शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाची कामगिरी; १६ जानेवारीला गायनासह होणार प्रकाशन
![]() |
डॉ. साधना शिलेदार |
कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: महाराष्ट्राची वारकरी
परंपरा आपल्या बहुप्रसवी वाणीने समृद्ध करणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या
आजवर संगीतबद्ध न केलेल्या काही निवडक अभंगांना संगीतबद्ध करून रसिकांना सादर
करण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाने बजावली आहे.
विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त समारंभानिमित्त १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता आयोजित
विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात या विशेष चित्रफीत-ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन आणि सुप्रसिद्ध
गायिका डॉ. साधना शिलेदार यांचे गायनही आयोजित केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या
संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी या संदर्भात दिलेल्या
माहितीनुसार, संत तुकाराम यांच्या अनेक अभंगरचनांवर अनेक नामवंत गायक-गायिकांनी
स्वरसाज चढविला आहे. त्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियही आहेत. मात्र, त्याचवेळी
तुकाराम महाराजांच्या अनेक रचनांवर अद्याप सांगितिक स्वरसाज चढविण्यात आलेला नाही.
अशा दहा निवडक अभंग रचना स्वरबद्ध करण्याचे काम अध्यासनामार्फत
करण्यात आले. सुप्रसिद्ध गायिका डॉ. साधना शिलेदार यांनी त्यांचे गायन केले आहे.
त्याचप्रमाणे या रचना त्यांच्यासह श्रीकांत पिसे, राहुल एकबोटे, संकेत नागपूरकर,
दीपश्री पाटील या संगीतकारांनी संगीतबद्ध केल्या आहेत. ‘तुकोबांची अभंगवाणी’ या नावाने असलेल्या या चित्रफीत व ध्वनीमुद्रणाचे
प्रकाशन येत्या १६ जानेवारी रोजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात
येणार आहे.
विद्यापीठाच्या ६१व्या
दीक्षान्त समारंभाचे औचित्य साधून १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संत तुकाराम
अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये डॉ.
साधना शिलेदार यांचा विशेष गायन कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी या अभंगवाणीमधील रचना सर्वप्रथम
त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची संधी रसिकांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. या
कार्यक्रमास निवेदक म्हणून सांगोल्याचे ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर उपस्थित राहणार
आहेत. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित
राहणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत तुकाराम
यांच्या अभंगांच्या नवरचनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन डॉ. मोरे यांच्यासह डॉ. रणधीर
शिंदे आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment