शिवाजी विद्यापीठात ग्रंथालयांविषयी आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत डॉ. विनायक बंकापूर, किशोर इंगळे, डॉ. सचिनकुमार पाटील आदी. |
शिवाजी विद्यापीठात ग्रंथालयांविषयी आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलताना डॉ. विनायक बंकापूर |
कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: बदलत्या तंत्रज्ञानाच्या गतीने बदलण्याचे
आव्हान आज सर्वच क्षेत्रांसमोर आहे. ग्रंथालयांनीही नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची
गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचे डॉ. विनायक बंकापूर
यांनी काल (दि. २९) येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग
आणि शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथालय संघटना (सुक्ला), कोल्हापूर यांच्या
संयुक्त विद्यमाने ‘टेक्नोलाइब्ररियनशिप: अ गेटवे टूवर्ड्स फ्युचर लायब्ररीज्’ या
विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेमध्ये ते बोलत होते. राजर्षी
शाहू सभागृहात झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
होते.
डॉ. बंकापुर यांनी आपल्या भाषणात मातीच्या विटेतील अक्षरांपासून डिजिटल
अक्षरांपर्यंतचा तंत्रज्ञानाचा प्रवास कसा घडला, अफाट माहिती प्रस्फोट युगात डिजिटल
ग्रंथालये, ग्रंथपाल यांचे महत्त्व याविषयी विवेचन केले. क्रिएटिव्ह लर्निंग, लाईफ
लाँग लर्निंग, ग्रंथालय गतिशीलता (Dynamism) मल्टीमीडिया स्टुडीओ इत्यादींबाबतही त्यांनी
तपशीलवार चर्चा केली.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, आर्टिफिशियल
इंटेलिजन्समधील जनरेटिव्ह एआय, क्वांटम एआय, चीनचे
अतिअद्यावत डीपसिक एआय तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉन-
ह्युमन न्युरॉन यातून विकसित न्युरोचीप असा तंत्रज्ञानाचा आवाका गतीने वाढतो आहे. तंत्रज्ञानाची
ही झेप ओळखून आपणही त्याच्याशी सुसंगत राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शिक्षण
धोरणानुसार आता याच तंत्रज्ञानाच्या मदतीतून आपल्या क्षेत्रातील स्टार्टअपला चालना
दिली पाहिजे. आजघडीला इलेक्ट्रॉन व मानवी न्युरॉन यांच्या संयोगातून ब्रेन चीप
निर्माण करून प्रत्येक मानव हाफरोबो होऊ शकतो, असे तंत्रज्ञानात्मक आव्हानही मानवी
कार्यकौशल्यासमोर उभे राहू पाहते आहे. त्याला तोंड देण्यासाठीही आपण सज्ज असायला
हवे.
टाटा कन्सल्टन्सीचे किशोर इंगळे यांनी लायब्ररीयन कौशल्य, लायब्ररी एज्युकेशनचे
डिजिटल युगातील महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेत आयसीटी एनव्हायर्नमेंट, क्लाऊड कॉम्प्युटिंग व ग्रंथालये, डिजिटल ज्ञान
संवर्धन, ग्रंथालय सेवेत आर्टिफिशियल इंटलिजेन्सचा प्रभाव व वापर, बिग
डेटा, चॅटबॉट्स, ग्रीन लायब्ररीज्, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, ई-रिसोर्स लायसन्सिंग,
डिजिटल राईट्स व्यवस्थापन, वाङ्मयचौर्य तपास प्रणाली इत्यादी आधुनिक नवतंत्रज्ञानाचा
ग्रंथालयांवरील परिणाम आणि वापर आदी विषयांवर
परिषदेत विविध सत्रांत चर्चा झाली. परिषदेत देशभरातील ६८ ग्रंथालय तज्ज्ञांसह
ग्रंथालय प्रोफेशनल्स, शिक्षक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. ५४ संशोधकांनी
शोधनिबंध सादर केले.
तत्पूर्वी, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते रोपास पाणी वाहून उद्घाटन
करण्यात आले. संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत केले. विभाग प्रमुख डॉ.
सचिनकुमार पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुक्लाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र
आढाव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment