शिवाजी विद्यापीठातील
स्नेहमेळाव्यात चारशे ज्येष्ठांचा सहभाग
कोल्हापूर दि. १९ एप्रिल: जीवनातील अडीअडचणींची चिंता न करता, भविष्यातील समस्येचा विचार न करता जीवनातील येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगावा. यासाठी शिवाजी विद्यापीठ आपणास नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवन येथे हा स्नेह मेळावा झाला. यामध्ये सुमारे चारशे ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आपण आपले सर्व आयुष्य जगण्याच्या स्पर्धेत घालवितो. नोकरीमध्ये कष्ट करतो. त्यामुळे आयुष्यात अनेक छंदांना वेळ देऊ शकत नाही आणि अनेकदा आवडत्या गोष्टी करावयाच्या राहून जातात. निवृत्तीनंतर आपल्याकडे असलेल्या मोकळ्या वेळेचे नियोजन केल्यास आपण अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो. इतरांना आनंद देण्याबरोबरच स्वत:ही त्याचा आनंद घेऊ शकतो.
शिवाजी विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग हा आपल्यासाठी सदैव वेगवेगळया योजना घेऊन येत राहील. त्यांचाही आपण लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी कुलगुरूंनी
केले.
या कार्यक्रमासाठी कुलगुरूंच्याया मातोश्री श्रीमती नागरबाई शिंदे आणि त्यांच्या भगिनी डॉ. शंकुतला सोळंके यांची विशेष उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत व परिचय करून दिला. विभागाच्या प्रभारी संचालक डॉ. सुमन बुवा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास डॉ. य.ना. कदम, डॉ. मानसिंगराव जगताप, डॉ. शिवाजीराव हिलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विभागाच्या वतीने कुलगुरूंच्या मातोश्रींचा आणि डॉ. य.ना. कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात गीते, भावगीते, शास्त्रीय गायन, नाटयछटा इत्यादी विविध गुणदर्शनाच्या स्पर्धा झाल्या. त्यांना सहभागी ज्येष्ठांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. विजयी स्पर्धकांना डॉ. सुमन बुवा यांचे हस्ते पुस्तके भेट देण्यात आली. हेमा गंगातीर्थकर, प्रभाकर कुलकर्णी, आर एस कुलकर्णी, रजनी हिरळीकर, श्री. आळतेकर, श्री. भागवत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजय जाधव व मनिषा झेले यांनी सूत्रसंचालन केले. यशोधन बोकील यांनी आभार मानले.
very nice
ReplyDeletewe will publish your news in our newspaper
ReplyDeleteThank you so much.
Delete