शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. सोबत (डावीकडून) जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत उपस्थितांसमवेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आदी. |
कोल्हापूर, दि. १६
नोव्हेंबर: लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे.
त्या दृष्टीने महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात अभिप्रेत
आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज
येथे केले.
श्री. देशपांडे यांनी आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन
विद्यापीठातील निवडक अधिकारी व प्राचार्य यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली आणि
त्यांना युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याविषयी विविध सूचना व
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व जिल्हाधिकारी
राहुल रेखावार प्रमुख उपस्थित होते.
श्री. देशपांडे म्हणाले, आजघडीला आपण मतदार जागृती आणि विद्यार्थ्यांची मतदार
नोंदणी या पलिकडे जाऊन लोकशाही प्रक्रियेचा भविष्यवेधी विचार करण्याची आवश्यकता
निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ मतदाता म्हणून नव्हे, तर लोकशाही
प्रक्रियेतील एक सजग घटक म्हणून आपले कर्तव्य बजावण्यास सिद्ध व्हावे, या दृष्टीने
त्यांचा या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुणे येथे ‘लोकशाही गप्पा’ नावाचा उपक्रम राबविण्यास सुरवात
झाली आहे. त्यामध्ये अनेक नामवंतांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे ‘लोकशाही मूल्ये आणि शिक्षकांची
भूमिका’ यासारख्या विषयांवर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात
आले. शंभर प्रथितयश मान्यवरांचा एक थिंक टँक निर्माण करून त्यांच्याकरवी विचारमंथनातून
अनेक विधायक सूचना सामोऱ्या येतात. विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेत स्वयंस्फूर्त
सहभाग फार आवश्यक आहे. जीवनकौशल्ये आणि भविष्यातील संधी यांची सांगड घालून
विद्यार्थ्यांना काम करण्यास प्रवृत्त करावे लागेल. सामाजिक सेवाकार्यात त्यांचा
वैयक्तिक सहभाग आणि योगदान यांचा त्यांच्या भविष्यातील शिक्षण व कारकीर्द यांसाठी
उपयोग होतो, हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यास विद्यार्थी अधिक जोमाने लोकशाहीविषयक
कार्यात सहभागी होतील. त्यांच्यासाठी लोकशाही आणि सुशासन, निवडणूक प्रक्रिया आदी
विषयांवर एक अथवा दोन क्रेडिटचे अभ्यासक्रम राबविल्यास त्याचाही लाभ होईल.
महाविद्यालयीन स्तरावर ‘डेमॉक्रसी
क्लब’, स्टुडंट पार्लमेंट यांसारखे
उपक्रम राबविल्यास लोकशाहीच्या विविध आयुधांची विद्यार्थ्यांना माहिती होईल, असे
मतही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, लोकशाहीच्या समृद्धी व विकासामध्ये युवा
वर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी विविध अभ्यासक्रमांसह लोकशाहीविषयक ऑनलाईन अभ्यासक्रम
आणि प्रमाणपत्राधारित उपक्रम राबविण्यास प्राधान्य आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना
विविध उपक्रमांत इंटर्नशीप करण्यास प्रोत्साहन द्यावे लागेल. महाविद्यालयीन
स्तरावर त्यासाठी विचारमंथन बैठका घेतल्या जाणे आवश्यक आहे. या कामी राष्ट्रीय
सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग यांनी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य व
मार्गदर्शन घेऊन निवडणूकविषयक कार्य करावे. महाविद्यालये आणि त्यांच्या
कार्यक्षेत्रातील गावे यांची सांगड घालून त्या विभागात मतदार नोंदणीचा कार्यक्रम
अधिक कार्यक्षमपणाने राबविणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. देशपांडे यांनी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी यांची
मतेही जाणून घेतली. बैठकीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह विद्यार्थी
विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.
रविंद्र भणगे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह विविध
महाविद्यालयांचे प्राचार्य, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, प्रशासकीय सेवक आदी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment