कॉ. संपत देसाई |
कोल्हापूर, दि. २ जानेवारी: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची
सर्वप्रथम सैद्धांतिक मांडणी केली आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी हयातभर प्रखर
प्रयत्न केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई यांनी आज येथे
केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प
महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी
विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे आज महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘महर्षी शिंदे आणि महाराष्ट्रातील
जातिनिर्मूलनाचे लढे’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर
कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, महर्षी
शिंदे हे अस्पृश्यांच्या प्रश्नांवर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करणारे समाजसंशोधक
होते. या प्रश्नाच्या सोडवणुकीची निकड त्यांना भासत होती. त्यासाठी त्यांनी या
समस्येच्या अनुषंगाने उपलब्ध माहितीचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास व संशोधन करण्यावर
भर दिला. देशविदेशांत उपलब्ध माहितीचे वाचन व संशोधन केले. खानेसुमारीचा अभ्यास व
विश्लेषण केले. त्यातून भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची साधार मांडणी ते करू
शकले. आणि पुढे त्यांनी या कार्यास स्वतःला वाहून घेतले. स्पृश्यांच्या मनात
अस्पृश्यांविषयी सहानुभूती आणि सहभाव निर्माण करण्याचा निर्धार करून ते कामाला
लागले. त्यांच्या अथक प्रयत्नांतूनच हा मुद्दा राष्ट्रीय सभेच्या कार्यतालिकेवर
आला आणि १९१७च्या कलकत्ता अधिवेशनात अस्पृश्यताविरोधी ठराव पारित करण्यात आला.
महर्षी शिंदे यांनी धार्मिक अंधश्रद्धांवर प्रहार करण्याचेही काम केले.
आधुनिक काळातही
उत्पन्नाची साधने आणि मार्ग जातिव्यवस्थेच्या उतरंडीनुसार ठरविले जातात. या आधुनिक
जातिव्यवस्थेला धक्के देण्याची गरज आज निर्माण झाली असल्याचेही श्री. देसाई यांनी
सांगितले.
श्री. देसाई यांनी
आपल्या भाषणामध्ये भगवान गौतम बुद्ध, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, छत्रपती
शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने
गुरूजी, दलित पँथर, कॉ. शरद पाटील, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, १९७०च्या
दशकात उदयास आलेली स्त्रीमुक्तीची चळवळ आणि उच्चजाती परीघातून तिचे जाति-पितृसत्ता
अंतापर्यंत झालेले विचारपरिवर्तन, बाबा आढाव यांची ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ, मागोवा गट आणि त्यातून उदयास आलेली
डॉ. भारत पाटणकर, वाहरू सोनावणे यांचा श्रमिक मुक्ती दल आणि समन्यायी पाणी वाटप
चळवळ उभारणीला सूक्ष्म पातळीवर कारणीभूत असलेली जातिनिर्मूलनाची चळवळ यांचा
समग्र वेध घेतला. महर्षी शिंदे यांच्या चळवळीचा पायाविस्तार गेल्या शतकभरात
झालेल्या या सर्व चळवळींपर्यंत झाला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संपत देसाई यांच्या जातिनिर्मूलन लढ्याच्या व्यापक पट मांडणी
कौशल्याचे कौतुक केले. तसेच, विद्यापीठामध्ये अनेक अभ्यासक्रम सामाजिक कार्याशी
संबंधित आहेत. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन देसाई यांना केले. विद्यार्थ्यांना
देसाई यांच्या भाषणातून वाचनासाठी अनेक नवे संदर्भ मिळाले आहेत. हे सर्व
संदर्भग्रंथ मिळवून त्यांचे वाचन करण्यास त्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन
त्यांनी केले. महर्षी शिंदे यांच्या भगिनी जनाक्का शिंदे याही प्रचंड वाचनवेड्या
होत्या. त्यांचे चरित्रही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचेही वाचन
करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात अध्यासन
समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठी अधिविभाग प्रमुख
डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इंग्रजी अधिविभाग प्रमुख
डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले.
कार्यक्रमास बॅ.
बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, राज्यशास्त्र
अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह शिक्षक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment