Monday, 17 April 2017

विद्यापीठातील मधुमेहविषयक संशोधन तंत्रज्ञानाचे होणार औद्योगिक हस्तांतरण



शिवाजी विद्यापीठाच्या रुसा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करताना खासदार धनंजय महाडिक व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, प्रधान सचिव मीता राजीवलोचन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,नांदेडचे प्र-कुलगुरू डॉ. जी.एन. शिंदे आणि श्री. डी.जी. गुणे.

शिवाजी विद्यापीठाच्या रुसा केंद्रातील संशोधन सुविधांची माहिती घेताना खासदार धनंजय महाडिक.

मधुमेहविषयक संशोधन तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाबाबत लेटर ऑफ इन्टेंन्टवर स्वाक्षरी केल्यानंतर (डावीकडून) श्रीमती मीता राजीवलोचन, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार महाडिक, श्री. डी.जी. गुणे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व डॉ. अरविंदेकर.

कोल्हापूर, दि. १७ एप्रिल: शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्या १५ वर्षांच्या अथक संशोधनातून निर्माण करण्यात आलेल्या मधुमेहाला प्रतिबंध करणाऱ्या तंत्रज्ञानाचे लवकरच हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील सामंजस्य कराराचा प्राथमिक टप्पा म्हणून लेटर ऑफ इन्टेन्टवर आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार धनंजय महाडिक, प्रधान सचिव श्रीमती मीता राजीवलोचन यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या.
शिवाजी विद्यापीठातील प्रा.डॉ. अकल्पिता अरविंदेकर या गेल्या १५ वर्षांपासून मधुमेह-पूर्व ते मधुमेह होण्याच्या वाटचालीस प्रतिबंध करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत संशोधन करीत आहेत. त्यासाठी त्यांना ३५ लाख रुपयांचा विशेष प्रकल्पही मंजूर झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संशोधक टीम मधुमेहाला प्रतिबंध करणाऱ्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत संशोधन करीत आहे. या टीमने मानवावर घेतलेल्या चाचण्याही कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे हे मधुमेहपूर्व उपचारविषयक तंत्रज्ञान व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने आता औद्योगिक हस्तांतरणास सज्ज आहे.
त्या दृष्टीने आज शिवाजी विद्यापीठास नित्यम दीपकाम प्रा.लि., कोल्हापूर या कंपनीकडून लेटर ऑफ इंन्टेन्ट प्राप्त झाले आहे. यावर आज शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि कंपनीच्या वतीने डी.जी. गुणे यांनी स्वाक्षरी केल्या.
दरम्यान, यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते रुसा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. श्री. महाडिक यांनी यावेळी केंद्रातील संशोधन सुविधांची फिरून पाहणी केली. त्याचप्रमाणे डॉ. अरविंदेकर यांच्याकडून तेथे सुरू असलेल्या विविध संशोधनाचीही माहिती घेतली.

No comments:

Post a Comment