![]() |
शिवाजी विद्यापीठात 'होय होय वारकरी' ग्रंथावरील चर्चेत बोलताना प्रा. प्रवीण बांदेकर. मंचावर डॉ. रणधीर शिंदे व प्राचार्य गोविंद काजरेकर |
![]() |
शिवाजी विद्यापीठात 'होय होय वारकरी' ग्रंथावरील चर्चेत बोलताना प्राचार्य गोविंद काजरेकर |
कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: वारकरी संप्रदायाच्या
परंपरांचा चिकित्सक वृत्तीने वेध घेणारे ‘होय होय वारकरी’ हे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, असे
मत प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचे संत
तुकाराम अध्यासन आणि मराठी अधिविभाग यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन
पंधरवड्यानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी’ या ग्रंथाविषयी आयोजित
करण्यात आलेल्या चर्चेत ते बोलत होते. चर्चेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग
गायकवाड आणि प्राचार्य गोविंद काजरेकर यांनीही सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
प्रा. बांदेकर म्हणाले,
वारकरी संप्रदायाच्या वाटचालीचा आणि परंपरांचा वर्तमानकालीन परिप्रेक्ष्यातून वेध
घेण्याचा प्रयत्न बंडगर यांनी या पुस्तकात केला आहे. केवळ कौतुक करणारे न लिहीता
अत्यंत परखडपणे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. संप्रदायातील
चांगल्या गोष्टी मांडतानाच वारकरी संप्रदायाच्या आडून समाजमन कलुषित करणाऱ्या
प्रवृत्तींचाही शोध ते घेतात. काळाच्या ओघात वेळोवेळी दडविल्या गेलेल्या गोष्टीही
पुराव्यानिशी प्रकाशात आणतात. त्याचप्रमाणे अनेक अलक्षित वारकरी, कीर्तनकार
यांचेही कार्य सामोरे आणतात. विविध जाती समुदायातील अज्ञात कीर्तनकारांची नावे यात
समजतात. जंगली महाराज, गणपती महाराज यांच्यासारख्या अनेक दुर्लक्षित राहिलेल्या प्रबोधकांचे
काम या पुस्तकामुळे माहिती झाले आहे. त्यांच्या कार्याविषयी स्वतंत्र पुस्तकांच्या
निर्मितीची आवश्यकता त्यातून अधोरेखित होते. अनेक वारकरी कथांचा इतका सुंदर
अन्वयार्थ बंडगरांनी लावला आहे की त्यातून महाकादंबरीच्या शक्यताही डोकावतात, असेही
ते म्हणाले.
संतसाहित्याचे अभ्यासक
डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, जिथला नागरिक वारी करतो, तो महाराष्ट्र; आणि सर्व जातीधर्मांचे
लोक एकत्र यावेत, याचे तत्त्वज्ञान सांगणारा तो महाराष्ट्र धर्म, असे वारकरी
संप्रदाय आणि महाराष्ट्राचे अभिन्न नाते आहे. सहभोजनाची परंपरा वारकरी संप्रदायाने
रुजविली. संतांनी लोकांना जोडून ठेवण्याचे काम सातत्याने केले. ज्ञानेश्वरी, भागवत
आणि तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ अवघ्या मानवतेचे सारस्वरुप आहेत. अस्पृश्यतेसह
कर्मकांडांची चिकित्सा करीत सर्वांना सामावून घेणारा असा वारकरी संप्रदाय आहे. या
संप्रदायाच्या समग्र गुणवैशिष्ट्यांची अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी बंडगर यांनी सदर
पुस्तकात केली आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
प्राचार्य गोविंद
काजरेकर म्हणाले, सांस्कृतिक धुरिणत्व भौतिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक
परिवर्तनासाठी आवश्यक असते. हे धुरिणत्व वारकरी संप्रदायाकडे संत ज्ञानेश्वर यांच्यापासून
ते नामदेव, तुकाराम यांच्याकडून आले. ज्ञानेश्वरीमध्ये वारकरी संप्रदायाची
बीजमांडणी करण्यात आली आहे. तेथे समताकांक्षी माणसांचा समुदाय अभिप्रेत असल्याचे माऊलींनी
सांगितले. ही मूल्यचौकट पुढे संत तुकाराम यांच्यापर्यंत प्रवाहित होत राहिली.
वर्तनव्यवहारातून संतांनी समतेचे आदर्श समाजासमोर मांडले. सहभोजन हे त्यामुळेच समानता
मूल्याचे प्रतीक ठरले. त्यातून समाजात सहभावाची जाणीव निर्माण झाली. बंडगर यांनी बहुजनवादी
परिप्रेक्ष्यातून या साऱ्याची मांडणी पुस्तकात केली आहे. वारकरी संचिताचा उलगडा
करीत असताना या तत्त्वज्ञानाच्या चलाख मारेकऱ्यांचाही त्यांनी यात समाचार घेतला
आहे. हे या पुस्तकाचे आगळे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के म्हणाले, समतेचा विचार प्रवाहीपणे सर्वदूर पसरविणारा वारकरी संप्रदाय
म्हणजे तत्कालीन समाजातील एक विद्यापीठच होते. माणसातले माणूसपण कायम जपण्याचे काम
वारी करीत असते. भक्तीरसाची प्रचिती घेण्यासाठी आणि आपले पाय जमिनीवर राहण्यासाठी
वारीचा अनुभव घेणे आवश्यक आहे. बंडगर यांनी विद्यापीठाच्या संत तुकाराम
अध्यासनाच्या माध्यमातून संतसाहित्याला आणखी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
सुरवातीला कुलगुरू डॉ.
शिर्के यांच्या हस्ते संत तुकाराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ग्रंथचर्चेचे
उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीपा गायकवाड संपादित ‘ज्ञानबातुकाराम’ या विशेष वार्षिकांकाचे कुलगुरू डॉ. शिर्के
यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लेखक ज्ञानेश्वर बंडगर यांनी ग्रंथाच्या
निर्मितीमागील प्रेरणांची माहिती दिली. संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ.
नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा
परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल
यांनी आभार मानले. कार्यशाळेला डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मनोहर
वासवानी यांच्यासह विविध महाविद्यालयांतील मराठीचे शिक्षक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment