व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे देशभरातील शिक्षण संस्थांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर. |
शिवाजी विद्यापीठाच्या ‘रुसा सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्ट्स’चे डिजीटल उद्घाटन
कोल्हापूर, दि. १७
एप्रिल: उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी संशोधकीय पायाभूत सुविधांची निर्मिती
करण्यास ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानां’तर्गत (रुसा) प्राधान्य देण्यात येत आहे. त्याची सुरवात आज देशातील
१७ महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून होते आहे, ही अत्यानंदाची बाब आहे, असे
मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज व्यक्त केले.
मंत्री श्री.
जावडेकर यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथून मंत्रालयाच्या मुख्यालयातून शिवाजी
विद्यापीठासह देशभरातील १७ विद्यापीठांमधील ‘रुसा’अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध सुविधांचे डिजीटल
उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन समारंभामध्ये उद्घाटित होण्याचा
पहिला सन्मान शिवाजी विद्यापीठाच्या ‘नॅचरल प्रोडक्ट्स अॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ केंद्रास प्राप्त झाला.
यावेळी शिवाजी
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह खासदार
धनंजय महाडिक, प्रधान सचिव व राज्य प्रकल्प संचालक (रुसा) श्रीमती मीता राजीवलोचन,
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू
डॉ. जी.एन. शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यापीठाच्या रुसा केंद्राच्या
समन्वयक डॉ. अकल्पिता अरविंदेकर, नांदेड विद्यापीठाचे प्रधान इन्व्हेस्टिगेटर डॉ.
शैलेश वढार, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रधान इन्व्हेस्टिगेटर
डॉ. प्रवीण यन्नावार, ‘रुसा’चे सहसंचालक शरद पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे
अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री.
जावडेकर म्हणाले, उच्चशिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी केंद्र सरकारने संशोधकीय
पायाभूत सुविधांसाठी सुमारे २८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील सुमारे
१३०० कोटी रुपयांचे वितरण ‘रुसा’च्या अंतर्गत करण्यात येत आहे. आजपर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट
उपक्रम असून रुसा ही केवळ मॉनिटरिंग एजन्सी नाही, तर उच्चशिक्षणाचा दर्जा
सुधारण्याचे कार्यही तिच्याकडून अपेक्षित आहे. ज्या शिक्षण संस्था दर्जा कायम
राखतील, त्यांनाच रुसाच्या माध्यमातून निधी प्रदान करण्यात येईल. तसेच, ज्या
सुविधेसाठी निधी वितरित करण्यात आला आहे, त्यासाठीच त्याचे उपयोजन करणे आवश्यक
आहे, असेही ते म्हणाले.
आधुनिक
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशभरातील १७ शिक्षण संस्थांमधील रुसा सुविधा
केंद्रांचे अवघ्या तासाभरात उद्घाटन करण्यात आले, ही फार महत्त्वाची बाब
असल्याचेही मंत्री श्री. जावडेकर यांनी सांगितले.
श्री. जावडेकर यांनी
नवी दिल्ली येथून शिवाजी विद्यापीठाच्या नॅचरल प्रोडक्ट्स एन्ड अल्टरनेटिव्ह
मेडिसिनविषयक रुसा केंद्राचे डिजीटल लाँचिंग केले. त्यावेळी ‘शिवाजी विद्यापीठातील या
केंद्राची आपण प्रत्यक्ष पाहणी केलेली असून तेथे उत्तम सुविधा उपलब्ध करण्यात
आल्या आहेत,’ अशी विशेष टिप्पणी त्यांनी केली.
यावेळी श्री.
जावडेकर यांच्या हस्ते ‘रुसा’चे पोर्टल आणि मोबाईल अप्लीकेशनचेही उद्घाटन करण्यात आले. नवी
दिल्ली येथून रुसाच्या राष्ट्रीय मिशन संचालक इशिता रॉय यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव केवलकुमार शर्मा
यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
रुसा सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्ट्स अॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन
शिवाजी
विद्यापीठातील रुसा सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्ट्स एन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन
उभारण्यासाठी ‘रुसा’कडून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून अत्याधुनिक संशोधन
सामग्रीने सुसज्ज असे केंद्र विद्यापीठात साकारले आहे. केंद्रात औषधे,
न्युट्रास्युटिकल आणि कॉस्मेटिक उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या वनौषधींवर प्रक्रिया
करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
याशिवाय, समन्वयक
डॉ. अकल्पिता अरविंदेकर यांना मधुमेहविषयक संशोधनासाठी स्वतंत्रपणे ३५ लाख
रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातही या केंद्रात संशोधन कार्य
करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment