Tuesday, 14 January 2025

शिवाजी विद्यापीठाचा ग्रंथ महोत्सव यंदा विस्तार इमारत परिसरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव यंदा विस्तार इमारत परिसरात भरविण्यात येणार आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेली स्वागत कमान.



शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव यंदा विस्तार इमारत परिसरात भरविण्यात येणार आहे. या ठिकाणी ग्रंथ विक्रेत्यांसाठी स्टॉल उभारणीचे काम सुरू आहे.



कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारा ग्रंथ महोत्सव या वर्षापासून मुख्य प्रशासकीय इमारत आणि विस्तार (अनेक्स) इमारत यांमधील मोकळ्या प्रांगणात १६ व १७ जानेवारी २०२५ असा दोन दिवस भरविण्यात येणार आहे, अशी माहिती बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक तथा ग्रंथ महोत्सव समन्वयक डॉ. धनंजय सुतार यांनी दिली आहे.

डॉ. सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर वर्षी दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित करण्यात येणारा ग्रंथ महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोरील आंबा बागेमध्ये भरविण्यात येत असे. तथापि, ग्रंथ महोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीमुळे बागेमधील झाडांना इजा पोहोचू नये, यासाठी या वर्षीपासून तो विस्तार (अनेक्स) इमारतीच्या प्रांगणात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार, शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षांत समारंभानिमित्त सलग १८ व्या वर्षी 'ग्रंथमहोत्सव २०२५'चे आयोजन दिनांक १६ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. महोत्सवात नामवंत भारतीय तसेच विदेशी कंपन्यांचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजीटल ग्रंथ वितरक सहभागी होणार आहे. तात्पुरती उपाहारगृहेही तेथे असतील. महोत्सवात साधारण ४० स्टॉल असतील.

ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने १६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. राजारामपुरीतील कमला महाविद्यालयापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपालखीच्या पूजनाने दिंडीचे उद्घाटन होईल. कमला महाविद्यालयापासून राजारामपुरीमार्गे आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठाचे गेट क्र. ८ आणि  तेथून राजमाता जिजाऊ साहेब सभागृहातील दीक्षान्त सभा मंडपामध्ये आगमन आणि  विसर्जन असा दिंडीचा मार्ग असेल. दिंडीनंतर सकाळी १०.०० वाजता ग्रंथ महोत्सवाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. ग्रंथ महोत्सव १६ व १७ जानेवारी असा दोन्ही दिवस सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर ११ वाजता संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तुकोबांची अभंगवाणी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर ग्रंथ महोत्सव आणि त्या निमित्त आयोजित ग्रंथ दिंडी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. धनंजय सुतार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment