कोल्हापूर, दि. १९
एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय तथा ज्ञानस्रोत
केंद्रात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत (रुसा) दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या समावेशी शिक्षण संसाधन
केंद्राचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात
आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यावेळी प्रमुख
उपस्थित होते.
‘रुसा’कडून प्राप्त झालेल्या निधीमधून दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन (आर.सी.आय.ई.) अर्थात
समावेशी शिक्षण संसाधन केंद्र ग्रंथालयात उभारण्यात आले आहे. दिव्यांग
विद्यार्थ्यांना अव्यंग विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध
कराव्यात, त्यांना आवश्यक साधनसुविधा तसेच अभ्यासपूरक पर्यावरण उपलब्ध करून
द्याव्यात, हा हेतू या केंद्राच्या उभारणीमागे आहे. या ठिकाणी अंध, मूकबधीर,
अस्थिव्यंगबाधित, गतिमंद अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना आवश्यक अध्ययन
साधनांची उपलब्धता करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र समन्वयक डॉ. नमिता खोत
यांनी यावेळी दिली.
केंद्रात उपलब्ध
सेवांबद्दलही डॉ. खोत यांनी मान्यवरांना माहिती दिली. या केंद्रात ब्रेल पुस्तके,
ऑडिओ बुक्स, स्क्रीन रिडींग सॉफ्टवेअर बसविलेले संगणक, ब्रेल प्रिंटींग, ई-बुक्स,
ई-जर्नल्स, ई-डाटाबेसेस सारखे ई-रिसोर्सेस, वाय-फाय सुविधेसह इंटरनेट, मॅग्निफायर,
स्पेक्टॅकल्स यांसारखी अल्पदृष्टी विद्यार्थ्यांना उपयुक्त साधने आदी बऱ्याच
सुविधांची उपलब्धता केली आहे. त्याचप्रमाणे येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण
तसेच करिअर गाईडन्सही देण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र
शासनाच्या प्रधान सचिव व राज्य प्रकल्प संचालक (रुसा) श्रीमती मीता राजीवलोचन, शिवाजी
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ
महाराज विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जी.एन. शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,
वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यापीठाच्या रुसा केंद्राच्या समन्वयक डॉ.
अकल्पिता अरविंदेकर, नांदेड विद्यापीठाचे प्रधान इन्व्हेस्टिगेटर डॉ. शैलेश वढार,
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रधान इन्व्हेस्टिगेटर
डॉ. प्रवीण यन्नावार, ‘रुसा’चे सहसंचालक शरद पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे
अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, ग्रंथालयातील अधिकारी व सेवक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment