![]() |
| विद्यार्थ्यांना 'पीओएस' सेवेविषयी माहिती देताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी प्रभारी वित्त व लेखाधिकारी श्री. अजित चौगुले |
![]() |
| Add caption |
कोल्हापूर, दि. ६
एप्रिल: केंद्र सरकारच्या रोखविरहित आर्थिक व्यवहारांना चालना देण्याच्या धोरणाला
बळकटी देण्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठानेही कॅश विभागात ‘पॉईंट ऑफ सेल’ (पीओएस) यंत्रे बसविली आहेत.
विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठाशी संबंधित यंत्रणांनी त्याद्वारे अधिकाधिक
रोखविरहित व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या कॅश विभागामध्ये ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने रोखरहित व्यवहारांसाठी
‘पीओएस’ यंत्रे बसविण्यात आली आहेत. या सेवेस आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते
औपचारिक प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रोख रक्कम
भरण्यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंनी संवाद साधला. ते म्हणाले,
बहुतांश विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडे एटीएम-डेबीट कार्ड असतात. त्या
सर्वांनी पीओएसद्वारे किंवा अगदी मोबाईलवरून युपीआय, भीम ॲपच्या माध्यमातून देणी
भागविल्यास केंद्र सरकारचा हा उपक्रम निश्चितपणे आपण सर्व मिळून यशस्वी करू शकतो.
शिवाजी विद्यापीठाने यापूर्वी दीक्षान्त समारंभासाठीचे शुल्क ऑनलाइन स्वरुपात
स्वीकारून गेल्या वर्षीपासूनच रोखविरहित व्यवहारांना प्राधान्य देण्याचे धोरण
स्वीकारले आहे. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे ‘पीओएस’ सेवा आहे. या सेवेचा सर्व संबंधितांनी लाभ
घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी
कुलगुरूंनी पीओएस सेवेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रभारी
वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी विद्यापीठात ज्या ज्या ठिकाणी आर्थिक
व्यवहार केले जातात, अशा सर्व ठिकाणी पीओएस यंत्रे बसविण्यात येणार असल्याची
माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह ॲक्सिस
बँकेचे अधिकारी व विद्यापीठाच्या लेखा विभागातील अधिकारी व सेवक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment