Thursday, 15 February 2018

कॉ.दत्ता देशमुख द्रष्टे, कणखर नेते: माधवराव जोगळेकर



 
शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात कॉ. दत्ता देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना (डावीकडून) डॉ. भारती पाटील, कॉ. माधवराव जोगळेकर, डॉ. बाबा आढाव, डॉ. अशोक चौसाळकर.

कॉ. माधवराव जोगळेकर

कोल्हापूर, दि. १५ फेब्रुवारी: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय करावयाचे, याचे आधीपासूनच नियोजन करणारे कॉ. दत्ता देशमुख एक द्रष्टे व कणखर नेते होते, असे प्रतिपादन अंबरनाथ (मुंबई) येथील कॉ.माधवराव जोगळेकर यांनी केले.           
शिवाजी विद्यापीठाच्या कॉ. दत्ता देशमुख अध्यासनाच्या वतीने विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहा 'कॉ. दत्ता देशमुख: जीवन कार्य' या विषयावर आज एकदिवसीय चर्चासत्र झाले. त्यावेळी बीजभाषण करताना कॉ. जोगळेकर बोलत होते.  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ.अशोक चौसाळकर उपस्थित होते. यावेळी बाबा आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
कॉ. जोगळेकर म्हणाले, महात्मा गांधीजींच्या काळात स्वातंत्र्य लढा समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचला होता. त्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय करावयाचे, असे दोन मत प्रवाह होते. नवजीवन संघटनेच्या माध्यमातून लोकांमध्ये शिक्षणविषयक जागृती निर्माण करण्याचे मोठे कार्य कॉ.देशमुख यांनी केले. देशामध्ये संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवायचे, ही विचारधारा त्यांनी मांडली.  संघटनेच्या माध्यमातून कार्य करताना प्रश्नांची उकल अंतर्गत चर्चेच्या माध्यमातून केली जाईल, त्यामध्ये आक्रमकता असणार नाही, याची त्यांनी नेहमी दक्षता घेतली. कामगारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करणारे नेतृत्व म्हणून कॉ.देशमुख पुढे आले. राज्याच्या खेड्यापाड्यांत वी कामगार विखुरलेला आहे, हे ओळखून त्यांना संघटि करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वी कामगार, शेत मजूर, असंघटि कामगार, धरणग्रस्त लोकांचे पुनर्वसन यासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घे प्रश्न सोडविण्याचा, त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला.  यामुळे कामगारांच्या मना त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. 
अध्यक्षीय भाषणा डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले, १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या राजकारणा कॉ.दत्ता देशमुख यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. कॉ.देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे न्याय, हक्क मागण्यासाठी वी कामगारांच्या संघटना निर्माण झाल्या. त्याचा वी कामगारांच्या पुढील पिढीला लाभ झाला. कॉ. देशमुख यांनी शेती, पाणी, पुनर्वसन, सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये मोठे योगदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यासनाच्या समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक परिचय करुन दिला.  नेहा वाडेकर यांनी आभार मानले.
डॉ. भारत पाटणकर, मोहन देशमुख, कॉ. अतुल दिघे, सुरेश परचुरे, डॉ. टी.एस. पाटील, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार,  डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 9 February 2018

विद्यार्थ्यांनी संकल्पनात्मक, कृतीशील शिक्षणाची कास धरणे आवश्यक: कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर


डॉ. पंडित विद्यासागर



कोल्हापूर, दि. फेब्रुवारी: एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कृतीशील शिक्षणाकडे वळताना संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्यामधील सुप्त कौशल्य गुणांचा शोध घेवून त्यांचा विकास करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागामार्फत ज्ञानविस्तार व्याख्यानमालेअंतर्गत  'करिअरचा मार्ग कसा निवडाल?  पायवाट की आडवाट?' या विषयावर कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांचे व्याख्यान वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. विद्यासागर म्हणाले, करिअरमध्ये उत्तुंग यश प्राप्तीसाठी तुमची ऊर्जा सामान्य ऊर्जेपेक्षा दीडपट जास्त असली पाहिजे.  यासाठी आपले मन, बुध्दी, शरीर सुदृढ असले पाहिजे.  स्पर्धेच्या जगामध्ये वावरताना एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची कला अवगत केली पाहिजे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पुढे जाण्याची, करिअर घडविण्याची तीव्र उर्मी असते.  तुम्ही कुठे शिकलात, यापेक्षा तुम्ही काय शिकलात याला जास्त महत्व असते. आपल्यामधील योग्य क्षमतांना विकसित करताना प्रत्येकाने मानवी मूल्यांची जपणूक करणे आवश्यक आहे.  प्रत्येक बारकाव्यांचा विचारपूर्वक अभ्यास करावा. त्यामुळे भविष्यामध्ये कोणतेही करिअर निवडताना अडचण येणार नाही. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कसे शिकावे हे शिकविले जात नाही.  आता, विद्यार्थ्यांनी स्वत:हून शिक्षणामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे. त्यामुळे शिक्षकांवर कायमस्वरुपी अवलंबून न राहता आवश्यक असेल तेव्हाच त्यांची मदत घ्यावी.  शिक्षणाची पद्धत बदलताना मूलभूत शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.  तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य ज्या वेळेस दिले जाते तेव्हा त्याचा प्रभाव पडला पाहिजे.  जीवनामध्ये साध्या साध्या मूल्यांचे अनुकरण करताना सर्वोच्च ध्येय प्राप्तीचे उद्दीष्ट समोर ठेवले पाहिजे.
डॉ. विद्यासागर पुढे म्हणाले, जागतिक पातळीचा विचार करताना आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवली पाहिजे. पायवाटपेक्षा आडवाटेमध्ये स्पर्धा कमी असते.  परंतु, त्या ठिकाणी स्वत:ला सिध्द करण्याची जबाबदारीही अधिक असते. विज्ञान क्षेत्राबरोबरच भाषेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आवाका वाढविल्यास अगणीत संधी निर्माण होतील. करिअर निवडताना कोणाच्या सांगण्यावरुन करिअर निवडू नका स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा. तुम्ही जेव्हा नकारात्मतक विचार अंगीकारत नाही त्यावेळेस तुमची यशाकडे वाटचाल होत असते. विविध आव्हानांना तोंड देताना विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी वेळेचे नियोजन काटेकोरपणे केले पाहिजे.  विपरित परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी संशोधनात्मक वृत्ती जोपासली पाहिजे.  अद्यावत मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करत असताना ते आपल्यावर स्वार होऊ नये याची प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.  करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वत:चा मार्ग स्वत: निवडताना प्लॅन ए, बी, सी तयार असणे गरजेचे आहे.  त्यामुळे निराशेला सामोरे जावे लागणार नाही.   
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यामधील क्षमता ओळखून करिअरची निवड करताना व्यापक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. आजचे आधुनिक जग तंत्रज्ञानाने व्यापलेले असल्याने करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम संधी प्राप्त झाली आहे.  या नामी संधीचा उपयोग करुन घेताना विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये, उपलब्ध अभ्यासक्रम आत्मसात करुन घेतले पाहिजेत.
इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ.सी.ए.लंगरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ए.एम. सरवदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.  डॉ. पी.बी. माने यांनी आभार व्यक्त केले तर प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सौ.विद्यासागर या उपस्थित होत्या. तसेच, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांचेसह विविध अधिविभागातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भारताला राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य बाबासाहेबांकडून: डॉ. भारत पाटणकर




विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ
कोल्हापूर, दि. ९ फेब्रुवारी: ब्रिटीशांच्या ताब्यातून स्वतंत्र झालेल्या भारताला राज्यघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, त्याचप्रमाणे हे राष्ट्र सातत्याने विकास पावत राहील, याची तरतूदही त्यांनी घटनेमध्ये करून ठेवली, हे बाबासाहेबांचे भारताचे राष्ट्रनिर्माता म्हणून सर्वाधिक मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित आधुनिक भारताच्या उभारणीत राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रनिर्माता आणि आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान अशा दुहेरी अंगांनी विचार करावा लागतो. बाबासाहेबांनी भारताची घटना अशा पद्धतीने लिहीली की, ज्यामध्ये राष्ट्रनिर्मिती व राष्ट्रउभारणीची प्रक्रिया निरंतर होत राहील, अशी व्यवस्था आहे. जगातील अन्य कोणत्याही देशाच्या घटनेमध्ये अशी तरतूद नाही. भारतीय समाजातील जात, धर्म, पंथ, लिंग आदींच्या आधारावर प्रस्थापित झालेल्या शोषण व्यवस्थेचा अंत करण्याच्या दृष्टीने राज्यघटनेत जागा निर्माण करून देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या समता, स्वातंत्र्य व बंधुता अर्थात मत्ता या तत्त्वाच्या आधारावरच राज्यघटनेची पर्यायाने या राष्ट्राची उभारणी केली. प्रेम व करुणा या बुद्धाने सांगितलेल्या मूलभूत तत्त्वांखेरीज एकात्म राष्ट्राची उभारणी अशक्य आहे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणून त्यांनी त्यांचा समावेश घटनेत केला.
आधुनिक भारताची बाबासाहेबांची संकल्पनाही केवळ तंत्रज्ञानात्मक अथवा भौतिक आधुनिकतेच्या पलिकडे जाणारी असल्याचे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, बाबासाहेबांनी जल, जमीन आणि जंगल या नैसर्गिक संसाधनांची संकल्पना माणसाशी जोडून त्यांची पुनर्मांडणी केली. स्वातंत्र्य, नैसर्गिक संसाधने आणि मानव यांच्यातील सहसंबंधांची प्रस्थापना हा या मांडणीमागील कळीचा मुद्दा आहे. शेतीचे आधुनिकीकरण या बाबीचा विचार करताना बाबासाहेबांना त्यात केवळ तंत्रज्ञानात्मक आधुनिकता अभिप्रेत नाही, तर शेती ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून तिच्या माध्यमातून उत्पादकता वृद्धीसाठी त्यात गुंतलेले मनुष्यबळ, नैसर्गिक संसाधने यांना प्रचलित पद्धतीमधून मुक्त करणे अभिप्रेत आहे. देशातील ७३ टक्के साधनसंपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या हाती एकवटलेली असणे हे राष्ट्रीय आपत्तीचे निदर्शक असून आधुनिक राष्ट्रउभारणीसाठी घातक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. गेल ऑम्व्हेट आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाल्या, जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या बरोबरीने त्यांनी या देशात निर्माण केलेल्या अनेक समस्या व दुःखे यांचे निराकरण करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. जीवनाचा अधिकार व जगण्याचा अधिकार यांचा राज्यघटनेत समावेश हे त्यांचे भारतीय समाजावर फार मोठे उपकार आहेत. राज्यघटनेने प्रदान केलेल्या एक व्यक्ती-एक मत ही बाब खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात यावयाची असेल तर तिला सामाजिक-आर्थिक समतेचे अधिष्ठान लाभायला हवे. भांडवलशाहीमुक्त व शोषणमुक्त व्यवस्था प्रस्थापित झाल्याखेरीज या देशाची भरभराट होणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. महिलांची शोषणमुक्ती करण्याच्या दिशेने हिंदू कोड बिल ही बाबासाहेबांची या समाजाला महान देणगी असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी बाबासाहेबांच्या राष्ट्रउभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, बाबासाहेबांनी चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीचा आग्रह धरला. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांनी ग्रंथांच्या सहवासात राहिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. तर, चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीसाठी त्या समाजातील शिक्षकही चारित्र्यसंपन्न व विनयशील असायला हवेत, यासाठी बाबासाहेब आग्रही होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले तर, डॉ. गिरीश मोरे यांनी आभार मानले. यावेळी धारवाड येथील डॉ. टी.ब्रह्मानंदन यांच्यासह अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ.ए.एम. गुरव, प्रा. हरिष भालेराव, प्रा. विनय कांबळे, डॉ. भगवान माने, डॉ. राजन गवस, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. गौतम कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.