दोन विद्यार्थिनींना परदेशात उच्चशिक्षणाची संधी; एकीस ३० लाखांची शिष्यवृत्ती
नीलम यादव व मानसी हुपरीकर (डावीकडे) यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी प्रा.डॉ. पी.एस. पाटील. |
मानसी हुपरीकर |
नीलम यादव |
कोल्हापूर, दि. २० एप्रिल: शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी
आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाच्या संधी खुल्या करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या
सुवर्णमहोत्सवानिमित्त सन २०१२मध्ये ‘स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली. येथे बी.एस्सी.-एम.एस्सी.
एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाला आणि या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचच्या मानसी
हुपरीकर या विद्यार्थिनीला जर्मनीमध्ये संशोधनाची संधी चालून आली आहे, तर अद्याप
बी.एस्सी.मध्ये शिकणाऱ्या नीलम यादव या विद्यार्थिनीला ३० लाखांच्या शिष्यवृत्तीसह
फ्रान्समध्ये पुढील उच्चशिक्षणाची संधी चालून आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही आधुनिक
विज्ञान, तंत्रज्ञानाचे लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाच्या
सुवर्णमहोत्सवानिमित्त सन २०१२मध्ये स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीची
स्थापना करण्यात आली. समन्वयक म्हणून पदार्थविज्ञान शास्त्राच्या प्रा.डॉ. पी.एस.
पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. बारावीनंतर विद्यार्थ्यांना बी.एस्सी.-एम.एस्सी.
एकात्मिक अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देण्यात आला. सलग पाच वर्षे नॅनो-विज्ञान व
तंत्रज्ञानातील आधुनिक ज्ञान त्यांना प्राप्त व्हावे आणि संशोधन संधीही लाभाव्यात,
असा त्यामागे हेतू आहे.
या शाखेच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी मानसी
हुपरीकर सध्या एम.एस्सी. भाग-२ मध्ये शिकते आहे. तिला जर्मनीमधील मारबर्ग येथील
जगप्रसिद्ध फिलिप्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक प्रा.डॉ.वोल्फगँग पारक
यांच्याकडे इंटर्नशीप करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्याचप्रमाणे सध्या बी.एस्सी. भाग-३ मध्ये शिकत
असलेल्या नीलम यादव या विद्यार्थिनीला फ्रान्समधील पॅरिस-सुड विद्यापीठात पुढील
पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी पुढील दोन
वर्षांसाठी तिला इरॅस्मस मुंडस ही सुमारे ३० लाख ६६ हजार रुपये इतक्या रकमेची शिष्यवृत्ती
तिला मिळाली आहे.
या विद्यार्थिनींना स्कूल ऑफ नॅनोसायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी अधिविभागाचे समन्वयक व विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह डॉ. के.के. शर्मा, आणि डॉ. शिवदत्त प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोन्ही
विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले, तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस
शुभेच्छा दिल्या. या वेळी अधिविभागाचे समन्वयक डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह
आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत उपस्थित होते.
‘सर्वसामान्य कुटुंबातील मुलींचे भारावणारे यश’
मानसी हुपरीकर आणि नीलम यादव या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थिनींनी
मिळविलेले यश अन्य विद्यार्थिनींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. नीलम यादव ही मूळची
उत्तर प्रदेशातील असून तिचे वडील घनश्याम यादव हे पेंटर कॉन्ट्रॅक्टर आहेत.
व्यवसायानिमित्त हे कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले आहे. तिने सुमारे ३० लाख
रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.
मानसी हुपरीकर हिचे वडील प्रमोद हुपरीकर हे इचलकरंजीच्या शाहू हायस्कूलचे
मुख्याध्यापक आहेत, तर आई गृहिणी आहे. मानसीला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या
संशोधकांसमवेत संशोधन करण्याची संधी मिळते आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे
डॉ. पी.एस. पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment