डॉ. सुरेंद्र जोंधळे |
शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात;
प्रांगणात संविधान उद्देशिकेची प्रस्थापना
कोल्हापूर, दि. १४
एप्रिल: भारतीय लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर, विवेक, बुद्धीप्रामाण्यवाद आणि
सहिष्णुता यांचा स्वर तीव्र करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ
विचारवंत डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी आज येथे केले.
भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर संशोधन व विकास
केंद्रातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद आणि लोकशाहीसंबंधी विचार’ या विषयावर आयोजित
व्याख्यानात ते बोलत होते. खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख पाहुणे म्हणून, तर कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. राजर्षी शाहू सभागृहात हा
कार्यक्रम झाला.
डॉ. सुरेंद्र जोंधळे |
डॉ. जोंधळे म्हणाले,
बाबासाहेबांनी भारताला ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ हे मानवतावादाचे महान तत्त्व प्रदान केले.
बाबासाहेबांना या देशामध्ये स्वातंत्र्य, समता या मूल्यांइतकेच किंबहुना त्याहूनही
अधिक बंधुता अर्थात भ्रातृभावाच्या प्रस्थापनेची नितांत गरज वाटत होती. भारतीय
समाजामधला भ्रातृभाव हरवलेला आहे. त्याची प्रस्थापना करून या तीन मूल्यांच्या
आधारावर भारतीय समाजव्यवस्थेची फेररचना करण्याची गरज त्यांना वाटत होती. त्याचप्रमाणे
तळागाळातल्या लोकांना राजकीय प्रतिनिधित्व, सर्वांना नागरिकत्वाचे समान अधिकार,
सर्वांना राजकीय सत्तेत समान वाटा आणि त्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ ही
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीची ठळक वैशिष्ट्ये होती. वंचित समाजाच्या
मुख्य प्रवाहात समावेशनासाठी त्यांना सत्तेत समान लाभ प्राप्त व्हावेत, यासाठी त्यांनी
राष्ट्रीय उदारमतवादाचा पुरस्कार केला. भारताच्या संदर्भात राजकीय बहुमत याचा अर्थ
थेट जात्याधारित बहुमत असा होत असल्याने सुयोग्य राजकीय लोकशाहीच्या
प्रस्थापनेसाठी तळागाळातल्या अस्पृश्य, वंचित समाजघटकांना सत्तेत समान वाटा देण्याबाबत
बाबासाहेब आग्रही होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार संभाजीराजे
छत्रपती यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्नेहसंबंधांचा मनोवेधक आढावा घेतला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांना आपण ठराविक निकष लावून संकुचित बनवून ठेवले आहे. राजर्षी शाहू
महाराजांसारख्या छत्रपतीला बाबासाहेबांना व्यक्तीशः जाऊन भेटण्याची इच्छा होते,
त्यातूनच बाबासाहेबांचे मोठेपण खरे तर आपल्या लक्षात यायला हवे. शाहू महाराजांचे समताधिष्ठित
समाजरचनेचे स्वप्न आणि उद्दिष्ट बाबासाहेबांनी आपल्या भावी आयुष्यात पूर्ण केले. माणगाव
परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी ज्या विश्वासाने त्यांना बहुजनांचे नेते
म्हणून पुढे आणले होते, तो विश्वास बाबासाहेबांनी सार्थ ठरविला. जातिआधारित
विषमतावादाला मूठमाती देऊन जोपर्यंत या देशातील सर्व लोक एकाच पातळीवर येणार
नाहीत, तोपर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आपण खऱ्या अर्थाने अंमलात आणला,
असे म्हणता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या त्रयींच्या विचारांचा
प्रसार तळागाळापर्यंत करणे आणि समता प्रस्थापित करणे हे माझे जिवित ध्येय असल्याचेही
त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, या देशामधील सम्यक क्रांतीचे निर्विवाद नेते म्हणून
मी नेहमीच बाबासाहेबांकडे पाहतो. बहुजन समाजाची काळजी वाहणारे, विचारांचे लढे
उभारणारे बाबासाहेब महान राष्ट्रवादी होते. या देशातील लोकांच्या मनीमानसी रुजलेला
‘मी’पणा समूळ उपटून टाकण्यासाठी आणि त्यांच्यात एकता व एकात्मतेची भावना
रुजविण्यासाठी त्यांनी संविधानात ‘आम्ही, भारताचे लोक’ अशी अत्यंत मनोवेधक रचना केली. स्वातंत्र्य,
समता व बंधुता हे शब्द शब्दकोषातून बाहेर काढून खऱ्या अर्थाने त्यांना अभिप्रेत
अर्थ भारतीय समाजाला समजावून सांगण्यासाठी अविश्रांत धडपड बाबासाहेबांनी केली. मूर्तीमंत
भारतीयत्वाचे ते प्रतीक होते. त्यांचे हे मोठेपण आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे
असे अगणित दुर्लक्षित पैलू जगासमोर आणण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर असल्याचे
त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. आंबेडकर
संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश पाटील
यांनी सूत्रसंचालन केले, तर विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार
मानले.
संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण
तत्पूर्वी, विद्यापीठाच्या
मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस
मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात
आले. त्यानंतर राजर्षी शाहू सभागृहाच्या प्रांगणात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण
करण्यात आले.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख
डॉ. पी.टी. गायकवाड, माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, विविध विद्याशाखांचे
अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी,
विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment