Monday, 18 November 2024

शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा वर्धापनदिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठाचे ग्रामीण विकासाबरोबरच

आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनकार्य कौतुकास्पद: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी


शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिन समारंभात हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठया ग्रंथाचे प्रकाशन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. रघुनाथ ढमकले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. भालबा विभूते, डॉ. इस्माईल पठाण, डॉ. टी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान गटातील उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना जीवरसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. ज्योती जाधव, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. पंकज पवार आणि त्यांचे सहकारी


शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे गटातील उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरेडॉ. रणधीर शिंदे आणि त्यांचे सहकारी


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. अवनिश पाटील. मंचावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्केप्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटीलकुलसचिव डॉ. विलास शिंदेपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील



कै. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. पोपट महादेव पाटील.

कै. प्राचार्या सुमतीबाई पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार स्वीकारताना डॉ. (श्रीमती) अंजली राजेंद्र पाटील


विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रल्हाद बाबूराव जाखले

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना सुनिल जयवंत देसाई

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना गणपती बाळाप्पा मस्ती

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना तात्यासो निवृत्ती करपे

महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना डॉ. शिवलिंग गंगाधर मेनकुदळे


महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. राजेश काशीनाथ निमट

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना धनाजी शिवाजी पाटील

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना मोहन बाळासाहेब माने


शिवाजी विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. शेजारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील


शिवाजी विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे  तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी. मंचावर (डावीकडून) डॉ. अजितसिंह जाधव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. विलास शिंदे, डॉ. सुहासिनी जाधव


शिवाजी विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे  तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी.

कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील ग्रामीण भागातील घराघरांत शिक्षणाची गंगा प्रवाहित करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्याचप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. शिवाजी विद्यापीठाची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश रामकृष्ण पाटील यांना, तर बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार पलूस (जि. सांगली) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. पोपट महादेव पाटील यांना, तर कै. प्राचार्या सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार राजाराम महाविद्यालयातील डॉ. अंजली राजेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, कोल्हापूर ही समाजसुधारक, कलावंत, विचारवंत, कार्यकर्ते, विद्वान यांची भूमी आहे. सुसंस्कृत ग्रामीण भागाची परंपरा येथे आजही जपली जाते. पूर्वी हा सर्व भाग पुणे विद्यापीठाशी संलग्नित होता. त्यातून पुढे या विभागाच्या शैक्षणिक गरजांच्या प्रतिपूर्तीसाठी स्वतंत्र शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गेल्या ६२ वर्षांमध्ये शिवाजी विद्यापीठाने या विभागाच्या शैक्षणिक व संशोधकीय विकासासाठी मोलाचे कार्य केले आहे. येथील विविध विद्याशाखांमध्ये सुरू असलेल्या संशोधनकार्याचा ठसा केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटविला गेला आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धनासह लीड बॉटेनिकल गार्डनमध्ये देशभरातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करण्याचे मौलिक काम येथे सुरू आहे. जलसंवर्धनासह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठ राबवित असलेले अनेक उपक्रम पथदर्शी स्वरुपाचे आहेत.

भारतीय शिक्षणाचे भवितव्य विद्यापीठांच्या हाती असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, सकारात्मक सामाजिक बदलांसाठी रचनात्मक चर्चा होणे आवश्यक असते. त्यासाठी पोषक शैक्षणिक वातावरण निर्मितीची जबाबदारी विद्यापीठांनी उचलणे आवश्यक आहे. विद्यार्थीभिमुख विचार करीत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुक्त, मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीसाठी विचार, मंथन करण्यासाठी प्रेरित करण्याची गरज आहे. व्यापक आंतरराष्ट्रीय चित्रामध्ये आपल्या संशोधनाचे स्थान अधोरेखित करण्याच्या दृष्टीने त्यांना विचारप्रवण करणेही आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यामध्ये कौशल्ये कृतीत आणण्याची क्षमता उत्प्रेरित करणे, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्ये या सामर्थ्यांचा विकास करणे यांची गरज आहे. पर्यावरण, सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य आदी सामाजिक समस्यांवर विद्यापीठांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ग्रामीण-शहरी, पारंपरिक-आधुनिक अशा सातत्याने सामोऱ्या येणाऱ्या द्वंद्वांविषयी शि७णाच्या माध्यमातून योग्य मार्ग काढण्याचे मार्गदर्शन विद्यापीठांनी करणे अभिप्रेत आहे. त्याचबरोबर विद्यापीठीय संशोधनाद्वारे स्वशोधाच्या प्रेरणा संशोधकांत जागृत झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

 राजर्षी शाहूंचा सर्वदूर प्रभाव

कोल्हापूरच्या मातीला, माणसांना स्वतःचा एक पोत, अभिमान आणि संस्कृती आहे. या संस्कृतीला आपल्या द्रष्टेपणाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वदूर महत्त्व प्राप्त करून दिले. शाहू महाराजांनी समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविले. सव्वाशे वर्षांपूर्वी सामाजिक आरक्षणाचा निर्णय घेतला. इथल्या सामाजिक चळवळींना बळ दिले. सत्यशोधक चळवळीचे ते शक्तीस्थान होते. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या आशयबदलावर राजर्षी शाहू महाराजांचा प्रचंड प्रभाव असल्याचे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. गोसावी यांनी काढले.  

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासपूर्ण पद्धतीने अंमलात: कुलगुरू डॉ. शिर्के

यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने अंमलात आणले आहे. धोरणाविषयी सर्व घटकांत जागृती घडवून आणून सर्वंकष सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने काम केले आहे. विद्यापीठाने देशविदेशांतील प्रथितयश संस्थांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, भारतीय भू-चुंबकत्व संस्था, मुंबई (आयआयजी), नवी दिल्ली येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडिया, जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन, एम.आय.डी. स्वीडन विद्यापीठ, पुणे येथील नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, अॅवलॉन पॉवर, नॅसकॉमचे आयटी सेक्टर स्कील कौन्सिल, तैवानचे नॅशनल डाँग ह्वा विद्यापीठ या नामांकित विद्यापीठे व संस्थांसह भारतीय वायू सेनेचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत टीचर-स्टुडंट एक्स्चेंज, रिसर्च स्कॉलर एक्स्चेंज उपक्रम पुढील वर्षापासून कार्यान्वित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाश्वत समाजाच्या निर्मितीसाठी विद्यापीठाने कालसुसंगत अभिनव अभ्यासक्रम सुरू केले असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बी.ए. स्पोर्ट्स, बी.ए. फिल्म मेकिंग, बी.कॉम. (बीएफएसआय), बी.एस्सी.- एम.एस्सी. इकॉनॉमिक्स (पाच वर्षे एकात्मिक), बी.सी.ए., बी.एस्सी.- एम.एस्सी. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), बी.एस्सी.- बी.एड. (चार वर्षे एकात्मिक) आणि एम.बी.ए. (एकात्मिक चार वर्षे) आणि ऑनलाईन एमबीए अशा अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. ऑटोमेशनच्या बाबतीतही विद्यापीठाने आघाडी घेतली असून दीक्षान्त समारंभासाठीच्या प्रक्रियेसह पीएच.डी., एस.आर.पी.डी. आदी प्रक्रियांचे कामही पूर्णतः कागदविरहित केले आहे. ही सारी सॉफ्टवेअर विद्यापीठाने अंतर्गत तयार केली आहेत. ऑन-स्क्रीन गुणांकनही लवकरच प्रायोगिक पद्धतीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीच्या निमित्ताने विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल साकारले असून यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, कॉमर्स अँड मॅनेजमेंट या अधिविभागांच्या स्वतंत्र इमारती उभ्या राहात आहेत. तर क्रीडा आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वसतिगृहांचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृह उपक्रमाला समाजातील सजग नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून या अंतर्गत आजतागायत ८० लाख रुपयांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा थोडक्यात वेध घेतला.

या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठ ग्रंथाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून म्हणजे सन १९६२ ते २०२१ या साठ वर्षांच्या कालावधीतील वाटचालीचा आढावा घेणाऱ्या हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठ या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. भालबा विभूते यांच्यासह इतिहास लेखन समितीचे सदस्य डॉ. टी.एस. पाटील, डॉ. इस्माईल पठाण यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिवंगत समिती सदस्य ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांच्या योगदानाचा कुलगुरू डॉ. शिर्के आणि डॉ. विभूते यांनी आवर्जून उल्लेख केला.

 जीवरसायनशास्त्र व मराठी ठरले उत्कृष्ट अधिविभाग

शिवाजी विद्यापीठाने सन २०१९पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठीचा पुरस्कार जीवरसायनशास्त्र आणि मराठी अधिविभाग यांना देण्यात आला.

 नॅक मानांकित महाविद्यालयांचा गौरव

'नॅक'चे +’ आणि मानांकन मिळविणाऱ्या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा समारंभात सत्कार करण्यात आला. यामध्ये वालचंद कॉलेज ऑप इंजिनिअरिंग (सांगली), यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय (वारणानगर), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कोल्हापूर), राजाराम कॉलेज (कोल्हापूर), अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी (पेठवडगाव), वासंतीदेवी पाटील इन्ट्यिट्यूट ऑफ फार्मसी (कोडोली, पन्हाळा), सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय (सातारा), आदर्श कॉलेज (विटा), भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (सांगलीवाडी), लालबहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (मल्हारपेठ, सातारा), भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय (कडेगाव, सांगली), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी (कोल्हापूर), श्री अण्णासाहेब डांगे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (हातकणंगले), राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी (कासेगांव), यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स (कराड), राजे रामराव महाविद्यालय (जत), विवेकानंद महाविद्यालय (कोल्हापूर) आणि शहाजी लॉ कॉलेज (कोल्हापूर) या महाविद्यालयांचा समावेश आहे.

 वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा. डॉ. अवनिश रामकृष्ण पाटील, इतिहास अधिविभाग

विद्यापीठातील गुणवंत प्रशासकीय सेवक:

१. डॉ. प्रल्हाद बाबूराव जाखले, सहाय्यक कुलसचिव, परीक्षा विभाग

२. सुनिल जयवंत देसाई, अधीक्षक, पी.जी. बिल्स विभाग

३. गणपती बाळाप्पा मस्ती, मेस्त्री, अभियांत्रिकी विभाग

४. तात्यासो निवृत्ती करपे, हवालदार, महाविद्यालये व विद्यापीठ विकास विभाग

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:

डॉ. शिवलिंग गंगाधर मेनकुदळे, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक:

प्रा.डॉ. राजेश काशीनाथ निमट, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, जि. सातारा

महाविद्यालयीन गुणवंत सेवक:

१.      धनाजी शिवाजी पाटील, मुख्य लिपिक, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आष्टा

२.      मोहन बाळासाहेब माने, ग्रंथालय परिचर, लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा

कै. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. पोपट महादेव पाटील, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, जि. सांगली

कै. प्राचार्या सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार: डॉ. (श्रीमती) अंजली राजेंद्र पाटील, राजाराम कॉलेज, कोल्हापूर

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान, राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment