कोल्हापूर, दि. ११ नोव्हेंबर:
कोणताही उद्योग-व्यवसाय हा पैसा मिळविण्यासाठी किंवा नफ्यासाठी नसतो. ते
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारले जात असतात. याची जाणीव असणारे नेतृत्वच
सच्चे असते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी
काल येथे व्यक्त केले.
विद्यापीठाच्या दि युनायटेड वेस्टर्न बँकेच्या (स्व.) रा.ना. गोडबोले
अध्यासनातर्फे पुण्याच्या सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथील वाणिज्य अधिविभाग
प्रमुख डॉ. राजू श्रावस्ती लिखित ‘लीडरशीप
इन बँकिंग सेक्टर:
चेंजिंग सिनॅरिओ इन ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ या संशोधन पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत
होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बँकिंग क्षेत्रातील नेतृत्वाच्या सर्वंकष
वाटचालीचा संशोधनात्मक आढावा घेऊन त्याचे पुस्तिकारुपाने प्रकाशन करण्याचा
अध्यासनाचा उपक्रम स्तुत्य आणि महत्त्वाचा आहे. ज्ञाननिर्मितीच्या अशा अधिकाधिक
वाटा शिक्षक, संशोधकांनी चोखाळल्या पाहिजेत. खऱ्या नेतृत्वाचा कस पाहणाऱ्या अनेक
बाबी असतात. बँकिंग क्षेत्रामध्ये संपत्ती निर्मिती आणि संपत्ती व्यवस्थापन या दोन
बाबी उत्तम नेतृत्वाचा परिपाक असतात. ग्रामीण बँक उपक्रमाचे उद्गाते व जागतिक
ख्यातीचे अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांनी तीन शून्यांचा विचार करण्याचे आवाहन
जगाला केले आहे. त्यामध्ये शून्य गरीबी, शून्य बेरोजगारी आणि शून्य प्रदूषण यांचा
समावेश आहे. या तीन शून्यांसाठी जी व्यवस्था काम करते, त्या व्यवस्थेचे नेतृत्व खरे
असे मानायला हवे. त्या दृष्टीने सर्व स्तरांवरील नेतृत्वांनी काम करणे अपेक्षित
असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्वाचाही अशा पद्धतीने
संशोधकीय अभ्यास करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, अपयशातून भरारी घेण्याची क्षमता असणाऱ्या
नेतृत्वाची जागतिक स्तरावर आज वाखाणणी केली जाते. अशा लोकांकडेच कंपन्या आपले
नेतृत्व सोपवित असतात. त्यामुळे नेतृत्व यश किती मिळविते, यापेक्षाही आपल्या आस्थापनेला
अपयशातून कशा पद्धतीने सावरते, यावर त्याची महत्ता निर्धारित होत असते.
प्रामाणिकपणा हे सुद्धा नेतृत्वाचे अविभाज्य गुणवैशिष्ट्य असल्याचे मत त्यांनी
व्यक्त केले.
यावेळी कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्या हस्ते संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन
करण्यात आले. संशोधक लेखक डॉ. राजू श्रावस्ती यांनी संशोधन पुस्तिकेमधील
विश्लेषणाची उपस्थितांना माहिती दिली. अध्यासन प्रमुख डॉ. एस.एस. महाजन यांनी
प्रास्ताविकात अध्यासनाच्या वतीने दुसरी संशोधन पुस्तिका सादर करीत असताना आनंद
होत असल्याचे सांगितले. डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव
डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव, तेजपाल मोहरेकर आदी उपस्थित होते.
छोटेखानी पण छान कार्यक्रम.आलोकजी, वार्तांकनही समर्पक.
ReplyDelete