Friday, 14 April 2017

लोकशाही रक्षणासाठी विवेक, बुद्धीप्रामाण्यवाद, सहिष्णुतेचा स्वर तीव्र करणे गरजेचे: डॉ. सुरेंद्र जोंधळे








शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. सुरेंद्र जोंधळे.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहाच्या प्रांगणात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण करताना खासदार संभाजीराजे छत्रपती. सोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. पी.टी. गायकवाड, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. डी.के. गायकवाड, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. सुरेंद्र जोंधळे, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. भगवान माने, डॉ. वासंती रासम, डॉ. भारती पाटील.

डॉ. सुरेंद्र जोंधळे


शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

प्रांगणात संविधान उद्देशिकेची प्रस्थापना

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारतीय लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर, विवेक, बुद्धीप्रामाण्यवाद आणि सहिष्णुता यांचा स्वर तीव्र करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी आज येथे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि लोकशाहीसंबंधी विचार या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख पाहुणे म्हणून, तर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. सुरेंद्र जोंधळे
डॉ. जोंधळे म्हणाले, बाबासाहेबांनी भारताला एक व्यक्ती, एक मूल्य हे मानवतावादाचे महान तत्त्व प्रदान केले. बाबासाहेबांना या देशामध्ये स्वातंत्र्य, समता या मूल्यांइतकेच किंबहुना त्याहूनही अधिक बंधुता अर्थात भ्रातृभावाच्या प्रस्थापनेची नितांत गरज वाटत होती. भारतीय समाजामधला भ्रातृभाव हरवलेला आहे. त्याची प्रस्थापना करून या तीन मूल्यांच्या आधारावर भारतीय समाजव्यवस्थेची फेररचना करण्याची गरज त्यांना वाटत होती. त्याचप्रमाणे तळागाळातल्या लोकांना राजकीय प्रतिनिधित्व, सर्वांना नागरिकत्वाचे समान अधिकार, सर्वांना राजकीय सत्तेत समान वाटा आणि त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ ही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीची ठळक वैशिष्ट्ये होती. वंचित समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेशनासाठी त्यांना सत्तेत समान लाभ प्राप्त व्हावेत, यासाठी त्यांनी राष्ट्रीय उदारमतवादाचा पुरस्कार केला. भारताच्या संदर्भात राजकीय बहुमत याचा अर्थ थेट जात्याधारित बहुमत असा होत असल्याने सुयोग्य राजकीय लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी तळागाळातल्या अस्पृश्य, वंचित समाजघटकांना सत्तेत समान वाटा देण्याबाबत बाबासाहेब आग्रही होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहसंबंधांचा मनोवेधक आढावा घेतला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण ठराविक निकष लावून संकुचित बनवून ठेवले आहे. राजर्षी शाहू महाराजांसारख्या छत्रपतीला बाबासाहेबांना व्यक्तीशः जाऊन भेटण्याची इच्छा होते, त्यातूनच बाबासाहेबांचे मोठेपण खरे तर आपल्या लक्षात यायला हवे. शाहू महाराजांचे समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न आणि उद्दिष्ट बाबासाहेबांनी आपल्या भावी आयुष्यात पूर्ण केले. माणगाव परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी ज्या विश्वासाने त्यांना बहुजनांचे नेते म्हणून पुढे आणले होते, तो विश्वास बाबासाहेबांनी सार्थ ठरविला. जातिआधारित विषमतावादाला मूठमाती देऊन जोपर्यंत या देशातील सर्व लोक एकाच पातळीवर येणार नाहीत, तोपर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आपण खऱ्या अर्थाने अंमलात आणला, असे म्हणता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या त्रयींच्या विचारांचा प्रसार तळागाळापर्यंत करणे आणि समता प्रस्थापित करणे हे माझे जिवित ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, या देशामधील सम्यक क्रांतीचे निर्विवाद नेते म्हणून मी नेहमीच बाबासाहेबांकडे पाहतो. बहुजन समाजाची काळजी वाहणारे, विचारांचे लढे उभारणारे बाबासाहेब महान राष्ट्रवादी होते. या देशातील लोकांच्या मनीमानसी रुजलेला मीपणा समूळ उपटून टाकण्यासाठी आणि त्यांच्यात एकता व एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी त्यांनी संविधानात आम्ही, भारताचे लोक अशी अत्यंत मनोवेधक रचना केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता हे शब्द शब्दकोषातून बाहेर काढून खऱ्या अर्थाने त्यांना अभिप्रेत अर्थ भारतीय समाजाला समजावून सांगण्यासाठी अविश्रांत धडपड बाबासाहेबांनी केली. मूर्तीमंत भारतीयत्वाचे ते प्रतीक होते. त्यांचे हे मोठेपण आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे असे अगणित दुर्लक्षित पैलू जगासमोर आणण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले.

संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण
तत्पूर्वी, विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजर्षी शाहू सभागृहाच्या प्रांगणात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 13 April 2017

‘रयत’ ही कर्मवीरांची शैक्षणिक प्रयोगशाळा: डॉ. एन.डी. पाटील


शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या वतीने स्वीकारताना चेअरमन डॉ. अनिल पाटील व माजी चेअरमन डॉ. एन.डी. पाटील. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत.


रयत शिक्षण संस्थेस शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार प्रदान

कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: कोणताही शिक्षणग्रंथ न वाचता शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोगांची नांदी घडविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणतज्ज्ञांचे महर्षी होते, तर रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या यशस्वी प्रयोगांची प्रयोगशाळा ठरली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एन.डी. पाटील यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेस आज सकाळी प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. रोख १,५१,००० रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील
डॉ. पाटील म्हणाले, कर्मवीरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रयोग केले. या प्रयोगांमुळे समाजातल्या तळागाळातल्या, गोरगरीब, दलित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील होणे शक्य झाले. खेड्यापाड्यातल्या मातीतली रत्नं त्यांनी गोळा केली आणि त्यांच्या माध्यमातून समतेची रचना केली. रा.कृ. कणबरकर सरांनाही त्यांनी असेच बेळगावहून साताऱ्याला शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून आणले. त्यांना कराडच्या संत गाडगे महाराज महाविद्यालयाचा प्राचार्यही केले. अण्णांचा कणबरकर सरांना साताऱ्याला आणण्याचा निर्णय सरांच्या कारकीर्दीवर दूरगामी परिणाम करणारा ठरला. महाराष्ट्राचे व्यापक कार्यक्षेत्र कणबरकरांना लाभले आणि आपली लेखणी, वाणी बहुजनांच्या उद्धारासाठी वापरून त्यांनी नवी महाविद्यालये आणि विद्यार्थी घडविले. कणबरकर सर अत्यंत नेकदार, सरळमार्गी व सर्जनशील वृत्तीचे व्यक्ती होते. राजर्षी शाहू महाराजांविषयीचा जिव्हाळा हा आम्हा दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले, आजवर रयत शिक्षण संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले, पण, शिवाजी विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेला पुरस्कार आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. कारण या भूमीने आम्हाला कर्मवीर दिला. सन १९०२-०८ या कालावधीत अण्णा कोल्हापुरात जैन बोर्डिंगमध्ये शिकण्यासाठी राहिले होते. तर अखेरचे वर्ष त्यांना राजर्षी शाहू महाराजांसमवेत राजवाड्यातच व्ततित करण्याची संधी लाभली. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि शाहू महाराज यांना त्यांनी गुरू मानले. आणि त्यांच्या विचारांना कृतीचे स्वरुप देण्यात अण्णा यशस्वी झाले. राजर्षी शाहू महाराजांचे सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृह काढण्याचे स्वप्न कर्मवीरांना पुढे पूर्ण केले. म्हणून या भूमीचा हा पुरस्कार महत्त्वाचा आहे.
डॉ. अनिल पाटील
जागतिकीकरणाच्या रेट्यात शिक्षण बदलल्याचे सांगून डॉ. अनिल पाटील म्हणाले, या बदलत्या परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्था आपल्या ध्येयापासून तसूभरही न ढळता आपले शैक्षणिक कार्य करीत आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुखता या गोष्टींना या नव-व्यवस्थेत मोठे महत्त्व आले आहे. त्या दृष्टीने शिक्षणक्रमात कालसुसंगत बदल करून विद्यार्थी घडविण्याला रयतचे प्राधान्य आहे. त्याचवेळी विना-अनुदानितसारखी कितीही संकटे आली तरी, आदिवासी, ग्रामीण पाड्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे व्रत संस्था कधीही सोडणार नाही, याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. शिक्षणाच्या क्षेत्रात मिळकतीनुसार, कॉन्व्हेंट, इंग्लीश मिडियम, मराठी व सेमी-इंग्लीश माध्यम आणि जिल्हा परिषद शाळा अशी नवी चातुर्वण्य व्यवस्था उदयास येते आहे. शिक्षणाचे पावित्र्य टिकविण्यासाठी ही लढाई लढून जिंकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येत असलेला हा पुरस्कार म्हणजे कर्मवीर अण्णांच्या संस्कारांचा सत्कार आहे. कर्मवीरांनी शिक्षण आणि श्रमसंस्काराचे मूल्य समाजमनात खोलवर रुजविले. श्रमसंस्कारातून गरीब, मागास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेला आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. कित्येत वंचित, शोषित समाजघटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्मवीरांचे कार्य हे भारतरत्नाच्या तोडीचे आहे. त्या दृष्टीने कर्मवीर भारतीय नवसमाजाचे रचनाकार होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य कणबरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य बी.ए. खोत यांनी केले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुण कणबरकर यांनी कणबरकर कुटुंबियांतर्फे मान्यवरांचा सत्कार केला. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एन.जे. पवार, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एम. चव्हाण, डॉ. बी.पी. साबळे, श्रीमती शालिनी कणबरकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. भालबा विभुते यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेशी संबंधित शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 12 April 2017

योग्य अंमलबजावणीवरच विद्यापीठ कायद्याचे यश अवलंबून: माजी कुलगुरू डॉ. आर.एस. माळी





शिवाजी विद्यापीठात नवीन विद्यापीठ कायद्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर, दि. १२ एप्रिल: नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा कालसुसंगत असून त्याच्या योग्य अंमलबजावणीवरच त्याची यशस्विता अवलंबून राहील, असे मत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.आर. माळी यांनी आज येथे व्यक्त केले.
गेल्या १ मार्च २०१७पासून अंमलात आलेल्या नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा-२०१६च्या संदर्भात सर्व संबंधित घटकांना सविस्तर माहिती करून देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठातर्फे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेत बीजभाषण करताना ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात कार्यशाळा झाली.
शिक्षणाच्या दर्जावृद्धीवर नूतन कायद्यात भर देण्यात आलेला असल्याचे सांगून डॉ. माळी म्हणाले, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन, शिक्षणपूरक कृतीसत्रे, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा अंगिकार ही या कायद्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. दर्जावृद्धीसाठी नवसंशोधन व नवनिर्मितीस प्रोत्साहन, परीक्षा व मूल्यमापन पद्धतीत सुधारणा, आंतरविद्याशाखीय सहसंबंधात वृद्धी, इन्क्युबेशन, औद्योगिक साहचर्य तसेच कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रमांना प्रोत्साहन आदी बाबी या कायद्यात आहेत. त्यांची यथायोग्य अंमलबजावणी विद्यापीठांनी करणे गरजेचे आहे. ज्या देशात शिक्षणाचा दर्जा खालावतो, ते राष्ट्र रसातळाला जाते, असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी कायद्याचे सोप्या पद्धतीने विश्लेषण केले. ते म्हणाले, प्रगतीचा मार्ग हा उच्चशिक्षणातूनच जातो, हे लक्षात घेऊन नवीन कायद्यात पूर्वीच्या १९९४च्या कायद्यापेक्षा साधारणतः ४० टक्के बदल करण्यात आला आहे. विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर बंधने न आणता उलट कालसुसंगत तरतुदी केल्या आहेत. विद्यापीठांना परदेशात जाता येईल, क्लस्टर विद्यापीठे स्थापन करता येतील, विद्यापीठांमधील आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी त्यांचे इन्पेक्शन, ऑडिट करता येईल, विद्यापीठांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्वतःचे वित्तीय स्रोत निर्माण करता येतील, निवडणुका, नामांकने यांचा योग्य मेळ साधत अधिसभा, विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषद यांची फेररचना, बोर्ड ऑफ डीन्सचा समावेश अशा अनेक महत्त्वाच्या तरतुदी या कायद्यात केल्या आहेत.
राज्यातल्या ११ अकृषी विद्यापीठांमध्ये नूतन कायद्याविषयी पहिले चर्चासत्र भरविणारे तसेच नवीन कायद्यातील तरतुदींनुसार हंगामी अधिकार मंडळांची स्थापना करणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातले पहिले आणि एकमेव विद्यापीठ असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी या प्रसंगी काढले.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ डॉ. आनंद मापुस्कर म्हणाले, बदलत्या काळानुरुप कायदा बदलणे आवश्यक होते. त्या दृष्टीने या कायद्यात बोर्ड ऑफ इनोव्हेशन, इन्क्युबेशन एन्ड एंटरप्राईजेस वगैरेंचा समावेश केला आहे. लोकसंख्या ही आज आपली जमेची बाजू आहे. तिला कुशल मनुष्यबळामध्ये रुपांतरित करून तिची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरण्यासाठी कौशल्य शिक्षणाची तरतूद कायद्यात आहे. हा कायदा विद्यार्थीकेंद्री असला तरी त्याची कार्यवाही शिक्षककेंद्री आहे. शिक्षण मंडळांपासून ते विद्यापरिषदेपर्यंत सर्व अधिकार मंडलांवर प्राध्यापक असतात. आपापसातील गटतट विसरून त्यांनी विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा कायदा राबविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. दर्जेदार लोक विद्यापीठात यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. विद्यापीठांनी सल्लागार मंडळ निर्माण करून त्यामध्ये मोठमोठे उद्योगपती, शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांना समावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यापीठांनी स्वतःच्या प्रगतचा रोडमॅप तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी कार्यशाळा आयोजनामागील उद्दिष्ट्ये सांगितली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दुपारच्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुधाकर मानकर, शंकरराव कुलकर्णी यांनी अनुक्रमे कायद्यातील शैक्षणिक तरतुदी व विद्यार्थीविषयक तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस संस्थाचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 6 April 2017

आर्थिक व्यवहारांसाठी विद्यार्थ्यांनी ‘पीओएस’ सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे


विद्यार्थ्यांना 'पीओएस' सेवेविषयी माहिती देताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी प्रभारी वित्त व लेखाधिकारी श्री. अजित चौगुले


Add caption

कोल्हापूर, दि. ६ एप्रिल: केंद्र सरकारच्या रोखविरहित आर्थिक व्यवहारांना चालना देण्याच्या धोरणाला बळकटी देण्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठानेही कॅश विभागात पॉईंट ऑफ सेल (पीओएस) यंत्रे बसविली आहेत. विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठाशी संबंधित यंत्रणांनी त्याद्वारे अधिकाधिक रोखविरहित व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कॅश विभागामध्ये ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने रोखरहित व्यवहारांसाठी पीओएस यंत्रे बसविण्यात आली आहेत. या सेवेस आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रोख रक्कम भरण्यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंनी संवाद साधला. ते म्हणाले, बहुतांश विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडे एटीएम-डेबीट कार्ड असतात. त्या सर्वांनी पीओएसद्वारे किंवा अगदी मोबाईलवरून युपीआय, भीम ॲपच्या माध्यमातून देणी भागविल्यास केंद्र सरकारचा हा उपक्रम निश्चितपणे आपण सर्व मिळून यशस्वी करू शकतो. शिवाजी विद्यापीठाने यापूर्वी दीक्षान्त समारंभासाठीचे शुल्क ऑनलाइन स्वरुपात स्वीकारून गेल्या वर्षीपासूनच रोखविरहित व्यवहारांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे पीओएस सेवा आहे. या सेवेचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी कुलगुरूंनी पीओएस सेवेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी विद्यापीठात ज्या ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार केले जातात, अशा सर्व ठिकाणी पीओएस यंत्रे बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह ॲक्सिस बँकेचे अधिकारी व विद्यापीठाच्या लेखा विभागातील अधिकारी व सेवक उपस्थित होते.