Thursday, 7 November 2024

शिवाजी विद्यापीठाचा तैवानच्या नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठाशी सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठाने गुरूवारी तैवान येथील नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठासमवेत सामंजस्य करार केला. या प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतर करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि तैवानी विद्यापीठाच्या उप-अधिष्ठाता प्रा. ऱ्यु-यी चँग. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे,  वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख व तैवानी शिष्टमंडळातील सदस्य.


शिवाजी विद्यापीठाने गुरूवारी तैवान येथील नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठासमवेत सामंजस्य करार केला. या प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतर करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि तैवानी विद्यापीठाच्या उप-अधिष्ठाता प्रा. ऱ्यु-यी चँग. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तैवानी शिष्टमंडळातील सदस्य आणि उपस्थित अधिविभागप्रमुख व शिक्षक.

(सामंजस्य करार कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ७ नोव्हेंबर: नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठाचे शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागाशी उत्तम शैक्षणिक व संशोधकीय सहकार्य प्रस्थापित झालेले आहे. नव्या सामंजस्य करारामुळे शिवाजी विद्यापीठाच्या इतर अधिविभागांशीही सहकार्यवृद्धी होईल, अशी अपेक्षा तैवान येथील नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठाच्या विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेच्या उप-अधिष्ठाता प्रा. श्रीमती ऱ्यु- यी चँग यांनी आज येथे व्यक्त केली.

तैवानचे नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान आज एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी प्रा. चँग बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत पदार्थविज्ञान विभागाचे प्रा. चिन-चिह ली, मटेरियल सायन्स व अभियांत्रिकी विभागाचे प्रा. यी-चिआ चेन आणि पदार्थविज्ञान विभागाचे चेअर प्रोफेसर वँग-ची येह उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

प्रा. चँग म्हणाल्या, शिवाजी विद्यापीठाशी नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठाचे अनेक बाबतीत साम्य आहे. शिवाजी विद्यापीठाइतकाच परिसर आमच्या विद्यापीठाला लाभला आहे. शिवाजी विद्यापीठाचा वर्धापनदिन १८ नोव्हेंबरला, तर आमचा ११ नोव्हेंबरला असतो. या दोन्ही विद्यापीठांनी मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात संयुक्तपणे वाखाणण्याजोगे संशोधन केले आहे. हे सहसंबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने आजचा सामंजस्य करार करण्यात येत आहे. या अंतर्गत पदार्थविज्ञान विभागाच्या पुढे जाऊन शिवाजी विद्यापीठातील अन्य विभागांसमवेत शैक्षणिक व संशोधकीय बंध निर्माण करण्याचा मानस आहे. त्यासह शिक्षक-विद्यार्थी एक्स्चेंज उपक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प, संयुक्त कार्यशाळा, चर्चासत्रे व परिषदांचे आयोजन इत्यादी अनेक बाबतीत सहकार्यवृद्धी अपेक्षित आहे. यातून अत्याधुनिक व अभिनव वैज्ञानिक ज्ञानाचे आदानप्रदान, शैक्षणिक सहसंबंध प्रस्थापित होण्याबरोबरच शाश्वत विकासाची जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करण्याचे १७ वे उद्दिष्टही साध्य होणार आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या सामंजस्य कराराअंतर्गत आता उभय विद्यापीठांतील जैविक विज्ञान व रासायनिक विज्ञानाच्या विभागांमध्येही संशोधकीय बंध निर्माण होतील. शिवाजी विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनोविज्ञान व तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र या विभागांमधील संशोधन अत्युच्च दर्जाचे आहे. त्यांच्याकडील संशोधन सुविधांची शिष्टमंडळाने पाहणी करावी. नजीकच्या काळात विद्यार्थी एक्स्चेंज उपक्रमावर भर देण्यात येणार असला तरी संयुक्त संशोधन प्रकल्प, शोधनिबंध यांवरही भर दिला जावा. नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठामध्ये भूकंप, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन या अनुषंगाने सुरू असलेल्या संशोधनामध्ये शिवाजी विद्यापीठालाही सामावून घ्यावे. त्याखेरीज मानव्यशास्त्र विद्याशाखांतही अतिशय चांगले संशोधनकार्य सुरू आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची तैवानमध्ये ओळख करून देण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ उपयुक्त ठरू शकेल. संयुक्त प्रशिक्षण प्रकल्पही राबविता येऊ शकतील. अशा अनेक प्रकारच्या शैक्षणिक संबंध विस्ताराच्या संधी या कराराद्वारे शक्य आहेत.

यावेळी सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी, तर तैवान विद्यापीठाच्या वतीने प्रा. चँग यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाविषयी, तर प्रा. चँग यांनी नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठाविषयी सादरीकरण केले.

या कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. प्रवीणकुमार पाटील, डॉ. राजीव व्हटकर, डॉ. ज्योती जाधव, डॉ. पंकज पवार, डॉ. पवन गायकवाड, डॉ. किरणकुमार शर्मा आदी उपस्थित होते. डॉ. शिवाजी सादळे यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुभाष माने यांनी सूत्रसंचालन केले तर इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी आभार मानले.

शिष्टमंडळाकडून अधिविभागांना भेटी

तैवानच्या शिष्टमंडळाने सामंजस्य करारानंतर शिवाजी विद्यापीठातील काही निवडक अधिविभागांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक व संशोधकीय सुविधा व आधुनिक शास्त्रीय उपकरणांची पाहणी केली. यामध्ये पदार्थविज्ञान अधिविभागासह नॅनोविज्ञान व तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान अधिविभागातील इएनटीसी विभाग यांचा समावेश होता. दुपारच्या सत्रात त्यांनी विविध अधिविभागांतील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी यांच्याशीही संवाद साधला. हे शिष्टमंडळ उद्या सायंकाळी पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांचीही पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे अवकाश निरीक्षणही करणार आहेत.

No comments:

Post a Comment