कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: विद्यार्थ्यांना
पदवीच्या पलिकडे भावनिकदृष्ट्या सजग आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनविणे ही
आजच्या ‘ग्लोबल’ काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतातील तीन खाजगी विद्यापीठांचे माजी कुलगुरू तथा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अरूण पाटील यांनी काल (दि. १३)
येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या
विद्या परिषद सदस्यांसाठी डॉ. पाटील यांचे ‘करिक्युलम एनरिचमेंट’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात
आले. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,
कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. अरूण पाटील म्हणाले,
भारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सर्वदूर चर्चा आहे. कालसुसंगत अभ्यासक्रमांची
निर्मिती, विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य प्रदान, त्यामधून रोजगाराभिमुख पिढीची
निर्मिती आणि अशा पिढीचा राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सकारात्मक सहभाग ही
उद्दिष्ट्ये त्यामागे आहेत. जगभरातील विद्यापीठांनी अशा प्रकारचे शैक्षणिक धोरण
खूप आधीपासूनच स्वीकारले आहे. शिक्षकांना काय शिकवायचे आहे, यापेक्षा
विद्यार्थ्यांना काय शिकायचे आहे, त्यांच्या शैक्षणिक, संशोधकीय गरजा काय आहेत आणि
त्या कशा भागविता येतील, या दिशेने या समग्र शिक्षणाची दिशा केंद्रित झालेली आहे.
भारतीय शिक्षण व्यवस्था जितक्या लवकर अशा प्रकारचा दृष्टीकोण अंगिकृत करेल, तितके
ते हिताचे आहे.
डॉ. पाटील पुढे म्हणाले,
भारत आज सर्वाधिक तरुणांचा देश आहे. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा
कमी वयाची आहे. मात्र, या लोकसंख्येकडे आधुनिक अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी आवश्यक
असणाऱ्या कौशल्यांचा मात्र अभाव आहे. त्यामुळे देशातील एकूण पदवीधारकांपैकी अवघे ५१ टक्के पदवीधारक
रोजगारपात्र आहेत. या पार्श्वभूमीवर, रोजगाराभिमुखता, उद्योगाभिमुखता या तर
सार्वत्रिक गरजा आहेत. त्यांची प्रतिपूर्ती शैक्षणिक क्षेत्राला करावीच लागेल. पण
ती करीत असताना शैक्षणिक संस्था, विद्यापीठे केवळ पदवी प्रदान करणाऱ्या व्यवस्था
असता कामा नयेत, तर त्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धात्मकता विकसित
करण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी भावी पिढी ही भावनिकदृष्ट्या सजग,
नैतिकदृष्ट्या जबाबदार आणि प्रभावी संवादकौशल्यांनी युक्त बनण्यासाठी त्यांना पोषक
असे वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्राचीच आहे. ती या क्षेत्रातील धुरिणांनी
उचलण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सुमारे दोन तासांहून अधिक चाललेल्या व्याख्यानामध्ये
डॉ. पाटील यांनी केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक परिप्रेक्ष्यातून शिक्षण
क्षेत्राच्या सद्यस्थितीचा वेध घेतला आहे. भारतीय विद्यापीठांनी आपल्या वाटचालीची
दिशा काय ठेवली पाहिजे, या दृष्टीने त्यांनी केलेले मार्गदर्शन मौलिक स्वरुपाचे
ठरणारे आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्वच घटकांना आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव
करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेले आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना
घडविण्यासाठी सर्व घटकांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळे विभागाने उपकुलसचिव डॉ. संजय कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले.
No comments:
Post a Comment