिक कार्याशी संबंधित आहेत. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन देसाई यांना केले. विद्यार्थ्यांना देसाई यांच्या भाषणातून वाचनासाठी अनेक नवे संदर्भ मिळाले आहेत. हे सर्व संदर्भग्रंथ मिळवून त्यांचे वाचन करण्यास त्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. महर्षी शिंदे यांच्या भगिनी जनाक्का शिंदे याही प्रचंड वाचनवेड्या होत्या. त्यांचे चरित्रही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचेही वाचन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात अध्यासन समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले.

कार्यक्रमास बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Wednesday, 1 January 2025

वाचन संकल्प महाराष्ट्राचा:

वाचनातून जाणिवासमृद्ध माणूसपण घडते: डॉ. धनंजय देवळालकर

'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यशाळेत 'वाचन कौशल्य' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. धनंजय देवळालकर.
 
'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यशाळेत 'वाचन कौशल्य' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. धनंजय देवळालकर. मंचावर (डावीकडून) डॉ. धनंजय सुतार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील व प्राचार्य डॉ. वर्षा मैंदर्गी.


(डॉ. धनंजय देवळालकर यांच्या व्याख्यान कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. १ जानेवारी: वाचन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून वाचनातूनच जाणिवासमृद्ध माणूसपण घडते, असे प्रतिपादन राजाराम महाविद्यालयातील डॉ. धनंजय देवळालकर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आज सकाळी वाचन कौशल्य कार्यशाळा आणि सामूहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते; तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

वाचन कौशल्य या विषयाचे गांभीर्य विद्यार्थ्यांना पटवून देत असताना त्याची अत्यंत रंजक पद्धतीने मांडणी करीत वाचनाचे महत्त्व त्यांच्यावर ठसविण्याचा प्रयत्न डॉ. देवळालकर यांनी केला. ते म्हणाले, अभ्यासातील क्रमिक पुस्तके आपल्याला हुशार बनवितात. पण शहाणे व्हायचे असेल तर अवांतर वाचनाकडे वळायला हवे. अवांतर पुस्तके खऱ्या अर्थाने विवेकी माणूस घडवितात. आपल्याला सजग बनवितात, समृद्ध बनवितात आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रदान करतात. पुस्तकांच्या वाचनातूनच समाजाला आधार देणारे अदृश्य स्तंभ घडविले जातात. विद्यार्थ्यांनी स्वानंदासाठी वाचले पाहिजे. प्रज्ञावंत होण्यासाठी वाचन हे अत्यावश्यक आहे. ती अत्यंत जाणीवपूर्क करण्याची गोष्ट आहे. वेळेचे योग्य नियोजन करून अधिकाधिक वेळेचा विनियोग आपण वाचनासाठी केल्यास आपले व्यक्तीमत्त्व खऱ्या अर्थाने समृद्ध बनेल.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, कोणत्याही वाचनामागील वाचकाचा हेतू हा खूप महत्त्वाचा असतो. वाचनातून आपल्याला नेमके काय साध्य करावयाचे आहे, समजून घ्यायचे आहे, ते विद्यार्थ्यांनी मनाशी ठरविले पाहिजे. वाचनातून आनंद शोधतानाच आपण आपल्या सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासासाठी त्याचा कसा वापर करून घ्यावयाचा, याचा विद्यार्थ्यांनी सातत्याने विचार करायला हवा. त्या माध्यमातून आजीवन अध्ययनाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहावे, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी जगभरातील व्यक्तीमत्त्वांना पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेतले पाहिजेच, पण त्याचबरोबरीने आपल्या परिसरातील, भोवतालातील माणसांनाही पुस्तकाद्वारे जाणून घेतले पाहिजे. या वाचलेल्या माहितीची आपल्या सुहृदांसमवेत देवाणघेवाण केल्याने सर्वांचीच ज्ञानवृद्धी होण्यास मदत होते. पुस्तक वाचनाच्या व्यसनातून नेहमीच लोकांचे भले झाले आहे. त्यातून व्यक्तीची प्रगल्भता वाढते. पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे एकच पुस्तक वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्यासमोर नवनवे संदर्भ घेऊन उभे राहात असते. अशा वाचनातून आकलनाच्या कक्षा विस्तारित होऊन व्यक्तीमत्त्व संपन्न बनते.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, प्राचार्य डॉ. वर्षा मैंदर्गी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, ग्रंथालयशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. शिवराज थोरात, डॉ. वैभव ढेरे, गजानन पळसे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पुस्तकांचे एक तास सामूहिक वाचन

या कार्यक्रमानंतर राजर्षी शाहू सभागृहात आण्णासाहेब लठ्ठे लिखित 'श्री शाहुंचे चरित्र (श्रीशाहुचरितम्) आणि महात्मा गांधी यांच्या 'सत्याचे प्रयोग एवं आत्मकथा' या पुस्तकांतील निवडक उताऱ्यांचे विद्यार्थ्यांनी एक तास सामूहिक वाचन केले.