शिवाजी विद्यापीठात क्रीडा अधिविभागाच्या एकदिवसीय मेळाव्यात संबोधित करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.टी. गायकवाड, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.
शिवाजी विद्यापीठात क्रीडा अधिविभागाच्या एकदिवसीय मेळाव्यात संबोधित करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.टी. गायकवाड, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.
कोल्हापूर, दि. २९
नोव्हेंबर: क्रीडापटूंमध्ये
आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडाकौशल्य विकास आणि करिअरच्या संधी व सुविधा उपलब्ध
व्हायला हव्यात, यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे, असे
प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे विद्यापीठ परिक्षेत्रातील
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय
मेळाव्यामध्ये अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ.
पी.एस. पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील व संजय जाधव
प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठ सक्षमपणे
क्रीडापटूंच्या पाठीशी उभे राहिले तर त्यांच्या गुणवत्तेत व यशामध्ये भरीव वाढ
होईल, या अपेक्षेतून विद्यापीठाकडून खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत चर्चा करून
त्यांच्या समस्या सोडविण्याची भूमिका प्रशासनाची आहे. अॅड. धैर्यशील पाटील यांच्या
अध्यक्षतेखालील समितीने त्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत भरीव काम केले आहे.
अनेक विधायक सूचना केल्या आहेत. खेळाडूंना क्रीडाप्रकारानुसार आहार, प्रशिक्षण,
संसाधने, साधने आदी बाबी उपलब्ध करून ‘मिशन ऑलिंपिक’ हे कायमस्वरुपी लक्ष्य आपल्या क्रीडापटूंसमोर राहावे, या दिशेने विद्यापीठाने
लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भातील विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यास
विद्यापीठ सदैव तत्पर आहे.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, केवळ
ऑलिंपिकसाठी म्हणून मुलांना वयाच्या सातव्या वर्षापासून प्रशिक्षित करणाऱ्या
चीनसारख्या देशांशी आपली स्पर्धा आहे. त्यांच्याशी स्पर्धा करावयाची तर तशी
कार्यप्रणाली, पायाभूत सुविधा आणि तयारी विकसित करावी लागेल. आपल्या मातीतल्या तरुणांत
क्रीडाकौशल्ये भरपूर आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची मात्र नितांत
आवश्यकता आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा या जिल्ह्यांतील
विद्यार्थ्यांसाठीही असे मेळावे घेऊन त्या सर्वांच्या सूचनांचा एकत्रित बृहतआराखडा
आपल्याला तयार करता येऊ शकेल.
यावेळी अॅड. धैर्यशील पाटील म्हणाले, खेळाडूंना आवश्यक
पायाभूत सुविधा, वैद्यकीय, समुपदेशन, संतुलित आहार आदी सुविधा पुरविण्याचा
विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यापीठाच्या इनडोअर स्टेडिअमचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे
सादर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधांचा विकास
करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. खेळांत चमक दाखविलेल्या
विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च-माध्यमिक स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांसाठीही विशेष
क्रीडा शिष्यवृत्ती योजना तयार करण्याचे प्रस्तावित आहे. खेळाडूंना तज्ज्ञ
प्रशिक्षक मिळावेत, यासाठी अॅडजंक्ट प्राध्यापक म्हणून नामांकित क्रीडापटूंची
नियुक्ती करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. विद्यापीठात क्रीडासंस्कृतीचा अधिकाधिक विकास
व्हावा, यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
यावेळी संजय जाधव म्हणाले, खेळाडूंसमोरील अडचणी
सोडविण्यासाठी विद्यापीठ अत्यंत सकारात्मक आहे. खेळाडूंच्या अनेक अपेक्षा आहेत.
त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यापीठात ३०० निवास
क्षमतेचे अद्यावत क्रीडा वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे. तोपर्यंत सरावासाठी
येणाऱ्या विद्यार्थ्यांची पर्यायी निवास व्यवस्था व प्रशिक्षकाची व्यवस्था करण्यात
येत आहे.
यावेळी कुलगुरूंसह सर्वच मान्यवरांनी तासभराहून अधिक
काळ क्रीडापटूंच्या विद्यापीठाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्यांची
टप्प्याटप्प्याने पूर्तता करणेबाबत आश्वस्त केले. सुरवातीला क्रीडा अधिविभाग
प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रीडा संचालक विजय
रोकडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार
मानले. मेळाव्यास डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ.एन.डी. पाटील, डॉ.
एस.एस. चव्हाण, अभिजीत मस्कर, पृथ्वीराज सरनाईक यांच्यासह आफ्रिद मुख्तार आत्तार
(जलतरण), ऐश्वर्या राजेंद्र भंडारे (मार्शल आर्ट- कराटे), कुणाल कुमार दरवान (मल्लखांब), केतन भिमगोंडा चिंचणे (मल्लखांब), निशा जितेंद्र मोळके (मल्लखांब), ऋषिकेश संभाजी देसाई (कबड्डी), योगेश शरद पाटील (कबड्डी), सानिका कृष्णा सासणे (बॉक्सिंग), विक्रांत नारायण मलमे (सिकई मार्शल आर्ट), इंद्रजित अशोक फराकटे (ॲथलेटिक्स), श्वेता सातप्पा चिकोडी (ॲथलेटिक्स), भक्ती सुनिल पोळ (ॲथलेटिक्स), अभिषेक कागन्ना देवकते (ॲथलेटिक्स), ऋषिकेश धोंडीराम किरूळकर (ॲथलेटिक्स), उत्तम संभाजी पाटील (ॲथलेटिक्स), शिवानी प्रशांत बागडी (बास्केटबॉल), सिद्धांत सुरेश पुजारी (ॲथलेटिक्स), ताहिर मन्सूर मुल्लाणी (ॲथलेटिक्स), विवेक नारायण मोरे (ॲथलेटिक्स), सत्यजित सुरेश पुजारी (ॲथलेटिक्स)
आणिशुभम बाळासाहेब लगड (मल्लखांब) आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विविध
पदके प्राप्त करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शहीदांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.
शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. के.डी. सोनवणे, संध्या अडसुळे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. आर.व्ही. गुरव, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. नमिता खोत, परीक्षा मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, डॉ. एम.एस. देशमुख, अभय जायभाये आदी.
शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिकारी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी.
कोल्हापूर, दि. २६
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात आज
संविधान दिन आणि शहीद दिन या निमित्ताने भारतीय संविधानकर्ते आणि वीर शहीद जवान
यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के वप्र-कुलगुरू डॉ. पी.एस.
पाटील यांच्या हस्ते संविधानाची प्रास्ताविका, संविधानाची मूळ प्रत यांना अभिवादन
करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या
वीरांसह अन्य शहीदांच्या स्मृतिप्रतिमांनाही कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह
मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. डॉ. शिवराज थोरात यांनी
प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित
चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन,
आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.
आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता
खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, डॉ. प्रकाश पवार, डॉ. के.डी.
सोनावणे, डॉ. पी.बी. बिलावर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात डॉ. ए.एम. गुरव व डॉ. लिटॉन मोवाली यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रभारी कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) एम.जे. पाटील, अतुल एतावडेकर, महेश चव्हाण, डॉ. मोवाली, डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. गुरव आणि डॉ. पी.डी. राऊत.
कोल्हापूर, दि. २५
नोव्हेंबर: विविध संशोधन
समस्यांच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजनासुचविणारी
प्रतिमाने (Models)निर्माण करण्याचा उपक्रम अभिनव असून तो पुस्तकरुपाने
सादर होतो आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी
कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील डॉ. ए.एम. गुरव आणि
त्यांचे विद्यार्थी डॉ. लिटॉन प्रोसाद मोवाली (बांगलादेश) यांनी संयुक्तपणे
लिहीलेल्या ‘रिसर्च, रिइनव्हेंट अँड
रिसॉल्व्ह: मॉडेल्स फॉर
इफेक्टिव्ह सोल्युशन्स’
या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रभारी कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, डॉ. गुरव आणि डॉ. मोवाली यांनी विविध
संशोधन समस्यांवरील उपायांची प्रतिमाने या पुस्तकाद्वारे सादर केली आहेत. ही
प्रतिमाने अन्य संशोधन समस्यांवर देखील उपयुक्त व मार्गदर्शक स्वरुपाची ठरतील, अशी
आहेत. एक पथदर्शी प्रकल्प म्हणून या पुस्तकाकडे पाहावे लागेल, असे मतही त्यांनी
व्यक्त केले. डॉ. लिटॉन मोवाली हे शिवाजी विद्यापीठातील पीएच.डी. अभ्यासक्रम
यशस्वीरित्या पूर्ण करून आज त्यांच्या मायदेशी बांगलादेशला रवाना होत आहेत.
त्यांनाही प्रभारी कुलगुरूंनी भावी शैक्षणिक व संशोधकीय वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या.
प्रास्ताविकामध्ये डॉ. ए.एम. गुरव यांनी सदर पुस्तकाच्या संकल्पनेविषयी सविस्तर
माहिती दिली. पुस्तकात एकूण ३१ संकल्पनांवर आधारित मॉडेल्स असून अशा प्रकारचा हा
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेकडील राज्यातला कदाचित एकमेव उपक्रम असावा, असेही
सांगितले. उसाची विविध उत्पादने, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गूळ प्रक्रिया व इतर
अन्न प्रक्रिया यांसह तणाव व्यवस्थापनासह विविध प्रतिमानांचा यामध्ये समावेश
असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. डॉ. लिटॉन मोवाली यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. पी.डी. राऊत, आयक्यूएसीचे संचालक डॉ.
एम.एस. देशमुख, महेश चव्हाण, अतुल
एतावडेकर, एम.जे. पाटील आदी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात आयोजित नवोन्मेष परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.
शिवाजी विद्यापीठात आयोजित नवोन्मेष परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. एम.एस. देशमुख.
शिवाजी विद्यापीठात आयोजित नवोन्मेष परिषदेत बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि डॉ. एम.एस. देशमुख.
नवोन्मेष परिषदेत सहभागी झालेले इनोव्हेटर्स.
शिवाजी विद्यापीठात 'इनोव्हेशन मीट' उत्साहात
कोल्हापूर, दि. २३
नोव्हेंबर: नवोन्मेष उपक्रमाला
प्रोत्साहन हा विद्यापीठाला समाजाशी अधिक दृढपणे जोडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न
आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे
काढले.
महाराष्ट्र राज्य नवोन्मेष संस्था, शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशन (सेक्शन-८
कंपनी) आणि विद्यापीठाचे इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्र यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘इनोव्हेशन
मीट’च्या उद्घाटन समारंभाच्या
अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. तंत्रज्ञान अधिविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, तळागाळातील खेडोपाड्यातील सर्वसामान्य नागरिक,
छोटे उद्योजक, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्याकडे अनुभवातून किंवा कल्पनेमधील
अनेक नवसंकल्पना असतात. अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही काही अभिनव संकल्पना
असतात. मात्र, त्या मांडावयाच्या कोणाकडे आणि प्रत्यक्षात आणावयाच्या कशा, याविषयी
त्यांच्या मनात संभ्रम असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनातही त्यांच्या
अभ्यासाद्वारे, संशोधनाद्वारे अनेक कल्पना मूळ धरत असतात. त्यांनाही मूर्त रुप
देण्यासाठी सहाय्याची, शिक्षकांच्या मार्गदर्शन व सहकार्याची आवश्यकता असते. अशा
सुप्त नवसंकल्पनांना मंच प्रदान करण्याच्या हेतूने विद्यापीठाने नवोन्मेषाला
प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अशा नवोन्मेषाला मंच तसेच उपयुक्त
पर्यावरण, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, विविध उद्योग-व्यवसायांमध्ये जाऊन प्रथमतः
त्यांच्या कार्यप्रणालीचा संर्वंकष अभ्यास केल्यानंतर त्यांच्यासमोरील अडचणी,
समस्या विद्यार्थ्यांनी समजावून घेतल्या पाहिजेत. ही प्रत्येक अडचण किंवा समस्या
सोडविण्यासाठीचे उपाय शोधणे म्हणजेच नवोन्मेषाची संधी असते. त्यातून हाती येणाऱ्या
उपयुक्त संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी त्यामध्ये अधिक सूक्ष्म संशोधन करावे. लोकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी ‘ना-नफा’ तत्त्वावर केले जाणारे प्रयत्न
म्हणजेच नवोन्मेष होय. या नवोन्मेष परिषदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या प्रत्येक
संकल्पनेवर ज्या त्या संकल्पकाची मालकी अबाधित राहील, याची दक्षता विद्यापीठ
प्रशासन पूर्णपणे घेईल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राचीन काळापासून
नवोन्मेषी संशोधनाने मानवी जीवन कसे सुकर व सुखकर केले, याची विविध समर्पक उदाहरणे
दिली. ते म्हणाले, आजकाल सर्वच कंपन्यांचे लक्ष विविध पेटंट्सकडे असते. त्यातील
उपयुक्त पेटंटचा वापर ते व्यावसायिक उत्पादनासाठी करण्याची शक्यता असते. मात्र,
त्यासाठी त्यांची खात्री पटावी लागते. म्हणून संशोधकांकडे मूलभूत संकल्पना,
सक्षमता आणि संयम या गोष्टी असणे आवश्यक असते. नवनिर्मितीपासून शाश्वत विकासाकडे
आपल्याला वाटचाल करावयाची आहे, याचे भान संशोधकांकडे असावे. त्याचप्रमाणे मांडल्या
जाणाऱ्या नवसंकल्पना प्रत्यक्षात आणल्या जातील, अशा स्वरुपाच्या असाव्यात. अशाच
संकल्पनांना आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात असते. या
नवोन्मेषाच्या आधारे आपल्याला नवउद्योजक व्हावयाचे असेल, तर त्यासाठीची तीव्र आस
आपल्या मनामध्ये असणे आवश्यक असते. तेव्हाच यशाची खात्री असते.
या उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक इनोव्हेशन केंद्राचे संचालक डॉ.
एम.एस. देशमुख यांनी केले. पर्यावरण अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी
सूत्रसंचालन केले, तर ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. पी.डी. राऊत यांनी आभार मानले.
दरम्यान, सदर इनोव्हेशन मीटसाठी समाजाच्या विविध घटकांकडून ऑनलाईन व ऑफलाईन
स्वरुपात एकूण १३८ नवोन्मेष संकल्पनांचे प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांचे
व्यवस्थापन, मॅकेनिकल व ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान व संगणक, अन्न व प्रक्रिया,
कृषी, पर्यावरण व पर्यटन आणि आरोग्य अशा सहा विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात येऊन
दिवसभरात २७ विषयतज्ज्ञांसमोर त्यांचे गटनिहाय सादरीकरण करण्यात आले.
(शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या वर्धापन दिन समारंभाचे विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याची लिंक)
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या वर्धापन दिनाच्या प्रमुख पाहुण्या व सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना. शेजारी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.
शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ ध्वजास वंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत विद्यापीठाचे अन्य अधिकारी.
शिशिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुण्या व सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस. व्यासपीठावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागांमधील सर्वोत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. (श्रीमती) व्ही.एस. राठोड आणि शिक्षक.
अन्य अधिविभागांमधील सर्वोत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले व शिक्षक.
सोलापूरच्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या
हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. एस.एस. महाजन. व्यासपीठावर
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.
पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.
विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना स्वाती
खराडे.
विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना फिरोज
नायकवडी
विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना अजय उर्फ
आप्पासाहेब आयरेकर
विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना बबन
चौगले
महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने
महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना
प्राचार्य डॉ. रमेश कुंभार
महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना
जयंतराव कदम
महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना
विजयकुमार लाड
बॅ. पी.जी. पाटील आदर्श
शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे.
कै. प्राचार्य
श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार स्वीकारताना डॉ.
तेजस्विनी पाटील-डांगे
कोल्हापूर, दि. १८
नोव्हेंबर: शंभर
वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेल्या विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाने
अवघ्या ५९ वर्षांत साधलेली प्रगती नेत्रदीपक आहे, असे गौरवोद्गार सोलापूर येथील
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस
यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या
५९ व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या
राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित
होते.
या कार्यक्रमात विद्यापीठातील
गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस.एस.
महाजन यांना देण्यात आला. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार सातारा येथील
छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे यांना, तर कै.
प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार कासेगाव (जि.
सांगली) येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. तेजस्विनी दीपक पाटील-डांगे यांना
प्रदान करण्यात आला.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस
यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस
म्हणाल्या, शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’च्या ‘अ++’ मानांकनासह देशविदेशांतील शैक्षणिक
व संशोधकीय स्वरुपाचे अनेक टप्पे आणि शिखरे सर केली आहेत. अवघ्या साठ वर्षांच्या वाटचालीत
विद्यापीठाची ही कामगिरी गौरवास्पद आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सामाजिक दायित्वाच्या
भावनेतून राबविलेले उपक्रम सुद्धा अनुकरणीय स्वरुपाचे आहेत. अशा कामगिरीमुळे
विद्यापीठाशी निगडित सर्वच घटकांमध्ये उत्तम काम करण्याची प्रेरणा निर्माण झालेली असल्याचे
दिसते.
नव्या राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने उच्चशिक्षण क्षेत्रात कार्यरत धुरिणांची जबाबदारी
अधोरेखित करताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, उच्चशिक्षण क्षेत्रात कार्यरत
लोकांनी, विशेषतः शिक्षकांनी उच्चशैक्षणिक वारसा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी
स्वीकारायला हवी. विद्यार्थ्यांचा कल, आवड समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन
करण्यात पालकांसह शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविड कालखंडाने आता आपल्याला
विद्यार्थ्यांमधील बुद्ध्यांक (IQ),
भावनांक (EQ) या बरोबरच आध्यात्मांक (SQ) विकसनाकडेही लक्ष
द्यायला हवे. उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी मनःशांतीही तितकीच महत्त्वाची असल्याचे या
कालखंडाने आपल्याला दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. फडणवीस
पुढे म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक स्तरावर शाश्वत विकास साध्य
करण्यासाठी १७ मानके निश्चित केली आहेत. त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण या
मुद्द्यांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. आरोग्याच्या संदर्भात केवळ शारीरिकच
नव्हे, तर मानसिक सुदृढतेलाही बरोबरीचे स्थान दिले आहे. तसेच शिक्षणाच्या संदर्भात
दर्जावृद्धी महत्त्वाची मानली गेली आहे. आणि ही दर्जावृद्धी शालेय स्तरापासूनच
अभिप्रेत आहे. या बाबींचा दिशानिर्देश करण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. निसर्ग
व पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही शिक्षण क्षेत्राने घ्यायला हवी.
कुलगुरू डॉ. फडणवीस
म्हणाल्या, ज्ञानाचे प्रसरण व संवर्धन ही भारताची मूळ परंपरा आहे. नालंदा
तक्षशीला, विक्रमशीला आदी प्राचीन विद्यापीठांचा वारसा आपल्याला लाभला आहे. या
वारशाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना वैचारिक व्यासपीठे उपलब्ध करून देण्याची
जबाबदारीही शिक्षण क्षेत्रावरच आहे. या प्रक्रियेत पडलेला खंड दूर करण्यासाठी चिंतन
करावे लागणार आहेच;
शिवाय, संवाद (Communication), सृजनशीलता (Creativity) आणि सहकार्य (Collaboration) या त्रिसूत्रीचा अवलंब करून शिक्षण क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्त
मर्यादांवर मात करण्याच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. एकमेकांसमवेत सहकार्य
व साहचर्याची भूमिका घेऊन देशाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाटा उचलण्यासाठी
विद्यापीठांनी तत्पर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘इंडस्ट्री-४.०’साठी सुसज्ज व्हावे : कुलगुरू डॉ. शिर्के
यावेळी अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सध्या माहिती तंत्रज्ञान व तत्संबंधी संशोधन
विकासाच्या बळावर ‘इंडस्ट्री-४.०’ खूप वेगाने विस्तार पावत आहे. या
इंडस्ट्रीमध्ये काम करावयाचे आणि टिकून राहावयाचे असल्यास त्याला माहिती संवाद
तंत्रज्ञानाच्या अंगिकाराखेरीज पर्याय नाही. कोविड कालखंडाने आपल्याला त्यासाठी
तयार केले आहेच. मात्र, आता शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्या
दिशेने सुसज्ज करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांत कार्यरत
कर्मचाऱ्यांनीही या नवतंत्रज्ञानाचा अवलंब तातडीने करणे गरजेचे आहे. त्यातूनच
रोजगारास पूरक मनुष्यबळ निर्माण होईल आणि घटत्या मनुष्यबळावर उपाययोजना म्हणूनही
हे प्रशिक्षित मनुष्यबळ कामी येईल. त्या दृष्टीने शिवाज विद्यापीठात विविध सेवांचे
ऑटोमेशन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. काही सेवा कार्यान्वितही झाल्या
आहेत, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा
वेधही आपल्या भाषणात घेतला.
या वेळी विद्यापीठातील,
महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा
विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच,
प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग
यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
त्याचबरोबर 'नॅक'चे 'अ' मानांकन मिळविणाऱ्या दि न्यू कॉलेज,
कोल्हापूर आणि भोगावती महाविद्यालय, कुरुकली या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार
करण्यात आला.
उत्कृष्ट अधिविभागासाठीचा
पुरस्कार वनस्पतीशास्त्र व अर्थशास्त्र अधिविभागांना!
शिवाजी विद्यापीठाने
सन २०१९पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व
तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर
मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला
पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा
अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. गत वर्षी कोविडमुळे वर्धापन दिन समारंभ न होऊ
शकल्याने पुरस्कार देण्यात आला नव्हता. यंदा उत्कृष्ट अधिविभागासाठीचा हा पुरस्कार
विज्ञान व तंत्रज्ञान गटात वनस्पतीशास्त्र अधिविभागाला; तर,
अन्य अधिविभागांतून अर्थशास्त्र अधिविभागाला देण्यात आला. कुलगुरू डॉ. फडणवीस
यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
वर्धापन दिन
समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
विद्यापीठातील
गुणवंत शिक्षक: प्रा.
(डॉ.) श्रीकृष्ण शंकर महाजन, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग
विद्यापीठातील
गुणवंत सेवक:
१. स्वाती संजय
खराडे, सिनिअर सिस्टीम अॅनालिस्ट
२. फिरोज हमीद
नायकवडी, सहाय्यक अधीक्षक
३. अजय उर्फ
आप्पासाहेब बाबुराव आयरेकर, कनिष्ठ सहाय्यक
४. बबन शिवाजी
चौगले, प्रयोगशाळा परिचर
संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:
१. डॉ. मोहन मार्तंड राजमाने, एस.जी.एम. कॉलेज, कराड
२. डॉ. रमेश राजाराम कुंभार, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
महाविद्यालयीन गुणवंत सेवक:
१.जयंतराव जयसिंगराव कदम, कनिष्ठ लेखनिक, कला, वाणिज्य व विज्ञान
महाविद्यालय, पलूस, जि. सांगली
२. विजयकुमार पिराजी लाड, ग्रंथालय परिचर, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय,
कोल्हापूर
बॅ. पी.जी. पाटील
आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ.
अनिलकुमार कृष्णराव वावरे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा)
कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका: डॉ. तेजस्विनी दीपक
पाटील-डांगे (आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव, जि. सांगली)
या खेरीज, कार्यक्रमात राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता विद्यार्थी सौरभ संजय
पाटील आणि कुलपती सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी महेश्वरी धनंजय गोळे यांचाही
कुलगुरूंच्या हस्ते पदक प्रदान करून गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून
दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान
सादर केले. श्रीमती नंदिनी पाटील व सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी
कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता
झाली.
तत्पूर्वी, विद्यापीठाच्या
प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते शिवपुतळ्यास
पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते
ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन.
शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, प्रभारी वित्त व
लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव,
राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस.
महाजन, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत
केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड
यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा यांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख,
शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित
होते. कोविडविषयक नियमावलीचे पालन करून संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला.
विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीद्वारे
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ९५० हून अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला.