![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. सुनीता सावरकर. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. रणधीर शिंदे. |
![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. सुनीता सावरकर. |
कोल्हापूर, दि. २७ जानेवारी: डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्याही विशिष्ट जात किंवा समुदायापुरती
मर्यादित नव्हती, तर ती मानवी हक्क प्रस्थापित करणाऱ्या लोकांची मानवतेसाठीची चळवळ
होती, असे प्रतिपादन डॉ. सुनिता सावरकर यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन
केलेल्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त ‘ढोर-चांभार
स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’
पुस्तकावरील परिसंवादामध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकृष्ण
महाजन होते. डॉ. सुनिता सावरकर लिखित
या पुस्तकावरील परिसंवादात लेखिका डॉ. सावरकर यांच्यासह डॉ.
रणधीर शिंदे, डॉ. दीपा श्रावस्ती सहभागी झाले.
डॉ. सावरकर म्हणाल्या, इतिहास हा फक्त एका समूहाचा नसतो, तर
त्या काळामध्ये अस्तित्वात असणाऱ्या अनेक समूहांचा असतो. यातून स्त्रिया मात्र परिघाबाहेर
राहतात. या परिघाबाहेरील स्त्रियांचा इतिहास शोधणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ढोर-चांभार समाजातील अनेक स्त्रियांनी सहभाग घेतला कारण
त्यांच्या आंबेडकरी विचारांच्या जाणीवा प्रगल्भ झाल्या होत्या. त्यांनी आंबेडकर
चळवळीत एखाद्या कार्यक्रमात स्वागत गीत गाण्यापासून ते संघटना उभी करणे, ती चालविणे व त्या अनुषंगाने लिखाण
कारणे अशी महत्त्वाची कामे केली आहेत.
डॉ. रणधीर शिंदे
म्हणाले, डॉ. सावरकर यांनी अलक्षित व दुर्लक्षित परिघावरील स्त्रियांची नोंद
करून त्यांची ओळख प्रकाशमान केली आहे. त्याद्वारे सामाजिक दस्ताऐवजीकरणाचे महत्त्वपूर्ण
काम सिद्ध झाले आहे.
डॉ. दिपा श्रावस्ती
म्हणल्या, परीघाबाहेरील स्त्रिया जात-वर्ग लिंग व धर्म यामध्ये अडकलेल्या आहेत.
परंतु यामधून बाहेर पडून विविध क्षेत्रांत काम केलेल्या स्त्रियांची इतिहासाने दखल
घेतलेली नाही. डॉ. सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील
स्त्रियांच्या ऐतिहासिक कामाची नोंद करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
अध्यक्षीय मनोगतात
डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, डॉ. सावरकर यांचे पुस्तक जातींची धारधार होत चाललेली टोके मोडण्यासाठी
महत्त्वपूर्ण आहे. आंबेडकरी चळवळीचे भान आणि जाणीवा जागृत झालेल्या स्त्रियांच्या
कार्याची नोंद या पुस्तकाने घेतली आहे.
No comments:
Post a Comment