Monday, 3 March 2025

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामुळे खेळाडूंना विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करण्याची मोठी संधी - कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के








कोल्हापूर, दि.03 मार्च - शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी गेली तीन वर्षे शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.  विद्यापीठाच्या खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागामार्फत आयोजित ^शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25* च्या उद्धाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.शिर्के बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तदनंतर, क्रीडापटूंचे उत्कृष्ट संचलन, विविध क्रीडाप्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आणि ज्योत प्रज्वलन या उपक्रमांनी आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या 'शिवस्पंदन क्रीडा महोत्सव-2025' चे शानदार उद्धाटन करण्यात आले. मैदानी स्पर्घा, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बुध्दिबळ, कबड्डी, हॉलिबॉल, क्रीकेट अशा सात क्रीडाप्रकारांमध्ये खेळाडू सहभागी झालेले आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी रोपटयास पाणी वाहून शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन तसेच ध्वजवंदन केले.  त्यानंतर विद्यापीठाच्या विविध 30 अधिविभागातील 2300 क्रीडापटूंनी उत्कृष्ट संचलन केले.

यावेळी विद्यापीठाची शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू स्वप्नाली वायदंडे हिच्या हस्ते उद्धाटनस्थळी क्रीडा ज्योतीचे आगमन झाले आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवस्पंदन स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करण्यात आली.यावेळी क्रीडापटूंनी जिम्नॅशियम, योगा, मल्लखांब, धर्नुविद्या, घोडेस्वारी या क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.आकाशात फुगे सोडून औपचारिक उद्धाटन झाल्याचे घोषित केले.स्वप्नाली वायदंडे हिने सहभागी खेळाडूंना शपथ दिली.क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.डॉ.एन.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.किरण पाटील यांनी आभार मानले.यावेळी अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, इनोव्हेशन, इनक्युबेशन लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ.सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केेंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, डॉ.तृप्ती करेकट्टी, डॉ.राजेंद्र सोनकवडे, डॉ.आण्णासाहेब मोहळकर, डॉ.केशू राजपुरे, डॉ राजाराम गुरव, डॉ राहुल माने, डॉ प्रशांत पाटील, डॉ राजेंद्र रायकर, डॉ धनंजय पाटील आदी उपस्थित होते.

                                                                                                   ----- 

Saturday, 1 March 2025

विज्ञान साहित्य भविष्यवेधी: प्रा. शिवकुमार सोनाळकर

 

शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानात बोलताना प्रा. शिवकुमार सोनाळकर

कोल्हापूर, दि. १ मार्च: विज्ञान साहित्य वर्तमानावर प्रकाश टाकून भविष्याचा वेध घेत असते, असे प्रतिपादन प्रा. शिवकुमार सोनाळकर यांनी आज केले.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि मराठी अधिविभाग आयोजित मराठी विज्ञान साहित्य या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी होते.

प्रा. सोनाळकर म्हणाले, विज्ञान साहित्य कल्पित वास्तवावर आधारलेले असते. विज्ञान साहित्यात जीवनाच्या सर्व धारा समाविष्ट असतात. विज्ञान साहित्यातून बौद्धिक आणि कलात्मक स्वरूपाचा आनंद मिळतो.

डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, विज्ञान साहित्याकडे  वाचकांनी डोळसपणे पाहिले पाहिजे. लेखकाची कल्पना हा विज्ञानातला नवा शोध असतो. विज्ञानसाहित्याच्या केंद्रस्थानी माणूसच असतो. त्यामुळे विज्ञान साहित्य मानवी जीवनाचा वेध घेते.

रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.काग्रजांनी आपल्या ले की. सहणून कुसु कविता या वि कैलास सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल देशमुख यांनी आभार मानले. इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. दीपक भादले यांच्यासह विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉ. दत्ता देशमुख हे महाराष्ट्राचे लोकशिक्षक: प्रा. राजू पांडे

 


शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा. राजू पांडे

 

कोल्हापूर, दि. १ मार्च: कॉ. दत्ता देशमुख यांनी ग्रामीण व शहरी भागातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे संघटन केले. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, कामगार वर्गामध्ये जाणीव जागृती केली. खऱ्या अर्थाने कॉ. दत्ता देशमुख हे महाराष्ट्राचे लोकशिक्षक होते, असे प्रतिपादन प्रा. राजू पांडे यांनी काल केले.

शिवाजी विद्यापीठाचे कॉ. दत्ता देशमुख अध्यासन आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉ. दत्ता देशमुख: व्यक्ती, विचार आणि कार्य या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कॉ. दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचाचे सचिव बाबुराव तारळी अध्यक्षस्थानी होते.

प्रा. पांडे म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांनी तत्त्वनिष्ठ राजकारण केले. आज महाराष्ट्रात संधीसाधू आणि तडजोडीचे राजकारण घडत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली होती. परंतु काँग्रेसमध्ये येऊन कदाचित मला सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळेल. मात्र ज्या शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी, कामगार समाजासाठी काम करतो. त्यांच्यासाठी काँग्रेसमध्ये मला कार्य करता येईल, याची शाश्वती नाही, असे म्हणत काँग्रेसमध्ये जाण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला. कॉ. दत्ता देशमुख हे खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. कारण त्यांनी रचनात्मक आणि विधायक कार्य केले. कॉ. देशमुख यांनी शेतकरी, कामगार समूहामध्ये समन्यायी भावना निर्माण करण्याचे काम केले. शेती प्रश्न, पाणी प्रश्न यांसह दुष्काळग्रस्त, विस्थापित, धरणग्रस्त, पर्यावरण, लोकसंख्या नियंत्रण अशा विविध घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी आवाज उठविला.

अध्यक्षीय मनोगतात बाबूराव तारळी म्हणाले, आपण एखाद्या संस्थेत काम करत असू आणि तिथे एक रुपयाचा फायदा झाला तर आपल्याला फक्त पंचवीस पैसे घेण्याचा नैतिक अधिकार असतो. ज्या संस्थेत आपण काम करतो, ती संस्था जिवंत ठेवली पाहिजे, असे दत्ता देशमुख म्हणायचे. तरुणांनी पुरोगामी विचारांची जपणूक करावी. विस्कटलेल्या महाराष्ट्राची घडी बसवावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. श्रीराम पवार, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. जयश्री कांबळे उपस्थित होते. डॉ. नेहा वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. अक्षय जहागिरदार यांनी आभार मानले.

कायद्याच्या उपयोजनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश शक्य: डॉ. स्वप्नील बंगाली

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. स्वप्नील बंगाली

शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. स्वप्नील बंगाली आणि डॉ. विवेक धुपदाळे यांच्यासमवेत उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी


 

कोल्हापूर, दि. १ मार्च: कायद्याच्या उपयोजनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश शक्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ डॉ. स्वप्नील बंगाली यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या विधी अधिविभामध्ये पीएम-उषा योजनेअंतर्गत व्हॅल्यू अॅडेड कोर्स ऑन ज्युडिशियल एक्झॅमिनेशन ट्रेनिंगया विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे होते.

डॉ. बंगाली म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने आज सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. या तंत्रज्ञानाचा कायद्याच्या क्षेत्रातही अत्यंत सकारात्मक वापर करून घेता येणे शक्य आहे. न्यायदानाची प्रक्रिया गतिमान होण्याच्या दृष्टीने न्यायपालिका नवतंत्रज्ञानाबाबत अत्यंत गंभीर आणि सकारामक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रात अॅड. संदीप मुतालिक (सांगली) यांनी कामगार न्यायालयाशी संबंधित कायद्यांची सविस्तर माहिती दिली. तिसऱ्या सत्रात डॉ. बंगाली यांनी “इंटरनेट ऑफ थिंग्स” या विषयावरही मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रातही त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व शंकासमाधानही केले.

यावेळी डॉ. आर. नारायणा, सुवर्णा कांबळे, अक्षय कोल्हापुरे, आकाश कुंभार, पूजा लोहार, वैष्णवी माळी आदी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात एका वर्षात मोती पिकला हो..!

 मोत्यांच्या शेतीचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी

शिवाजी विद्यापीठामधील मोत्यांच्या शेतीत निर्माण झालेला पहिला मोती

शिवाजी विद्यापीठात निर्माण झालेला पहिला मोती महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेट देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत वरिष्ठ अधिकारी.

प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रयोगशाळेत शिंपल्यांवर प्रक्रिया करताना विद्यार्थिनी

प्राणीशास्त्र अधिविभागातील प्रयोगशाळेत शिंपल्यांवर प्रक्रिया करताना विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे आणि दिलीप कांबळे.

(फाईल व्हिडिओ दि. २८ फेब्रुवारी २०२४: शिवाजी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचा गतवर्षीचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १ मार्च: शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी २८ फेब्रुवारी रोजी गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रयोग हाती घेतला. हा मोती पिकविण्याचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी झाला असून एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यशही आले आहे. विद्यापीठात पिकलेला पहिला मोती महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते भेट देण्यात आला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे समन्वयक तथा प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे यांनी गेल्या वर्षभरात या केंद्रामध्ये झालेल्या संशोधनाविषयी तसेच प्राप्त झालेल्या यशाबद्दल तपशीलवार माहिती दिली. डॉ. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्राणीशास्त्र अधिविभागाच्या परिसरात गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपयोजित संशोधन व विकासाची माहिती होण्याच्या दृष्टीने या केंद्राने कार्य करावे आणि त्यापासून मोजक्या विद्यार्थ्यांनी तरी यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचा मोत्याचा व्यवसाय करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार केंद्राने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मान्यतेने या ठिकाणी गोड्या पाण्यातील मोत्यांविषयी संशोधन व विकासाचे काम सुरू केले. मोती या क्षेत्रातील यशस्वी प्रयोगशील उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर प्राण्यांचे संगोपन करण्यास सुरवात केली. योग्य देखभाल आणि संवर्धनामुळे या शिंपल्यांपासून चांगल्या प्रकारचे मोती साकार होऊ लागले आहेत. त्यातील साधारण बारा महिन्यांचा पहिला मोती कुलपती महोदयांना कुलगुरूंच्या हस्ते भेट देण्यात आला. काही मोती शिंपले १८ महिन्यांपर्यंत ठेवण्यात येणार आहेत.

शिंपल्यांच्या देखभालीबाबत सांगताना डॉ. कांबळे म्हणाले, गतवर्षी आम्ही पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या १०० शिंपल्यांमधील मृत्यूदर अवघा २० टक्के इतका आढळला. म्हणजे शंभरातील ८० शिंपले जगले. सर्वसाधारणपणे यांचा मृत्यूदर हा ४० टक्क्यांच्या घरात असतो. तो कमी करण्यात आपल्याला यश आले. त्यासाठी आपण पाण्याच्या टाकीमधील पाणी नदीप्रमाणे प्रवाही राखले. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने कायम राखली. पाणी प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घेत पाण्याचा दर्जा दररोज तपासून त्याचे गुणधर्म कायम राहतील, या दृष्टीने प्रयत्न केले. महत्त्वाचे म्हणजे प्राण्यांची योग्य देखभाल करताना त्यांना आवश्यक त्या प्रमाणात अन्नपुरवठा केली. संशोधनाचा भाग म्हणून दरमहा तीन प्राण्यांचे निरीक्षण केले आणि त्यांचे निष्कर्ष नोंदविले. प्राण्याचे वय, वजन, त्याची संवेदनक्षमता आदी गुणधर्मांचाही अभ्यास केला. त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली. विशेषतः हवेतील दूषित घटक पाण्यात मिसळून त्याला कोणते विकार होणार नाहीत, याचीही काळजी घेतली. प्रि-ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह या तिन्ही टप्प्यांमधील सर्व प्रक्रिया जंतूसंसर्गविरहित पद्धतीने होतील, याचीही दक्षता घेतली. यामुळे ही प्रक्रिया ९९.०५ टक्के प्राण्यांनी स्वीकारली, हे या प्रयोगाचे महत्त्वाचे यश आहे.

कमी भांडवलात उत्तम व्यवसायाच्या शक्यता

डॉ. नितीन कांबळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांचे या उपक्रमात भरीव योगदान व कष्ट आहेत. विभागातील भाग-२ चे विद्यार्थी नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन ऑन जॉब ट्रेनिंग आणि कौशल्य आधारित उपक्रम म्हणून मोती संवर्धन केंद्राच्या संशोधन व विकास कार्यात सहभाग नोंदवत आहे. सदर प्रकल्पावर पी.एच. डी.चे संशोधनही सुरू आहे. पारंपरीक शेतीला पर्याय तसेच जोडव्यवसाय म्हणून विद्यार्थी व शेतकरी या क्षेत्राची निवड करू शकतात. मोत्यांची योग्य प्रकारे शेती (लागवड) करून उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो. योग्य प्रशिक्षण, कठोर नियोजन आणि उत्तम बीज या पासून चांगल्या प्रकारच्या मोत्यांचे उत्पादन मिळते. मोत्यांच्या लागवडीसाठी फारसे भांडवल लागत नाही. केवळ जागा अगर कृत्रिम वा नैसर्गिक तलाव आणि प्राथमिक २५ ते ३० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत ते लाखांचे उत्पन्न मिळू शकते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सौंदर्यालंकार, औषध क्षेत्रामध्ये दर्जेदार मोत्यांना मोठी मागणी आहे.

मोत्यांचा इतिहास आणि निर्मिती

डॉ. कांबळे यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये मोत्यांचे महत्त्व केवळ अलंकार म्हणूनच नव्हे, तर आयुर्वेदातही ठळकपणे नमूद आहे. हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये मोती संगोपन, संशोधन व उत्पादन सुरू आहे. समुद्रातील शिंपल्यांपासून मोती तयार होत असल्याचे अनेक ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ सापडतात. चीनमधील शांघाय प्रदेशात गोड्या पाण्यातील शिंपल्यांसह सवंर्धित मोती तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. तेव्हापासून चीन जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मोती संवर्धक व उत्पादक देश  बनला. चीनमध्ये दरवर्षी १५०० मेट्रीक टनांपेक्षा जास्त मोती उत्पादन होते.

मोती (Pearl) हे एक रत्न म्हणून ओळखले जाते. महत्वाचे म्हणजे नेक्रियस मोती प्रामुख्याने मोलस्कन बायव्हल्व्ह किंवा क्लॅमच्या दोन गटांद्वारे तयार केले जाते. सर्व कवचयुक्त मोलस्क नैसर्गिक प्रक्रियेद्वारे जेव्हा एखादया त्रासदायक सूक्ष्म वस्तूला सामोरे जातात, तेव्हा ते प्राण्यांच्या आवरणांच्या पटांमध्ये अडकल्याने नेक्रियस थर स्रवतात. अशा जिवंत प्राण्यांमध्ये मानवी हस्तक्षेपांशिवाय (नैसर्गिकरित्या) किंवा हस्तक्षेप करून (कृत्रिमरित्या) वेगवेगळ्या प्रमाणात आणि विविध क्षमतेचे चमकदार मोती तयार केले जातात, असेही त्यांनी सांगितले.

Friday, 28 February 2025

नेहरुंच्या विज्ञानवादी दृष्टीकोनामुळेच भारत स्वयंपूर्ण: डॉ. श्रीराम पवार

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीराम पवार.
 
शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीराम पवार. मंचावर डॉ. प्रल्हाद माने आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामधील योगदान फार मोलाचे आहे. त्यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे भारत स्वयंपूर्ण बनला, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, संपादक डॉ. श्रीराम पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

डॉ.पवार म्हणाले, नेहरूंना समजून घेणे म्हणजे आधुनिक भारत समजून घेणे आहे. नेहरूंनी भाक्रा-नानगल धरण प्रकल्प, आय.आय.टी सारख्या शिक्षण संस्था, परमाणू ऊर्जा आयोग आणि इस्रोसारख्या संस्थांची पायाभरणी करून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास केला. कृषी, उद्योग आणि अंतराळ क्षेत्रातील त्यांचे द्रष्टेपण हे भारताच्या आधुनिकतेला नवे परिमाण प्राप्त करून देणारे ठरले. नेहरूंनी शस्त्रास्त्र स्पर्धेपेक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला. त्यांच्या धोरणांमुळे भारत विज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर बनला.

डॅा.पवार यांनी नेहरूंच्या तुरुंगवासातील चिंतन, लेखन आणि विज्ञानवादी विचारसरणीवर देखील प्रकाश टाकला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, भारताच्या जैवविविधतेचे, वनस्पतींच्या जातींच्या सर्वेक्षणाचे धोरण नेहरूंनी आखले होते. भारताच्या कृषी जगताला वेगळी ओळख देवून हे राष्ट्र सुजलाम - सुफलाम बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. अणुऊर्जा, अंतराळ अभ्यास क्षेत्रामध्ये भारत सरस ठरण्यापाठीमागे नेहरुंचे कार्य कारणीभूत आहे.

कार्यक्रमाला डॅा.जगन कराडे यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. नेहरु अभ्यास केंद्राचे समन्वयक डॅा.प्रल्हाद माने यांनी प्रास्ताविक केले. मतीन शेख यांनी सूत्रसंचालन केले. सुहास रोमणे यांनी आभार मानले.