कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: विसाव्या शतकाच्या
पूर्वार्धात शेतकऱ्यांमध्ये अपूर्व जागृती निर्माण करण्याचे महत्कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले,
असे गौरवोद्गार शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार अमर हबीब यांनी आज
येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने आयोजित
केलेल्या 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शेतीविषयक
विचार व सद्य:स्थिती' या विषयावर ते बोलत होते. वि.स. खांडेकर सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील
होते.
श्री. हबीब म्हणाले, महर्षी शिंदे सामाजिक कार्याचा परीघ उल्लंघणारे श्रेष्ठ
विचारवंत होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेतकरी परिषदांच्या माध्यमातून
शेतकऱ्यांत जागृती करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. शेतीमालाच्या भावापासून गावगाड्याच्या
पुनर्रचनेची बीजे त्यांच्या विचार व कार्यात सामावलेली आहेत. आज महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. शेतीचे, शेतीमालाचे व शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. अशा काळात महर्षी शिंदे
यांच्या विचारांचे औचित्य व द्रष्टेपण भारतीय समाजाला पथदर्शक ठरणारे आहे. आजच्या काळात
शेतकरी आंदोलनाची जबाबदारी किसानपुत्रांची आहे. ती पेलण्यासाठी
शेतकऱ्यांनी पुढे येण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महर्षी शिंदे यांचे स्थान अव्वल
दर्जाचे आहे. उपेक्षित मानकऱ्यांचे धनी ठरलेल्या शिंदे यांनी विविध क्षेत्रांत अतुलनीय
कामगिरी केली. त्यांच्या कार्याचे विस्मरण ही शोकांतिका ठरेल.
या प्रसंगी डॉ. अशोक चौसाळकर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार
मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर
शिंदे यांनी परिचय करून दिला. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. या वेळी डॉ. ल.रा.
नसिराबादकर, डॉ. जे.एफ. पाटील, दशरथ पारेकर, सुरेश शिपुरकर, कॉ. दिलीप पवार, आशा कुकडे, डॉ. टी.एस. पाटील, सुनीलकुमार
लवटे, संपतराव पवार (बलवाडी), डॉ. प्रकाश पवार, डॉ. पी. ए. अत्तार, डॉ. मेघा
पानसरे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. अवनीश पाटील तसेच शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठया
संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment