शिवाजी विद्यापीठात आयोजित एक्सआरडी कार्यशाळेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत डॉ. आर.जी. सोनकवडे, डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. आर.के. कामत आदी. |
कोल्हापूर, दि. ११ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठातील डीएसटी-सैफ सुविधा केंद्रात
‘स्ट्राइड’ योजनेअंतर्गत आयोजित दोन दिवसीय एक्सआरडी कार्यशाळेस आजपासून सुरवात झाली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के
यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डीएसटीचे सल्लागार डॉ. एस. एस.
कोहली, सैफ केंद्र पंजाब विद्यापीठाचे डॉ. चौधरी व सैफ
केंद्र आयआयटी मुंबईचे डॉ. कोट्टनथरायील यांची ऑनलाइन उपस्थिती लाभली.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी
कोल्हापूर सैफ केंद्रातील सर्वच उपकरणे समाजाभिमुख व्हावीत, यासाठी अशा
प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. कोहली यांनी डीएसटीकडून
राबवण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम आणि उपलब्ध होणारा निधी याबद्दल माहिती दिली आणि
संशोधक संस्थांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन
केले.
सैफ सुविधा केंद्राचे प्रमुख प्रा. आर. जी.
सोनकवडे यांनी या उपकरणांची व्याप्ती विद्यार्थ्यांना तसेच चिकित्सक अभ्यासकांना माहिती व्हावी, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले.
कार्यशाळेस सत्तरहून अधिक संशोधक सहभागी झाले आहेत. आयआयटी मुंबईच्या डॉ. कोट्टनथरायील आणि पंजाब विद्यापीठचे
डॉ. एस. ए. सैनी यांनी आयआयटी मुंबई आणि पंजाब विद्यापीठातील सैफ आणि तिथल्या
उपलब्ध उपकरणांची माहिती दिली. पहिल्या सत्रात प्रा. सोनकवडे
यांनी क्ष-किरणे, त्यांची निर्मिती व त्याच्या सुरक्षित हाताळणीसंदर्भात
मार्गदर्शन केले. तसेच ब्रूकर कंपनीचे अॕप्लिकेशन
इंजिनियर डॉ. रविकुमार यांनी एक्सआरडी
उपकरणाची तांत्रिक व प्रात्यक्षिक माहिती दिली.
उपकरणाच्या रचनात्मक माहितीसोबत
त्याची कार्यपद्धतीही समजावून सांगितली.
उद्या (दि. १२) रसायनशास्त्र
अधिविभागातील डॉ. भांगे पदार्थाच्या विश्लेषणासाठी त्याचा अधिक प्रभावीपणे कसा
वापर करता येईल, याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
डीएसटी-सैफबाबत
थोडक्यात...
संशोधकांना त्यांच्या संस्थांमध्ये
अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी डीएसटीचे कडून सैफ (SAIF) ची सुरवात करण्यात
आली. महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठात असणारी एकमेव सैफ ही
शिवाजी विद्यापीठातील सुविधा केंद्रात आहे. संशोधकांमध्ये त्यांच्याबद्दल जागरुकता
निर्माण करण्यासाठी आणि तंत्रज्ञांसाठी उपकरणांची देखभाल, दुरुस्ती आणि
विश्लेषणात्मक तंत्रांचा यावर सैफ नियमितपणे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणात्मक
कार्यक्रम आयोजित करत असते.
डीएसटीने विद्यापीठास सैफ केंद्रासाठी दहा
कोटीहून अधिक रक्कम दिली आहे, त्यातून एक्सआरडी, टीइएम यांसारखी वैज्ञानिक उपकरणे घेतली
आहेत. त्यांचा उपयोग विद्यापीठ परिसर, संलग्न महाविद्यालये व परिसरातील संशोधकांना होत
आहे. सदर निधी मिळवून देण्यासाठी डीएसटीचे सल्लागार डॉ. कोहली यांचे मोठे सहकार्य
लाभले आहे. तसेच, सुविधा
केंद्राच्या संचलनासाठी त्यांचे नेहमी मार्गदर्शन मिळत असते, त्याबद्दल त्यांचे आज विद्यापीठामार्फत विशेष
आभार मानण्यात आले.
No comments:
Post a Comment