![]() |
शिवाजी विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त समारंभातील पदवी प्रमाणपत्रे नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरीवर अपलोड करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
![]() |
शिवाजी विद्यापीठाने अपलोड केलेल्या विविध प्रमाणपत्रांची माहिती दर्शविणारा नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरीच्या होम पेजचा स्क्रीनशॉट. |
कोल्हापूर,
दि. १७ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या आज झालेल्या ६१ व्या दीक्षान्त
समारंभात प्रदान करावयाची सर्व ५१ हजार ४९२ पदवी प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ
संपन्न होताच नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरी (NAD) पोर्टलवर कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते अपलोड करण्यात आली. यामध्ये पोस्टाद्वारे
पाठवावयाच्या पदवी प्रमाणपत्रांचाही समावेश आहे.
६१ वा दीक्षान्त
समारंभ संपल्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डिपॉझिटरीवर पदवी प्रमाणपत्रे
अपलोड करण्याचा कार्यक्रम व्यवस्थापन परिषद सभागृहात झाला. कुलगुरूंनी एका माऊसक्लिकद्वारे
ऑनलाईन पद्धतीने ही प्रमाणपत्रे अपलोड केली आणि आता ती पदवीधारकांना उपलब्ध झाल्याची
घोषणा केली.
विद्यापीठाचा
परीक्षा विभाग आणि संगणक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने यासाठी सन २०२० पासून
काम करण्यात येत आहे. विद्यापीठात २०२० मध्ये नॅशनल
अॅकॅडेमिक डिपॉझिटरी (NAD) कक्ष सुरु झाला. या कक्षामार्फत सन
२००१ ते २०२४ या कालावधीतील (३७ वा ते ६० वा दीक्षांत समारंभ) पदवी, पदव्युत्तर
अभ्यासक्रमांची १०,०३,१९०
इतकी प्रमाणपत्रे NAD पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. आज
६१ व्या दीक्षान्त समारंभात द्यावयाची ५१,४९२ पदवी प्रमाणपत्रेही यशस्वीरित्या
अपलोड करण्यात आली. विशेष म्हणजे यामधील ३७,२२३ स्नातकांनी अनुपस्थितीत अर्थात
पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्रे मागविली आहेत. अशा पदवीधारकांनाही त्यांची पदवी
प्रमाणपत्रे आज त्यांच्या डिजीलॉकर खात्यांवर जाऊन डाऊनलोड करता येणार आहेत. तेथे पदवी
प्रमाणपत्र पाहण्यासाठी पदवीधरांना त्यांचा नोंदणी क्रमांक, सीट क्रमांक आणि उत्तीर्ण
झाल्याचे वर्ष ही माहिती द्यावी लागणार आहे. यंदाच्या वर्षापासून पदवीवरील क्यूआर
कोडमुळे पदवीचे व्हेरिफिकेशन करवून घेणेही संबंधित आस्थापनांना सहजशक्य होणार आहे.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.
अजितसिंह जाधव यांनी पोस्टाद्वारे पाठवावयाच्या ५००० पदवी प्रमाणपत्रांचा पहिला
संच रवाना झाला असल्याची माहिती दिली. यावर कुलगुरूंनी सर्व प्रमाणपत्रे शक्य
तितक्या लवकर रवाना व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. डिपॉझिटरीवर प्रमाणपत्र
अपलोड करण्याची कामगिरी करणाऱ्या सर्व टीमचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव
डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, संगणक केंद्र
संचालक अभिजीत रेडेकर, उपकुलसचिव निवास माने, दीपक अडगळे, डॉ. प्रल्हाद जाखले, कल्याण
देवरुखकर, शशिकांत हुक्केरी, आशिष घाटे, सागर आंबेकर, आनंद पाटील, विजय पाटील आणि
वृषभ बिंदगे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment