Wednesday, 7 January 2026

वंचितांच्या जगण्याचा इतिहास सामोरा यावा: प्रा. ज्ञानेंद्र पांडेय

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ प्रा. ज्ञानेंद्र पांडेय. मंचावर (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अवनीश पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ प्रा. ज्ञानेंद्र पांडेय.


कोल्हापूर, दि. ७ जानेवारी: वंचित, उपेक्षितांच्या जगण्याचा आणि अनुभवाचा इतिहास लिहीणे अत्यंत कठीण असते, पण तोच खरा दुर्लक्षित इतिहास आहे. तो सामोरा आणण्याचे काम नव्या पिढीतील इतिहास अभ्यासक, संशोधकांना करावयाचे आहे, असे प्रतिपादन अटलांटा (अमेरिका) येथील एमोरी विद्यापीठाचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ प्रा. ज्ञानेंद्र पांडेय यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात सोमवारी (दि. ५) इतिहास, इंग्रजी, मराठी, हिंदी आणि विदेशी भाषा अधिविभागांच्या संयुक्त विद्यमाने दुर्लक्षित इतिहास: लपलेल्या इतिहासाची पुनर्प्राप्ती या विषयावर आयोजित विशेष शैक्षणिक व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते, तर डॉ. माया पंडित प्रमुख उपस्थित होत्या.

इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर क्रांतीची प्रक्रिया सतत कार्यरत असल्याचे सांगून प्रा. ज्ञानेंद्र पांडेय म्हणाले, समाज, राजकारण, संस्कृती आणि विचारप्रवाह यांमध्ये होणारे बदल हे क्रांतीचेच स्वरूप असून आजच्या काळातील डिजिटल क्रांतीने इतिहास लेखन व संशोधनाच्या पद्धतींमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. इतिहासामध्ये केवळ काही निवडक नेत्यांचाच नव्हे, तर सर्वसामान्य जनता, उपेक्षित वर्ग, स्त्रिया यांच्यासह विविध सामाजिक घटकांचाही सक्रिय सहभाग असतो. इतिहास लेखनात या घटकांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिल्याने इतिहासाचा समग्र आशय समोर येत नाही. भविष्यातील इतिहास मात्र केवळ मोठ्या लढायांचा किंवा नेत्यांचा नसावा. तो इतिहास अशा सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित योगदानकर्त्याचा असावा आणि तो त्याच्या नजरेतून, अनुभवातून लिहीला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्त्रिया आणि कृष्णवर्णीय समाजाचा इतिहास मोठ्या प्रमाणावर 'अनार्काइव्हड' म्हणजेच अलिखित व दडपलेला राहिला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या समाजघटकांचे अनुभव, स्मृती व संघर्ष इतिहासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आजच्या इतिहासकारांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. यावेळी डॉ. गोपाळ गुरू, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. शरद नावरे, डॉ. शरद भुथाडिया यांच्यासह विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tuesday, 6 January 2026

पत्रकारांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा सजग वापर आवश्यक: डॉ. सदानंद मोरे

मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील दहा विद्यापीठांचे विशेष ऑनलाइन व्याख्यान

मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सहभागी झालेले डॉ. अंबादास भासके, डॉ. मीरा देसाई, प्रा. योगेश बोराटे, डॉ. विश्राम ढोले, डॉ. तेजस्विनी कांबळे आदी.


कोल्हापूर, दि.६ जानेवारी: मुद्रणकलेनंतर जर कोणती मोठी क्रांती झाली असेल, तर ती कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची आहे. पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग झाले असले, तरी मानवी मेंदूला टक्कर देण्याची क्षमता असलेली कृत्रिम बुद्धीमत्ता ही अत्यंत संवेदनशील बाब असून, याचा  वापर पत्रकारांनी अधिक सजगता आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांतर्फे आज  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ऑनलाईन व्याख्यानाचे हे सहावे वर्ष आहे. या संयुक्त कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपूर), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (सोलापूर), मुंबई विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (मुंबई) सहभागी झाले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले आणि प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. मोरे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेचा शोध अनेक वर्षांपूर्वी लागला असला, तरी सध्या तिचा वापर सर्वच क्षेत्रांत झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाला जसे सकारात्मक व नकारात्मक पैलू असतात, तसेच एआयचेही आहेत. त्यामुळे पत्रकारांनी एआय-साक्षर होत या तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले यांनी एआयमुळे बातम्यांमध्ये साचेबद्धता वाढण्याचा धोका असल्याचे नमूद केले. वृत्तपत्रांच्या मांडणीसाठी, मुद्रित शोधासाठी तसेच आकर्षक हेडींगसाठी एआयचा वापर होत असला, तरी चुकीची माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढल्याने फॅक्ट-चेकिंगला अधिक महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. योगेश बोराटे यांनी माध्यमांमध्ये एआयचा उपयोग केवळ मजकूरनिर्मितीपुरता न ठेवता बहुआयामी पद्धतीने शोधपत्रकारितेसाठीही प्रभावीपणे करता येऊ शकतो, असे  नमूद केले.
ऑनलाइन व्याख्यानात, डॉ. निशा मुडे-पवार (विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),  डॉ. राम भावसार (प्र-संचालक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), . डॉ.संजय तांबट (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे),  डॉ. माधवी रेड्डी (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे),  डॉ. दिनकर माने  (विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर),  डॉ. सुहास पाठक (संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड),  डॉ. प्रभाकर कोळेकर (प्र-विभागप्रमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर),  डॉ. प्रबास साहु (प्र-विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर),  डॉ. सुंदर राजदिप (विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई), . मीरा देसाई (विभागप्रमुख, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई) आणि प्रा. डॉ. सरफराज अन्सारी (विभागप्रमुख, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) यांनी मनोगत केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तांबट यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. डॉ. गोपी सोरडे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी डॉ. वृषाली बर्गे, डॉ. मनीषा मोहोड, रोहित देशमुख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात राज्यातील विविध विद्यापीठांतील  विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग  नोंदविला.

शिवाजी विद्यापीठात आकर्षक शोभायात्रेने ‘शिवस्पंदन’ सुरू

छत्रपती शिवरायांसह शाहू महाराज, फुले दांपत्य, राज कपूर अवतीर्ण; विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित शिवस्पंदन महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवाला आकर्षक शोभायात्रेने प्रारंभ झाला. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव  आणि संयोजन समिती सदस्य यांच्यासमवेत शोभायात्रेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे सादरीकरण


शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत शेतकऱ्यांप्रती आदर व सहानुभूतीची अपेक्षा बाळगत सहभागी झालेले विद्यार्थी

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत विविध कलाकारांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रा

शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत विविध महामानव आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पेहराव्यातील विद्यार्थी







कोल्हापूर, दि. ६ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला आज सकाळी अत्यंत आकर्षक व दिमाखदार शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आहे.

या शोभायात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह राज कपूर, नर्गीस, दादा कोंडके, उषा चव्हाण, व्ही. शांताराम, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सिमी गरेवाल आदी कलाकारांच्या व्यक्तीरेखाही विद्यापीठाच्या प्रांगणात अवतरल्या. त्याखेरीज सहभागी अधिविभागांच्या संघांनी अतिशय कल्पकतेने प्रबोधनपर विषयांचे सादरीकरण शोभायात्रेद्वारे केले. शेतकरी, महाराष्ट्राची लोकसंस्कृती, सण व परंपरा, भारताच्या विविध प्रांतांमधील नागरिकांच्या वेशभूषा, आजची मल्टिटास्किंग महिला इत्यादींचेही दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ वेशभूषेवरच समाधान मानता शेतकरी आत्महत्या, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षण, मतदार जागृती व लोकशाही, वास्तव आणि आभासी जगातील फरक इत्यादींविषयीही सादरीकरण करून लक्ष वेधून घेतले. विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनीही शोभायात्रेत आवर्जून सहभाग घेतला.

आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. मीना पोतदार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार आणि डॉ. प्रमोद कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य इमारतीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घालून हलगी व ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य इमारतीसमोर सहभागी संघांनी आपापल्या विषयाच्या अनुषंगाने अत्यंत देखणे सादरीकरण केले.

शिक्षणापलिकडे विचारांची सौहार्दपूर्ण देवाणघेवाण अपेक्षित: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव

शोभायात्रेनंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शिवस्पंदन महोत्सवाचे प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी विद्यापीठात शिक्षण घेणे आवश्यकच आहे. तथापि, त्यापलिकडे जाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी विचारांची सौहार्दपूर्ण देवाणघेवाण करावी, हाच हेतू शिवस्पंदनच्या आयोजनामागे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरकर्त्यांबरोबरच प्रेक्षकांनाही प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आपल्या सादरीकरणातून प्रबोधनपर संदेश देणारे विद्यार्थी एक प्रकारे शिक्षकाचेच काम करतात, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत केलेले सादरीकरण हे त्यांचे समाजभान जागृत असल्याचे निदर्शक आहे. निरोगी मन आणि शरीर यासाठी कला ही महत्त्वाची ठरते. समोरच्या सादरकर्त्याला दाद देणे ही सुद्धा एक कला आहे. ती सुद्धा मनापासून जोपासली पाहिजे.

यावेळी डॉ. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद कसबे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. यावेळी डॉ. मदनलाल शर्मा, संग्राम भालकर, सुरेखा अडके आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वच स्पर्धांना उत्तम प्रतिसाद

उद्घाटन समारंभानंतर राजर्षी शाहू सभागृहात दिवसभर सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन, समूहगीत स्पर्धा आणि लोकवाद्य वादन ताल उत्सव झाला. त्याचप्रमाणे रांगोळी आणि स्थळचित्रण स्पर्धा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात पार पडल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

महोत्सवात उद्या...

उद्या, बुधवारी (दि. २४) राजर्षी शाहू सभागृह येथे मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका या स्पर्धा होतील. रसिकांनी त्यांचा आवर्जून आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Monday, 5 January 2026

सावित्रीबाई फुले वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आद्य महिला सुधारक: डॉ. माणिकराव साळुंखे

शिवाजी विद्यापीठात महिला शास्त्रज्ञांविषयी एकदिवसीय कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. भारती पाटील, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. चेतना सोनकांबळे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे..

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.


(कार्यशाळेची लघुचित्रफीत)






कोल्हापूर, दि. ५ जानेवारी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आद्य महिला समाजसुधारक होत्या, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे स्त्री अभ्यास केंद्र, शिक्षणशास्त्र अधिविभाग, विद्यार्थिनी वसतिगृह, बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठातील महिला शास्त्रज्ञ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा आज राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या.

डॉ. साळुंखे म्हणाले, सावित्रीबाई फुले या बुद्धीवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत होत्या. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आजच्या महिलांमध्ये आत्माभिमान जागृत झाल्याचे दिसते. त्यांच्याविषयी प्रत्येक महिलेने कृतज्ञ असले पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात आज कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक प्रश्न निर्माण केले असले तरी मानवी प्रज्ञेला पर्याय नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला पर्याय ठरू शकत नाही. मात्र त्यासाठी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. त्यासाठी ग्रंथालयांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. विकसित भारत साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना काय विचार करावा याऐवजी कसा विचार करावा, हे शिकविण्याची नितांत गरज आहे.

महिलांच्या जागतिक योगदानाचा वेध घेताना डॉ. साळुंखे यांनी मेरी क्युरी, कमला सोहोनी आणि डॉ. कृष्णाबाई केळवकर यांची उदाहरणे दिली.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिकाच नव्हत्या, तर कवयित्री, शास्त्रज्ञ, प्लेगच्या साथीत लोकांना आधार देणाऱ्या सेवाभावी परिचारिकाही होत्या. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रेरणेतूनच व्यक्तीगत पातळीवर माझ्यात शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करण्याची ऊर्मी निर्माण झाली. आज शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. असे असूनही राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये त्यांचा वाटा अवघा १७ टक्केच का आणि कसा, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महिलांनी मातृत्व आणि कर्तृत्व यांचा समतोल साधून राष्ट्रीय योगदान देण्यास सिद्ध झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यापीठातील आघाडीच्या महिला संशोधक डॉ. ज्योती जाधव, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. वर्षा जाधव, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. कविता ओझा आणि डॉ. आसावरी जाधव यांचा डॉ. साळुंखे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रात या संशोधकांनी उपस्थित महिलांसमवेत मुक्त संवाद साधला.

सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रोपास पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भारती पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. तानाजी चौगुले, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह विविध अधिविभागांतील महिला अध्यापक, संशोधक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 3 January 2026

शिवाजी विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

          

कोल्हापूर, दि.3 जानेवारी - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यापीठातील महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, डॉ.भारती पाटील, डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.मच्छिद्र गोफणे, डॉ.चेतना सोनकांबळे, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ.माधुरी वाळवेकर, डॉ.मीना पोतदार, डॉ.कविता वड्राळे, डॉ.निलांबरी जगताप, उपकुलसचिव श्रीमती संध्या अडसुळे, डॉ.प्रमोद पांडव, श्रीमती सुनिता यादव, वैशाली सावंत, ज्योती खराडे, राजश्री पाटील, प्रियांका पाटील, शोभा घागरे आदी उपस्थित होते.त्याचबरोबर, विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागामध्येही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

-------




शिवाजी विद्यापीठात साकारणार ‘प्रा. जी. व्ही. जोशी स्मृती वनस्पती संग्रहालय’

शैलजा जोशी यांच्याकडून ३५ लाख रुपयांची उदात्त देणगी; सामंजस्य करारावर स्वाक्षरी

शिवाजी विद्यापीठात प्रा. जी.व्ही. जोशी स्मृती वनस्पती संग्रहालय स्थापन करण्यासंदर्भात शैलजा जोशी आणि कुटुंबियांसमवेत सामंजस्य कराराचे हस्तांतरण करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि श्रीमती जोशी. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राजाराम गुरव, डॉ. निखील गायकवाड, डॉ. जी.बी. दीक्षित, डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्यासह महेश जोशी व कुटुंबिय आणि शिक्षक.

शिवाजी विद्यापीठात प्रा. जी.व्ही. जोशी स्मृती वनस्पती संग्रहालय स्थापन करण्यासंदर्भात शैलजा जोशी आणि कुटुंबियांसमवेत सामंजस्य कराराचे हस्तांतरण करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि श्रीमती जोशी. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राजाराम गुरव, डॉ. निखील गायकवाड, डॉ. जी.बी. दीक्षित, डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. संदीप पाटील यांच्यासह महेश जोशी व कुटुंबिय आणि शिक्षक.


प्रा. डॉ. जी.व्ही. जोशी



कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. जी. व्ही. जोशी यांच्या कुटुंबियांमध्ये विद्यापीठात ‘प्रा. जी. व्ही. जोशी स्मारक वनस्पती संग्रहालय’ (बॉटेनिकल म्युझियम) स्थापन करण्याबाबत काल (दि. २) सामंजस्य करार करण्यात आला.

या संग्रहालयाच्या स्थापनेसाठी प्रा. जोशी यांच्या पत्नी श्रीमती शैलजा गोविंद जोशी (वय ९२) यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून साठवलेले ३५ लाख रुपये विद्यापीठास देणगी देण्याचा उदात्त निर्णय घेतला. यातील २ लाख रुपयांचा पहिला हप्ता त्यांनी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. हा प्रसंग उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या हृद्य कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी पुण्याहून ऑनलाईन उपस्थित राहिले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने समाजातील विविध घटकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपलेपणाचे नाते जोडले आहे. नागरिकांच्या दातृत्वातून लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह, विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका यांसारख्या वास्तू या परिसरात साकारल्या आहेत. डॉ. जोशी यांच्या कुटुंबियांचे दातृत्व त्याचेच एक आदर्श उदाहरण आहे. त्यांची अपेक्षापूर्ती होईल, अशा स्वरुपाचे उत्तम संग्रहालय विद्यापीठ विहीत मुदतीत साकारेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी जोशी कुटुंबियांच्या दातृत्वाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या भावी पिढ्यांसाठी सदरचे संग्रहालय अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल. डॉ. जोशी यांच्या स्मृती याद्वारे चिरंतन राहतील.

विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजाराम गुरव यांनी डॉ. जोशी यांच्या स्मृतींना उजाळा देऊन या सामंजस्य कराराची पार्श्वभूमी विषद केली. ते म्हणाले, डॉ. जी. व्ही. जोशी यांनी १९६७ ते १९८२ या कालावधीत सुमारे १५ वर्षे वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रभावी नेतृत्व केले. विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नावावर १०० हून अधिक शोधनिबंध असून त्यांच्या संशोधनामुळे शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. २४ जुलै १९८२ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. सुमारे ४३ वर्षांनंतर, मार्च २०२५ मध्ये शैलजा जोशी आणि त्यांच्या मुली मृणालिनी (अंजली) जोशी व मेघा जोशी यांनी वनस्पतीशास्त्र अधिविभागाला भेट देऊन प्रा. जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वनस्पती संग्रहालय स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातूनच या सामंजस्य कराराची पूर्तता होत आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात शिक्षक, संशोधक, बॉटॅनिकल गार्डन, हार्बेरियम, ग्रंथालय आणि संग्रहालय या बाबींची आवश्यकता असते. शिवाजी विद्यापीठातील वनस्पती संग्रहालयाची कमतरता या सामंजस्य करारामुळे भरून निघाली असून अधिविभागाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे.

भविष्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारेसंशोधनाभिमुख व जनजागृती करणारे असे हे केंद्र ठरावेअशी अपेक्षा यावेळी शैलजा जोशी यांनी व्यक्त केली.

या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि शैलजा जोशी (मुंबई) यांच्यासह त्यांची कन्या अंजली अनिल पाठक (अमेरिका), मेघा गोविंद जोशी (अमेरिका) आणि पुत्र महेश गोविंद जोशी (अमेरिका) यांनी स्वाक्षरी केल्या.

वनस्पती संग्रहालयात काय असेल?

या प्रस्तावित ‘प्रा. जी. व्ही. जोशी स्मृती वनस्पती संग्रहालया’त प्रा. जोशी यांचे जीवनकार्य, संशोधकीय योगदान, तसेच वनस्पतींच्या उत्क्रांतीपासून आधुनिक वनस्पतीशास्त्रातील प्रगतीची माहिती आकर्षक स्वरूपात मांडली जाणार आहे. यामध्ये कीटकभक्षी वनस्पती, दुर्मीळ व स्थानिक प्रजाती, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पती, लाकडांचे प्रकार (झायलॅरियम), मसाले व सुगंधी वनस्पती, वनस्पती-प्राणी परस्परसंवाद, मॉडेल्स, छायाचित्रे, चित्रे व शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त अशा विविध घटकांचा समावेश असेल.

यावेळी या सामंजस्य करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. अधिविभाग प्रमुख डॉ. निखील गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. स्वरुपा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास महेश जोशी, पूर्वी जोशी, साहील व मिहीर जोशी, डॉ. संदीप पाटील, माजी शिक्षक डॉ. पी.डी. चव्हाण, डॉ. बी.ए. कारदगे, डॉ. जी.बी. दीक्षित, डॉ. एम.एम. डोंगरे, डॉ. एन.एस. चव्हाण आणि डॉ. एस.एस. कांबळे यांच्यासह वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 2 January 2026

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ प्राप्त करून देऊ या: आनंद पेंटर

शिवाजी विद्यापीठात पर्यावरणविषयक स्पार्क चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. अनमोल कोठडिया, आनंद पेंटर, हरिष सायवे, रमेश चव्हाण, शरद आजगेकर, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. बापू चंदनशिवे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लेखक-दिग्दर्शक आनंद पेंटर. मंचावर (डावीकडून) डॉ. शिवाजी जाधव, रमेश चव्हाण, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, हरिष सायवे आणि शरद आजगेकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लेखक-दिग्दर्शक आनंद पेंटर

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.


(स्पार्क फिल्म फेस्टीव्हल उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २ जानेवारी: कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला पुन्हा सुवर्णकाळ प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. नवोेदित चित्रपटकर्मीमध्ये पर्यावरणविषयक जाणीवानिर्मितीच्या दृष्टीने स्पार्क चित्रपट महोत्सव हा महत्त्वाची नांदी ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक आनंद पेंटर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा बी.ए. फिल्म मेकिंग विभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. आणि लक्ष्मी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पार्क फिल्म फेस्टीव्हल- राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट/ माहितीपट स्पर्धा-२०२५च्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी रमेश चव्हाण, हरिष सायवे आणि शरद आजगेकर प्रमुख उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्यभरातून आलेले एकूण २६ लघुपट आणि माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

आनंद पेंटर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांच्या प्रेरणेतून कोल्हापूर हे कलापूर म्हणून प्रसिद्धीला आले. अनेक नामवंत कलाकारांची देणगी या शहराने जगाला दिली. चित्रपटसृष्टीचे मधयवर्ती केंद्र म्हणून कार्य करताना ते प्रयोगशीलतेचे कोल्हापूर स्कूल ठरले. आता चित्रपटसृष्टी राज्यभरात पसरली असताना कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी नव्या पिढीने घ्यायला हवी. चित्रपट उद्योगाला चांगल्या, कुशल आणि प्रतिभावान कलाकारांची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाचा बी.ए. फिल्म मेकिंग विभाग मोठे काम करीत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भोवतालाकडे संवेदनशीलतेने पाहायला हवे आणि समर्पणशील वृत्तीने या क्षेत्रात काम करायला हवे, तरच यशाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य आहे.

रमेश चव्हाण यांनी स्पार्क फिल्म फेस्टीव्हलमधील सर्वोत्कृष्ट लघुपटांना किर्लोस्करच्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येईल, असे सांगितले. तर, हरिष सायवे यांनी किर्लोस्करतर्फे घेण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर पर्यावरणपूरक उपक्रमांना शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आवश्यक अशा सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या सुविधांचा वापर विद्यार्थी त्यांच्या व्यक्तीगत ऊर्जेने कितपत वापरतात, हा भाग फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे क्षमतावर्धन करीत असताना उपलब्ध सुविधांचा पुरेपूर लाभ घेत आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात आणि चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. जाधव यांनी आपल्या कुटुंबियांचा मा. विनायक, बेबी नंदा यांच्याशी असलेल्या स्नेहबंधांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जान्हवी लायकर यांनी परिचय करून दिला. साक्षी वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्मित कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. बापू चंदनशिवे, डॉ. अनमोल कोठडिया, लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. जयप्रकाश पाटील, डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह राज्यभरातून आलेले लघुपट-माहितीपट दिग्दर्शक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.