शिवाजी विद्यापीठात आयोजित नवोन्मेष परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.
शिवाजी विद्यापीठात आयोजित नवोन्मेष परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. एम.एस. देशमुख. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित नवोन्मेष परिषदेत बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि डॉ. एम.एस. देशमुख. |
नवोन्मेष परिषदेत सहभागी झालेले इनोव्हेटर्स. |
कोल्हापूर, दि. २३
नोव्हेंबर: नवोन्मेष उपक्रमाला
प्रोत्साहन हा विद्यापीठाला समाजाशी अधिक दृढपणे जोडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न
आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे
काढले.
महाराष्ट्र राज्य नवोन्मेष संस्था, शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशन (सेक्शन-८
कंपनी) आणि विद्यापीठाचे इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्र यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘इनोव्हेशन
मीट’च्या उद्घाटन समारंभाच्या
अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. तंत्रज्ञान अधिविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, तळागाळातील खेडोपाड्यातील सर्वसामान्य नागरिक,
छोटे उद्योजक, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्याकडे अनुभवातून किंवा कल्पनेमधील
अनेक नवसंकल्पना असतात. अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही काही अभिनव संकल्पना
असतात. मात्र, त्या मांडावयाच्या कोणाकडे आणि प्रत्यक्षात आणावयाच्या कशा, याविषयी
त्यांच्या मनात संभ्रम असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनातही त्यांच्या
अभ्यासाद्वारे, संशोधनाद्वारे अनेक कल्पना मूळ धरत असतात. त्यांनाही मूर्त रुप
देण्यासाठी सहाय्याची, शिक्षकांच्या मार्गदर्शन व सहकार्याची आवश्यकता असते. अशा
सुप्त नवसंकल्पनांना मंच प्रदान करण्याच्या हेतूने विद्यापीठाने नवोन्मेषाला
प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अशा नवोन्मेषाला मंच तसेच उपयुक्त
पर्यावरण, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, विविध उद्योग-व्यवसायांमध्ये जाऊन प्रथमतः
त्यांच्या कार्यप्रणालीचा संर्वंकष अभ्यास केल्यानंतर त्यांच्यासमोरील अडचणी,
समस्या विद्यार्थ्यांनी समजावून घेतल्या पाहिजेत. ही प्रत्येक अडचण किंवा समस्या
सोडविण्यासाठीचे उपाय शोधणे म्हणजेच नवोन्मेषाची संधी असते. त्यातून हाती येणाऱ्या
उपयुक्त संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी त्यामध्ये अधिक सूक्ष्म संशोधन करावे. लोकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी ‘ना-नफा’ तत्त्वावर केले जाणारे प्रयत्न
म्हणजेच नवोन्मेष होय. या नवोन्मेष परिषदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या प्रत्येक
संकल्पनेवर ज्या त्या संकल्पकाची मालकी अबाधित राहील, याची दक्षता विद्यापीठ
प्रशासन पूर्णपणे घेईल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राचीन काळापासून
नवोन्मेषी संशोधनाने मानवी जीवन कसे सुकर व सुखकर केले, याची विविध समर्पक उदाहरणे
दिली. ते म्हणाले, आजकाल सर्वच कंपन्यांचे लक्ष विविध पेटंट्सकडे असते. त्यातील
उपयुक्त पेटंटचा वापर ते व्यावसायिक उत्पादनासाठी करण्याची शक्यता असते. मात्र,
त्यासाठी त्यांची खात्री पटावी लागते. म्हणून संशोधकांकडे मूलभूत संकल्पना,
सक्षमता आणि संयम या गोष्टी असणे आवश्यक असते. नवनिर्मितीपासून शाश्वत विकासाकडे
आपल्याला वाटचाल करावयाची आहे, याचे भान संशोधकांकडे असावे. त्याचप्रमाणे मांडल्या
जाणाऱ्या नवसंकल्पना प्रत्यक्षात आणल्या जातील, अशा स्वरुपाच्या असाव्यात. अशाच
संकल्पनांना आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात असते. या
नवोन्मेषाच्या आधारे आपल्याला नवउद्योजक व्हावयाचे असेल, तर त्यासाठीची तीव्र आस
आपल्या मनामध्ये असणे आवश्यक असते. तेव्हाच यशाची खात्री असते.
या उद्घाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक इनोव्हेशन केंद्राचे संचालक डॉ.
एम.एस. देशमुख यांनी केले. पर्यावरण अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी
सूत्रसंचालन केले, तर ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. पी.डी. राऊत यांनी आभार मानले.
दरम्यान, सदर इनोव्हेशन मीटसाठी समाजाच्या विविध घटकांकडून ऑनलाईन व ऑफलाईन
स्वरुपात एकूण १३८ नवोन्मेष संकल्पनांचे प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांचे
व्यवस्थापन, मॅकेनिकल व ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान व संगणक, अन्न व प्रक्रिया,
कृषी, पर्यावरण व पर्यटन आणि आरोग्य अशा सहा विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात येऊन
दिवसभरात २७ विषयतज्ज्ञांसमोर त्यांचे गटनिहाय सादरीकरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment