Thursday, 25 November 2021

संशोधन समस्यांच्या अनुषंगाने प्रतिमाने निर्माण करण्याचा उपक्रम अभिनव: डॉ. पी.एस. पाटील

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. ए.एम. गुरव व डॉ. लिटॉन मोवाली यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रभारी कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) एम.जे. पाटील, अतुल एतावडेकर, महेश चव्हाण, डॉ. मोवाली, डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. गुरव आणि डॉ. पी.डी. राऊत.


कोल्हापूर, दि. २५ नोव्हेंबर: विविध संशोधन समस्यांच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना सुचविणारी प्रतिमाने (Models) निर्माण करण्याचा उपक्रम अभिनव असून तो पुस्तकरुपाने सादर होतो आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील डॉ. ए.एम. गुरव आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. लिटॉन प्रोसाद मोवाली (बांगलादेश) यांनी संयुक्तपणे लिहीलेल्या रिसर्च, रिइनव्हेंट अँड रिसॉल्व्ह: मॉडेल्स फॉर इफेक्टिव्ह सोल्युशन्स या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रभारी कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, डॉ. गुरव आणि डॉ. मोवाली यांनी विविध संशोधन समस्यांवरील उपायांची प्रतिमाने या पुस्तकाद्वारे सादर केली आहेत. ही प्रतिमाने अन्य संशोधन समस्यांवर देखील उपयुक्त व मार्गदर्शक स्वरुपाची ठरतील, अशी आहेत. एक पथदर्शी प्रकल्प म्हणून या पुस्तकाकडे पाहावे लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. डॉ. लिटॉन मोवाली हे शिवाजी विद्यापीठातील पीएच.डी. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून आज त्यांच्या मायदेशी बांगलादेशला रवाना होत आहेत. त्यांनाही प्रभारी कुलगुरूंनी भावी शैक्षणिक व संशोधकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकामध्ये डॉ. ए.एम. गुरव यांनी सदर पुस्तकाच्या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती दिली. पुस्तकात एकूण ३१ संकल्पनांवर आधारित मॉडेल्स असून अशा प्रकारचा हा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेकडील राज्यातला कदाचित एकमेव उपक्रम असावा, असेही सांगितले. उसाची विविध उत्पादने, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गूळ प्रक्रिया व इतर अन्न प्रक्रिया यांसह तणाव व्यवस्थापनासह विविध प्रतिमानांचा यामध्ये समावेश असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. डॉ. लिटॉन मोवाली यांनी आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. पी.डी. राऊत, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, महेश चव्हाण, अतुल एतावडेकर, एम.जे. पाटील आदी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment