Wednesday, 5 April 2017

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार रयत शिक्षण संस्थेस जाहीर



१३ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान समारंभ



कोल्हापूर, दि. ५ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सन २०१७साठीचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार यंदा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेस प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. १,५१,००० रुपये, समानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असून येत्या १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होईल, असेही त्यांनी सांगितले.
श्रीमती शालिनी रामचंद्र कणबरकर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने  प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मरणार्थ प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार दर वर्षी त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजे दि. १३ एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठामार्फत प्रदान केला जातो.    या पुरस्कारासाठी भाषा, साहित्य, शास्त्र, सामाजिक नैसर्गिक, कला, क्रीडा, समाजसेवा तसेच सामाजिक हिताचे लक्षणीय काम करणारी व्यक्ती/ संस्था यांच्या कार्यचा आढावा घेऊन पुरस्कार देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते. गत वर्षी पहिला पुरस्कार भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव यांना प्रदान करण्यात आला होता.
रयत शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रा अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील र्फ अण्णा यांनी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा दि. २५ सप्टेंबर १९१९ रोजी सत्यशोधक समाजाच्या काले येथील परिषदेत केली. नेर्ले येथे सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी वसतिगृह काढले. महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी स्वदेशीचे अनवाणी चालण्याचे व्रत घेतले. गांधीजींच्या हस्तेसाताऱ्यात श्री. छत्रपती शाहू बोर्डींगचे नामकरण केले.
ग्रामीण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा हे पहिले मोफत वसतिगृहयुक्त महाविद्यालय होते. 'कमवा शिका' या मंत्राने, श्रमप्रतिष्ठेच्या तत्वज्ञानाने शिक्षणाला अपूर्व पाया पुरवला. हजारो गरीब मुले उच्च विद्याविभूषित झाली. ही संस्था आज आशियातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक मानली जाते. महाराष्ट्राच्या १५ जिल्ह्यांसह कर्नाटकातील एका जिल्ह्यात ४२ महाविद्यालये, ४३८ माध्यमिक विद्यालये, आठ अध्यापक विद्यालये, ४२ प्राथमिक, ३१ पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळा ८० वसतिगृहे, दोन आयटीआय, अन्य ६५ अशा एकूण ७१६ शाखा, साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी आणि १५ हजार सेवक एवढा प्रचंड विस्तार संस्थेचा आहे.
प्रा. रा. कृ. कणबरकर साताऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करत असताना पुढे तेथेच प्राचार्यही झाले. नवा माणूस घडविणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या शिक्षण द्धतीचा गौरव करण्याची संधी या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाला मिळाली आहे, अशी भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेस प्रभारी प्र-कुलगुरू डॉ डी.टी. शिर्के, कुलसचिव  डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्राचार्य बी. ए. खोत, डॉ. जे. एफ. पाटील उपसमितीचे सदस्य डॉ. आनंद पाटील उपस्थित होते.
--००--

No comments:

Post a Comment