Saturday, 30 November 2024

भारतीय संविधानाची मूल्य व्यवस्था ही आदर्श मूल्य व्यवस्था - डॉ.रविनंद होवाळ

 


कोल्हापूर, दि.30 नोव्हेंबर - भारतीय संविधानाची मूल्य व्यवस्था ही आदर्श मूल्य व्यवस्था आहे.यासाठी आपणांस फक्त अभिमान बाळगून चालणार नाही तर प्रत्यक्षात कसे उतरवता येईल ते पहाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील विचारवंत डॉ.रविनंद होवाळ यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताह समारोप समारंभामध्ये ''भारतीय संवैधानिक मूल्ये'' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.होवाळ बोलत होते.

डॉ.रविनंद होवाळ पुढे बोलताना म्हणाले, मानवी जगाच्या लाखो वर्षांच्या इतिहासामध्ये जगातील कोणत्याही राजकीय व्यवस्थेने जगातील कोणत्याही मानवी समुहाला दिलेले नाही इतके मोठे अधिकारी संविधानाद्वारे आपल्याला प्राप्त झालेले आहेत.भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जगातील अनेक मोठे लोक भारतामध्ये लोकशाही पध्दती कशी राबविली जाईल याबाबत साशंक होते. भारतीयांनी संविधानाचा स्विकार केल्यानंतर लोकशाही सशक्त होवून देश प्रगतीपथावर कार्यरत झालेला आहे.  प्राचीन भारतामध्ये लोकशाहीचे पाळेमुळे रूजलेली आहेत.त्यामुळेच आज आपण 75 वर्षांचा कालावधी पाहू शकत आहोत.माणूस ज्या प्रकारचे मूल्य स्विकारतो त्या प्रकारच्या तत्वप्रणालीचा तो स्विकार करतो आणि त्याचे संस्कार लोकशाहीवर करतो.नकारात्मक गोष्टी नष्ट करून सकारात्मक गोष्टींचा स्विकार करण्यासाठी भारतीयांनी संवैधानिक मूल्ये स्विकारले पाहीजे.समाजवाद याचा अर्थ समाजाचे जे उत्पन्न आहे ती समाजाच्या मालकीचे असतील ती खाजगी मालकीचे नसतील.समाजवाद हे संविधानामध्ये अंतर्भूत होते त्याचे प्रगटीकरण झालेले नव्हते.अद्यापही संविधानाचा प्रचार आणि प्रसार म्हणावा तितका झालेला नाही.याची जबाबदारी फक्त विद्यापीठांची, शैक्षणिक संस्थानांचीच आहे असे नाही तर समाजातील प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे.स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन तत्वे फार महत्वाची आहेत, जी घटनाकारांनी दिलेली आहेत.आपली मूल्य व्यवस्था खूप चांगली आहेत ती आपण सर्व भारतीयांनी जोपासली पाहिजे.एकाची मालकी संपुष्टात आली की दुसऱ्याची मालकी येण्याची शक्तता होती ती मोडीत काढण्याचे काम घटनाकारांनी केलेले आहे. लोकांच्या जीवनपध्दतीमध्ये सकारात्मक बदल घडविणे हे संविधानामुळे शक्य झालेले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण संविधानाचा स्विकार केला आहे. भारतीय संविधानाने न्याय प्रस्थापित करण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत.देशाचे संविधान सर्वोच्च ठेवले तर देशाची प्रगती साध्य करणे शक्य होईल.आपण आपल्या छावण्या विसरजीत करून त्याचे समूहामध्ये रूपांतर केले तर आपल्या देशाचे संविधान अमृत राहील.

याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपल्या देशाचे सामर्थ्य विविधतेतील एकतेमध्ये दिसून येते आणि हे बळ संविधानामधून प्राप्त झालेले आहे.त्यामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. संविधानामधील भारत निर्माण करण्यासाठी तरूणांनी समाजामध्ये संविधानाप्रती जागृकता निर्माण केली पाहिजे.संविधानाचा स्विकार आणि संचित आपल्यामध्ये सखोल रूजला पाहिजे.

अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, विद्यापीठामधील अधिविभाग आणि महाविद्यालयांमध्ये संविधानाचे वाचन सुरू करावेत.त्याचे चिंतन केले पाहिजे आणि अनुभवाने ते समजावून घेणे आवश्यक आहे.आपले संविधान कसे श्रेष्ठ आहे याची जाणीव आणि अनुभूती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.दररोजच्या जीवनामध्ये आपणांस संविधानाचा स्पर्श होतो याची जाणीव विद्यार्थ्यांना आणि समाजातील सर्व घटकांना झाली पाहिजे.वेगवेगळया उपक्रमांमधून संविधानाची जागृती सातत्याने झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.देशाची प्रगती हेच आपल्या सर्व छावण्यांचे ध्येय असले पाहिजे.देशातील सर्व नागरिक सुखी आणि समाधानी असले पाहिजे.


                    याप्रसंगी, संविधान साप्ताहानिमित्य आयोजित पोस्टर प्रदर्शन स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.              प्रथम पारितोषिक श्रीमती मर्सी फर्नांडीस आणि श्रीमती पुण्यश्री रंजन, द्वीतीय पारितोषिक श्री.बनसी होवाळे आणि श्रीमती एैश्वर्या कदम तर तृतीय              पारितोषिक श्रीमती एैश्वर्या मरूतवर यांनी प्राप्त केले.    तदनंतर, मानव्य विद्याशास्त्र इमारतीच्या प्रांगणामध्ये राजाराम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी            संविधानावर आधारित ऊर्जास्रोत निर्माण करणाऱ्या पथनाटयाचे सादरीकरणे केले.

 कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन यांनी केले.अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रकाश कांबळे, डॉ.चंद्रकांत लंगरे, डॉ.कैलास सोनवणे, डॉ. के.एम.गरडकर, डॉ.विद्यानंद खंडागळे, उपकुलसचिव डॉ.विभा अंत्रेडी, डॉ.संजय कुबल, डॉ.गजानन पळसे, श्रीमती ॲड.अनुष्का कदम यांचेसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment