डॉ. आर.जी. सोनकवडे |
कोल्हापूर, दि. २ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या
भौतिकशास्त्र अधिविभागातील डॉ. आर जी. सोनकवडे यांच्या ‘मायक्रोवेव्ह इंन्ड्युस्ड केमिकल इचिंग ऑफ एलआर-१५ टाइप-२, सॉलिड स्टेट
न्यूक्लिअर डिटेक्टर’ या महत्त्वपूर्ण संशोधनाला २९ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय पेटंट जाहीर झाले
आहे.
इंटरयुनिव्हर्सिटी अॅक्सिलरेटर सेंटर, नवी
दिल्ली (आय.यु.ए.सी.) या विज्ञान संस्थेमार्फत त्यांनी दि. २८ डिसेंबर २०१० रोजी भारत
सरकारकडे हा अर्ज दाखल केला होता. तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सदर पेटंट
जाहीर झाले आहे.
डॉ. आर. जी. सोनकवडे हे शिवाजी विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी इंटरयुनिव्हर्सिटी
अॅक्सिलरेटर सेंटर, नवी दिल्ली येथे कार्यरत होते. तेव्हापासून ते या विषयावरील संशोधन करीत
होते. मायक्रोवेव्ह लहरींचा वापर करून साधारणपणे किती किरणोत्साराची मात्रा एखाद्या व्यक्तीसाठी पुरेशी ठरेल आणि त्यायोगे न्यूक्लियर ट्रॅक व्यवस्थितरित्या पाहणे सुलभ
व्हावे, या दिशेने सदर संशोधन केंद्रित आहे. न्युक्लिअर ट्रॅक व्यवस्थित पाहता आले तरच किरणोत्सर्गाची मात्रा अचूक प्रमाणात दिली गेली आहे की नाही, हे समजू शकते. उदा.कर्करोगपीडित रुग्णावर उपचार करताना किरणोत्साराची मात्रा जशी अचूक द्यावी लागते, अगदी त्याचप्रमाणे येथेही तशीच काळजी घेणे अनिवार्य ठरते. तसेच, चुकीच्या किरणोत्सर्ग मात्रेचे अनेक दुष्परिणाम मानवावर होऊ शकतात. याकरिता किरणोत्सर्गाचे अचूक प्रमाण मिळविण्याकडे त्यांनी संशोधन केंद्रित केले. या अभिनव संशोधनासाठीचा संपूर्ण खर्च आय.यु.ए.सी.चे तत्कालीन संचालक डॉ. अमित रॉय यांनी संस्थेमार्फत केला.
मायक्रोवेव्हचे ट्रे आणि बाऊल यांना किरणोत्सारामुळे जाणारे तडे हा सदर
संशोधनाच्या परीक्षणामधील मोठा अडथळा होता. त्यावरही त्यांनी मोठ्या मेहनतीने मात
केली. या पेटंटमधील बराचसा भाग हा
धोरणात्मक व संऱक्षणविषयक बाबींशी निगडित असल्याने भारत सरकारकडून पेटंट प्राप्त होण्यात
अडचणी होत्या. मात्र, अखेरीस संशोधनाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय पेटंट प्रदान
करण्यात आले.
या पेटंटचे संपूर्ण
श्रेय हे आपले सहकारी, विद्यार्थी आणि संशोधनाला सहकार्य करणाऱ्या आय.यु.ए.सी. आणि
शिवाजी विद्यापीठ या संस्थांना असल्याची प्रतिक्रिया डॉ. सोनकवडे यांनी व्यक्त
केली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांनी डॉ. सोनकवडे यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment