![]() |
| शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला. |
![]() | |
|
![]() | |
|
![]() | |
|
कोल्हापूर, दि. २२ मे: शिवाजी
विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आज विद्यापीठाचे प्रभारी
कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मावळत्या प्रभारी प्र-कुलगुरू
डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कामत कुटुंबिय उपस्थित होते.
डॉ. कामत यांनी आज सकाळी कुलगुरू
निवासस्थानापासून विद्यापीठाच्या प्रांगणामधील सर्व प्रवास इलेक्ट्रीक वाहनातून
केला. विशेष म्हणजे या वाहनाचे सुकाणू त्यांनी स्वतःच हाती घेतले होते. त्यांच्यासोबत
पत्नी, मुलगी आणि आत्या यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. डॉ. कामत यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास
अभिवादन केले. डॉ. आप्पासाहेब पवार, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बापूजी
साळुंखे यांच्या पुतळ्यांनाही त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रवेश केला. कुलगुरू दालनामध्ये प्रभारी
कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडून त्यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली.
यानंतर लगेचच व्यवस्थापन परिषद सभागृहात प्रभारी
कुलगुरू डॉ. गोसावी यांचा औपचारिक निरोप समारंभ झाला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.
गोसावी यांच्यासह विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव,
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, मानवविज्ञान
विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख
आणि आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय साळी यांनाही निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. शिंदे यांनी केले. कार्यक्रमास परीक्षा
व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर यांच्यासह
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातृसंस्थेच्या
ऋणातून उतराई होण्याची संधी: कुलगुरू डॉ. कामत
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळणे ही
माझ्यासाठी मातृसंस्थेचे ऋण काही अंशी का होईना फेडून त्या ऋणातून उतराई होण्याची
संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहीन. ही संधी दिल्याबद्दल
राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत
दादा पाटील यांचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील सर्व सहकारी मला या
कामी तत्परतेने मदत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. कामत यांनी यावेळी व्यक्त
केला.
शिवाजी विद्यापीठातील
कामाची शिस्त कौतुकास्पद: डॉ. गोसावी
शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय शिस्त ही
वाखाणण्याइतकी चोख आहे. वरती अधिकारी कोणीही असला तरी इथला प्रत्येक सहकारी त्याला
नेमून दिलेले काम मन लावून करीत असतो. आवश्यक तेथे सूचना देण्यापलिकडे त्यांना
वेगळे काही सांगावे लागत नाही. शिवाजी विद्यापीठातील ही कार्यप्रणाली कौतुकास्पद
स्वरुपाची आहे. त्यामुळे येथील प्रभारी कुलगुरू पदाचा कालखंड खूप चांगला पार पडला,
असे मावळते प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी निरोप समारंभात सांगितले.
संधी दिल्याबद्दल
कृतज्ञ: डॉ. ज्योती जाधव
केवळ शिक्षण आणि संशोधन यापलिकडे न पाहणाऱ्या
माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला प्रशासकीय काम करण्याची संधी देऊन शिवाजी
विद्यापीठाची पहिली महिला प्रभारी प्र-कुलगुरू होण्याचा मान दिल्याबद्दल मावळत्या
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी डॉ. गोसावी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या काळात खूप काही प्रशासकीय बाबी शिकून घेता आल्या, असेही त्यांनी सांगितले.
.jpeg)



No comments:
Post a Comment