Wednesday, 27 November 2024

भारतीय संविधान हेच देशाचे पथदिग्दर्शक जीपीएस: डॉ. श्रीरंजन आवटे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीरंजन आवटे. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. नंदकुमार मोरे आणि डॉ. रणधीर शिंदे.

(पोस्टर प्रदर्शन व डॉ. श्रीरंजन आवटे व्याख्यानाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: भारतीय संविधान हेच आपल्या देशाचे पथदिग्दर्शक जी.पी.एस. आहे. त्यामुळे या संविधान निर्मितीचा खरा इतिहास समजून घेणे, हाच विकसित भारताकडे जाण्याचा योग्य मार्ग आहे, असे प्रतिपादन पुणे येथील राज्यशास्त्र व भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीरंजन आवटे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात भारतीय संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत भारतीय संविधान आणि विकसित भारत या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे होते.

डॉ. आवटे म्हणाले, डिजीटल मॅप्समध्ये जशी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) ही नेव्हिगेशनसाठी वापरली जाते, त्याचप्रमाणे भारत देशाचा नागरिक म्हणून आपल्या व्यक्तीगत आणि सामूहिक नेव्हिगेशनला दिशा देणारे आणि योग्य दिशेने नेणारे संविधान हे आपल्या देशाचे जीपीएस आहे, या अंगाने संविधानाचा परिचय विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला करून देणे आवश्यक आहे. त्यांना आपल्या देदीप्यमान इतिहासाची जाणीव करून देणे आजघडीला सार्वत्रिक गरजेची बाब आहे. त्या दृष्टीने संविधानकर्त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती त्यांना दिली पाहिजे. संविधानाने प्रत्येकाला मताधिकार देऊन हरेक व्यक्तीचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग अधोरेखित केला ही फार मोठी बाब आहे. बहुसंख्य समाज अशिक्षित असला तरी त्या समाजाच्या सामूहिक शहाणपणावर संविधानकर्त्यांचा पूर्ण विश्वास होता. हे सामूहिक समंजसपण जपणे आजघडीला अत्यंत महत्त्वाचे आहे.

संविधान हा सामूहिक स्वप्नसंहितेचा ऐवज असल्याचे सांगून डॉ. आवटे म्हणाले, संविधानकर्त्यांनी विकसित भारताची संकल्पनाच संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये मांडून ठेवली आहे. त्या संविधानामधील आशय जपला जाईल आणि त्या माध्यमातून देशातील समग्र घटकांचे हित साधले जाईल, याची दक्षता घेण्याची जबाबदारी व्यवस्थेवर आहे. संविधानाची उद्देशिका हे अवघे एकच दीर्घवाक्य असले तरी त्यामध्ये आम्हा भारतीय लोकांना कशा प्रकारचा भारत हवा आहे, तो निर्माण करण्यासाठी आपण काय करणार, याची वचनबद्धता अभिप्रेत आहे. लोकांना अर्पण केलेले हे जगातील एकमेव संविधान आहे. देशातील प्रत्येक समाजघटकांच्या प्रतिनिधींचा या संविधानसभेत समावेश होता. या सर्वांमध्ये खूप मोठ्या मंथनाअंती संविधानाची संपूर्ण संरचना साकार झाली आहे. भारताची बहुसांस्कृतिकता ही अतिशय लक्षणीय आहे. म्हणूनच भारताची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना ही वैशिष्ट्यपूर्ण स्वरुपाची ठरते. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन संसाधनांचे न्याय्य वाटप हे भारतीय समाजवादाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. म्हणजेच या बाबी संविधानात अस्तित्वात होत्याच. ४२ व्या घटनादुरुस्तीने केवळ त्या उद्देशिकेत अधोरेखित करण्यात आल्या इतकेच. तीच बाब स्वातंत्र्य व समता यांच्या सहअस्तित्वाची आणि बंधुता या शब्दातील सहभावाची आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे, तर बुद्धाच्या भारतीय परंपरेतून ती संविधानात समाविष्ट झालेली आहेत, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, डॉ. आवटे यांनी संविधान निर्मितीच्या इतिहासातील सौंदर्यस्थळांची अत्यंत तपशीलवार चर्चा केली. त्यातून भारताच्या अंतरंगातील अनेकरंगी बहुसांस्कृतिक बांधणीची जटिल प्रक्रिया त्यांनी विषद केली आणि त्याच्या संविधानातील समावेशनाबाबतही अवगत केले. संविधानामध्ये देशातील सर्व घटकांच्या आवाजाची दखल असून त्याची लोकाभिमुखता ही फार मौलिक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून वक्त्यांचा परिचय करून दिला. सुखदेव एकल यांनी आभार मानले. अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. अविनाश सप्रे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. कैलास सोनावणे विलास सोयम, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. विद्यानंद खंडागळे, अविनाश भाले, डॉ. किशोर खिलारे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात आयोजित संविधानाधारित पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करताना डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. नंदकुमार मोरे आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.


संविधानाधारित पोस्टर प्रदर्शनास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीमध्ये संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत आज विशेष पोस्टर प्रदर्शनाचेही वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिक्षणशास्त्र अधिविभागाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा मध्यवर्ती विषय भारतीय संविधानिक मूल्ये आणि शिक्षण असा असून या संकल्पनेवरील २० हून अधिक पोस्टर विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केली आहेत. हे प्रदर्शन ३० नोव्हेंबरपर्यंत पाहण्यास खुले राहील.

डॉ. सुरेंद्र जोंधळे यांचे उद्या व्याख्यान

संविधान अमृतमहोत्सव सप्ताहांतर्गत उद्या, गुरूवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेंद्र जोंधळे यांचे भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर मानव्यशास्त्र सभागृहात व्याख्यान होईल.

No comments:

Post a Comment