'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यशाळेत 'वाचन कौशल्य' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. धनंजय देवळालकर. |
कोल्हापूर, दि. १ जानेवारी: वाचन ही सातत्यपूर्ण
प्रक्रिया असून वाचनातूनच जाणिवासमृद्ध माणूसपण घडते, असे प्रतिपादन राजाराम
महाविद्यालयातील डॉ. धनंजय देवळालकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत
शिवाजी विद्यापीठात आज सकाळी वाचन कौशल्य कार्यशाळा आणि सामूहिक वाचन उपक्रमाचे
आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते; तर प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
‘वाचन कौशल्य’ या विषयाचे गांभीर्य विद्यार्थ्यांना पटवून देत असताना त्याची अत्यंत रंजक
पद्धतीने मांडणी करीत वाचनाचे महत्त्व त्यांच्यावर ठसविण्याचा प्रयत्न डॉ.
देवळालकर यांनी केला. ते म्हणाले, अभ्यासातील क्रमिक पुस्तके आपल्याला हुशार
बनवितात. पण शहाणे व्हायचे असेल तर अवांतर वाचनाकडे वळायला हवे. अवांतर पुस्तके
खऱ्या अर्थाने विवेकी माणूस घडवितात. आपल्याला सजग बनवितात, समृद्ध बनवितात आणि
जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रदान करतात. पुस्तकांच्या वाचनातूनच समाजाला आधार
देणारे अदृश्य स्तंभ घडविले जातात. विद्यार्थ्यांनी स्वानंदासाठी वाचले पाहिजे.
प्रज्ञावंत होण्यासाठी वाचन हे अत्यावश्यक आहे. ती अत्यंत जाणीवपूर्क करण्याची
गोष्ट आहे. वेळेचे योग्य नियोजन करून अधिकाधिक वेळेचा विनियोग आपण वाचनासाठी
केल्यास आपले व्यक्तीमत्त्व खऱ्या अर्थाने समृद्ध बनेल.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले,
कोणत्याही वाचनामागील वाचकाचा हेतू हा खूप महत्त्वाचा असतो. वाचनातून आपल्याला
नेमके काय साध्य करावयाचे आहे, समजून घ्यायचे आहे, ते विद्यार्थ्यांनी मनाशी
ठरविले पाहिजे. वाचनातून आनंद शोधतानाच आपण आपल्या सर्वांगीण व्यक्तीमत्त्व
विकासासाठी त्याचा कसा वापर करून घ्यावयाचा, याचा विद्यार्थ्यांनी सातत्याने विचार
करायला हवा. त्या माध्यमातून आजीवन अध्ययनाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहावे, असे
त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, विद्यार्थ्यांनी जगभरातील व्यक्तीमत्त्वांना पुस्तकाच्या माध्यमातून
जाणून घेतले पाहिजेच, पण त्याचबरोबरीने आपल्या परिसरातील, भोवतालातील माणसांनाही
पुस्तकाद्वारे जाणून घेतले पाहिजे. या वाचलेल्या माहितीची आपल्या सुहृदांसमवेत
देवाणघेवाण केल्याने सर्वांचीच ज्ञानवृद्धी होण्यास मदत होते. पुस्तक वाचनाच्या
व्यसनातून नेहमीच लोकांचे भले झाले आहे. त्यातून व्यक्तीची प्रगल्भता वाढते.
पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे एकच पुस्तक वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्यासमोर
नवनवे संदर्भ घेऊन उभे राहात असते. अशा वाचनातून आकलनाच्या कक्षा विस्तारित होऊन
व्यक्तीमत्त्व संपन्न बनते.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी
घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत
केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपग्रंथपाल
डॉ. प्रकाश बिलावर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. विलास शिंदे
यांनी आभार मानले.
कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, प्राचार्य डॉ. वर्षा मैंदर्गी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.
अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, मराठी अधिविभाग
प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन
माने, डॉ. अक्षय सरवदे, ग्रंथालयशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील,
डॉ. शिवराज थोरात, डॉ. वैभव ढेरे, गजानन पळसे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर राजर्षी शाहू सभागृहात आण्णासाहेब लठ्ठे लिखित 'श्री
शाहुंचे चरित्र’ (श्रीशाहुचरितम्) आणि महात्मा गांधी यांच्या 'सत्याचे प्रयोग एवं आत्मकथा' या पुस्तकांतील
निवडक उताऱ्यांचे विद्यार्थ्यांनी एक तास सामूहिक वाचन केले.
No comments:
Post a Comment