शिवाजी विद्यापीठातर्फे ‘तुकोबांची अभंगवाणी’ चित्रफीत-ध्वनीमुद्रिकेचे प्रकाशन
![]() |
शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'तुकोबांची अभंगवाणी' गाताना प्रख्यात गायिका डॉ. साधना शिलेदार |
![]() |
शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'तुकोबांची अभंगवाणी' गाताना प्रख्यात गायिका डॉ. साधना शिलेदार |
कोल्हापूर, दि. १६ जानेवारी: प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. साधना शिलेदार यांच्या मधुर अभंग गायनाने
कोल्हापूरकर रसिक आज मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या
दीक्षान्त समारंभाचे!
संतश्रेष्ठ तुकाराम
महाराज यांच्या आजवर संगीतबद्ध न केलेल्या निवडक अभंगांना संगीतबद्ध करून रसिकांना
सादर करण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाने बजावली आहे. आज
सकाळी विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त समारंभानिमित्त डॉ. साधना शिलेदार यांच्या
गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ‘तुकोबांची अभंगवाणी’ या सीडी स्वरुपातील चित्रफीत-ध्वनीमुद्रिकेचे
प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि मान्यवर अधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. शिलेदार यांनी या
ध्वनीमुद्रिकेसाठी गायिलेल्या काही अभंगरचनांचे सादरीकरण केले. संत तुकाराम
यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अभंगांना त्यांनी किती ताकदीने स्वरसाज चढविला आहे,
याची प्रचिती त्यांना ऐकताना रसिकांना येत होती. डॉ. शिलेदार यांनी तुकारामांचे
अभंग वेगवेगळ्या रागांमध्ये बांधले आहेत. या अभंगांमध्ये जोडोनिया कर, उभा राहिला
समोर (राग- रागेश्री, अहिर भैरव, ललत), देवा आता ऐसा करी उपकार (झिंझोटी), अगा ये
उदारा (बिहाग), आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने (जोग), उदंड देखिले (श्यामकल्याण,
नंद, शंकरा), रंगी रंगे नारायण (बिंद्रावती सारंग), हरी तुझे नाम गाईन अखंड (किरवाणी),
बोलावा विठ्ठल (विभास, तोडी) आणि आपुल्या माहेरा जाईन मी आता (भैरवी) यांचा समावेश
आहे. यातीलच काही निवडक रचना डॉ. शिलेदार यांनी आज सादर केल्या.
कार्यक्रमात सांगोल्याचे
ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी प्रत्येक अभंगरचनेविषयी अत्यंत समर्पक असे निवेदन
केले. डॉ. शिलेदार यांना कार्यक्रमात निखिल मडवी (तबला), केदार गुळवणी (व्हायोलिन),
डॉ. सचिन जगताप (बासरी), ऋषीकेश देशमाने (पखवाज), स्वरुप दिवाण (हार्मोनियम), हरिष
केळकर (साइड ऱ्हिदम व टाळ) या वादकांनी अत्यंत समर्थ साथ दिली. त्याचप्रमाणे
तंबोरा आणि कोरससाठी संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या अन्वी वालावलकर, अभय हावळ,
कौस्तुभ शिंदे आणि संपदा गावस या कलाकारांनी साथ केली.
लॉकडाऊनच्या काळात मिळालेले आनंदाचे काम
डॉ. साधना शिलेदार यांनी
आपल्या नागपूर येथील घरी कोविड-१९ च्या लॉकडाऊन काळात ‘तुकोबांच्या अभंगवाणी’ला चाली लावण्याचे काम
केले. त्या काळामध्ये मला आनंद देणारे असे काम होते, अशी भावना त्यांनी यावेळी
व्यक्त केली. तेव्हा अवघा एक हार्मोनियम आणि तबला अशा दोन साथीदारांच्या जोडीने
रेकॉर्डिंग केले होते. मात्र, शिवाजी विद्यापीठामध्ये इतक्या दर्जेदार
साथीदारांसमवेत तुकारामांचे अभंग सादर करताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, असे
उद्गार त्यांनी काढले.
यावेळी कुलगुरू डॉ.
शिर्के यांनी, डॉ. शिलेदार यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमासाठी दिलेला वेळ
आणि घेतलेली मेहनत यासाठी धन्यवाद दिले. त्यांच्या योगदानामुळेच एक अभिनव उपक्रम
लोकांसमोर येत आहे, याचा आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या
सुरवातीला कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते डॉ. शिलेदार यांच्यासह सर्व
कलाकारांचा पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘तुकोबांची अभंगवाणी’ या
चित्रफीत-ध्वनीमुद्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संत तुकाराम
अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर संगीत
व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला
विद्यापीठाचे अधिष्ठाता, अधिकारी, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी
यांच्यासह रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment