शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ प्राध्यापकांना वेतन फरक प्रदान कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. सोबत (डावीकडून) कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. जे.एफ. पाटील. |
कोल्हापूर, दि. १
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या
सेवानिवृत्त आणि ज्येष्ठतम अशा शिक्षकांचा तीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला
वेतन फरकाचा न्याय्य प्रश्न सोडविण्यात यश आले आणि यंदाच्या दिवाळीच्या
पूर्वसंध्येला त्यांना फरक रकमेचा निधी प्रदान करण्यातून समाधानाची भावना मनी
निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी आज येथे काढले.
दि. १ जानेवारी १९८६ पूर्वी शिवाजी विद्यापीठातील पीएच.डी. पदवी प्राप्त
प्राध्यापक, प्रपाठक यांना तीन वेतनवाढी मंजूर झालेल्या होत्या. मात्र त्या आदा करण्यात आलेल्या नव्हत्या. विद्यापीठीय
तसेच शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अशा ४० सेवानिवृत्त
प्राध्यापकांना मिळून एकूण १ कोटी पाच लाख ५३ हजार ८६१ रुपये इतका वेतन फरक
शासनाने मंजूर केला. त्या वेतन फरक प्रदान करण्याचा कार्यक्रम आमदार आबिटकर
यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ कार्यालयात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कोल्हापूर
विभागीय उच्चशिक्षण सह-संचालक डॉ. हेमंत कठरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर
उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिक्षक हे विद्यापीठाचा कणा असून
त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते.
त्याला आमदार आबिटकर यांच्या सहकार्याचीही मोठी जोड लाभली. सदर निधीसाठी त्यांनी शासकीय
स्तरावर मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला. त्यातून आजचा ऐतिहासिक क्षण साकारला
आहे.
डॉ. जे.एफ. पाटील यांनी यावेळी विद्यापीठ प्रशासन, उच्चशिक्षण सहसंचालक
कार्यालय यांच्याबरोबरच उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, औरंगाबादचे
प्रा. वाहूळ यांनीही ज्येष्ठ प्राध्यापकांचा प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय
देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले. आमदार आबिटकर यांनी शासनाला
न्याय्य बाजू पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातून हा प्रश्न मार्गी
लागला, असेही सांगितले.
या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. बी.आर. कांबळे, डॉ. एन.के.
मोरे आणि डॉ. एस.एन. पवार यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रा. एस.पी. पाटील आणि डॉ. मानसिंगराव जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. एच. एस. पवार, डॉ.
अशोक चौसाळकर, डॉ. अरुण भोसले, डॉ. आर.बी. पाटील, डॉ. अवनिश पाटील आदी उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment