Thursday, 14 January 2021

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

मराठी अधिविभागासाठी साहित्यिकांची चित्रे रेखाटणारे चित्रकार सुधीर पवार यांचा शाल, पुष्प व ग्रंथभेट देऊन सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. 

उद्घाटन समारंभाचा शॉर्ट व्हिडिओ


कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाने मराठी भाषा संवर्धनासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. यंदाही मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत असताना त्यांनी अभिनव उपक्रम, कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यातील सातत्य कायम राखावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात येत असलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२१’चे औपचारिक उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने यंदा लेखक-संवाद हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून डॉ. राजन गवस, प्रकाशक अनिल मेहता, महादेव मोरे, मोहन पाटील, माया नारकर, कृष्णात खोत, किरण गुरव, नामदेव माळी आणि संपत मोरे या दिग्गजांशी संवाद साधण्यात येणार आहे. या निमित्ताने नव्या-जुन्या लेखक प्रकाशकांचे हृद्गत श्रोत्यांसमोर उलगडले जाईल. त्यांच्या अभिव्यक्तीच्या प्रेरणा, जाणीवा यांची माहिती होईल. त्याचप्रमाणे ‘स्मरण अरुण कोलटकरांचे...’ या चर्चसत्रांतर्गत अरुण कोलटकरांचे साहित्य, व्यक्तीमत्त्व यांची विविधांगांनी माहिती लोकांसमोर येईल, हे खूप महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने वेळोवेळी विविध साहित्यिक, कवींच्या साहित्याच्या अनुषंगाने चर्चासत्रे आयोजित करण्याची गरज आहे.

सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते मराठी अधिविभागामध्ये स्थापित साहित्यिकांच्या कायमस्वरुपी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. चित्रकार सुधीर गुरव यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. त्यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, विदेशी भाषा प्रमुख डॉ. मेघा पानसरे, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, उदयसिंह राजेयादव आदी उपस्थित होते.

पंधरवड्यांतर्गत आयोजित कार्यक्रम

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘लेखकसंवाद’ आयोजित केला आहे. त्यात डॉ. राजन गवस, अनिल मेहता, महादेव मोरे, मोहन पाटील, माया नारकर, कृष्णात खोत, किरण गुरव, नामदेव माळी, संपत मोरे यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी विष्णू पावले लिखित ‘पधारो म्हारो देस’ णि डॉ. सयाजी गायकवाड यांच्या ‘मराठी पोवाडा (तीन भाग)’ या ग्रंथांचे डॉ. बी.एम. हिर्डेकर यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. २० जानेवारी रोजी ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ या चर्चासत्रात प्रा. श्रीकृष्ण कालगावकर, प्रा. अरुण चव्हाण आणि प्रा. अविनाश सप्रे (अध्यक्ष) सहभागी होतील. २८ जानेवारी रोजी पंडित आवळीकर काव्य पुरस्कारांचे वितरण होईल. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून सदर कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पाहण्यास उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Wednesday, 13 January 2021

‘करवीर छत्रपती दुसरे शिवाजी’ ग्रंथाचे विद्यापीठात पुनर्प्रकाशन

 

'करवीर छत्रपती दुसरे शिवाजी' ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) राहुल भल्ले, आशिष कुलकर्णी, वैभवराज राजेभोसले, डॉ. अवनिश पाटील, राहुल मेहता, पारस मेहता आदी.


कोल्हापूर, दि. १३ जानेवारी: ‘करवीर छत्रपती दुसरे शिवाजी’ या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनामुळे करवीर रियासतीचा एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्वाचा दस्तावेज नव्या पिढीला वाचनासाठी उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

येथील पार्श्व पब्लिकेशनच्या वतीने (कै.) डॉ. कमलाकर श्रीखंडे लिखित ‘करवीर छत्रपती दुसरे शिवाजी’ या ऐतिहासिक ग्रंथाचे पुनर्प्रकाशन आज शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, दुसरे शिवाजी यांना प्रदीर्घ कारकीर्द लाभली तरी त्यांना शेजारी संस्थानांशी चौफेर संघर्ष करावे लागले. त्यातून त्यांना उसंत लाभली नाही. तरीही त्यांनी करवीर संस्थानाचे प्राणपणाने रक्षण केले. इतकी संघर्षशील कारकीर्द आजही दुर्लक्षित राहिली. ती या निमित्ताने सामोरी येते आहे. या पुस्तकाचे इतिहासप्रेमी नागरिक स्वागत करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनिश पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी दुसरे यांची कारकीर्द करवीर संस्थानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असूनही दुर्लक्षित राहिली. डॉ. श्रीखंडे यांनी अथक संशोधन करून त्यांच्या कारकीर्दीला उजाळा देण्याचे महत्त्वाचे काम केले. या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनामुळे त्यांचे कार्य नव्याने जनतेसमोर येते आहे, ही महत्त्वाची बाब आहे.

यावेळी वैभवराज राजेभोसले यांनी छत्रपती दुसरे शिवाजी यांचा चरित्रग्रंथ जनतेसमोर येत असल्याचा आनंद व अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी पार्श्व पब्लिकेशनचे राहुल मेहता, पारस मेहता, आशिष कुलकर्णी, राहुल भल्ले आदी उपस्थित होते.

Tuesday, 12 January 2021

जिजाऊ माँसाहेब, विवेकानंद यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठात जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. जी.एस. गोकावी, डॉ. जे.एस. बागी, जी.आर. पळसे, व्ही.टी. पाटील, डॉ. आर.व्ही. गुरव आदी.

अभिवादन कार्यक्रमाचा शॉर्ट व्हिडिओ 


कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जी.एस. गोकावी, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Thursday, 7 January 2021

सरोजिनी बाबर यांच्याकडून लोकज्ञानाचे हयातभर संकलन: डॉ. राजन गवस

 

पुस्तक प्रकाशन सोहळ्याची लघु चित्रफीत (व्हिडिओ)


'सरोजिनी बाबर: कार्य, संशोधन आणि लेखन' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. राजन गवस व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. सोबत (डावीकडून) डॉ. संतोष सुतार, डॉ. प्रकाश पवार, डॉ. वैशाली भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, किरण गुरव, मृणालिनी जगताप, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. नितीन माळी.


डॉ. वैशाली भोसले संपादित ‘सरोजिनी बाबर: कार्य, संशोधन आणि लेखन’ पुस्तकाचे प्रकाशन


कोल्हापूर, दि. ७ जानेवारी: लोकसाहित्य हे लोकज्ञान मानून या ज्ञानाचे संकलन करण्याच्या कामी डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपली हयात वेचली. त्यांच्या कार्याविषयी शिवाजी विद्यापीठामार्फत पुस्तक प्रकाशित होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. वैशाली भोसले यांनी संपादित केलेल्या

‘सरोजिनी बाबर: कार्य, संशोधन आणि लेखन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सकाळी शिवाजी विद्यापीठात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गवस बोलत होते. विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

डॉ. गवस म्हणाले, सरोजिनी बाबर यांनी समाजात प्रचलित असणारी अनेक गीते, त्यातील लोकज्ञान वेचण्यासाठी, संकलित करण्यासाठी आयुष्यभर संशोधन कार्य केले. त्यापुढे जाऊन बुरसटलेल्या समाजाला जागृत करीत राहण्याचे काम केले. जीवनात अनेकविध जबाबदाऱ्या पेलत असताना सातत्याने त्यांनी बहुजन समाजाचे सांस्कृतिक, साहित्यिक प्रतिनिधित्व केले. या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन विद्यापीठाने चर्चासत्रे आयोजित केली. तसेच, हे पुस्तकही साकारले, ही समाधानाची बाब आहे. यापुढील काळातही अशाच दर्जेदार ग्रंथनिर्मितीसाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गोरगरीब, शेतकऱ्यांविषयी प्रचंड कळकळ व आस्था बाळगून त्यांच्यासाठी, त्यांच्यामधीलच लोकसाहित्याचे कण वेचून सरोजिनी बाबर यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या योगदानाची अतिशय उत्तम दखल या पुस्तकात घेण्यात आली आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना ते मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांनी, महिलांनी सरोजिनी बाबर यांच्या योगदानाप्रती कृतज्ञ राहावे, अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक योगदानाचा यथोचित वेध घेतला जाणे आवश्यक आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. गवस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सरोजिनी बाबर यांच्या भगिनी कुमुदिनी पवार या उपस्थित न राहू शकल्याने त्यांच्या शुभसंदेशाची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्कूलचे संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वैशाली भोसले यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. सहसंपादक मृणालिनी जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास महर्षी वि.रा. शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. नितीन माळी, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे, किरण गुरव आदी उपस्थित होते.

   

Monday, 4 January 2021

‘इपीडब्लू’च्या टॉप फाईव्ह संशोधकात

डॉ. ज्ञानदेव तळुले यांचा समावेश

 

कोल्हापूर, दि. ४ जानेवारी: इकॉनॉमिक अ‍ॅन्ड पॉलिटिकल विकली (इपीडब्लू) या प्रख्यात नियतकालिकाच्या गतवर्षीच्या पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट संशोधक लेखकांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले यांचा समावेश झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील प्रा. तळुले यांच्या शोधनिबंधासाठी त्यांचा टॉप फाईव्हमध्ये गौरव करण्यात आला.

प्रा. तळुले यांनी २००१ ते जुलै २०१८ या अठरा वर्षांच्या कालखंडातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माहिती संकलित केली आहे. १५१९ आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यानंतर हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्या आधारावर त्यांनी विस्तृत शोधनिबंध तयार केला. यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्‍त यांच्याशी त्यांनी चर्चा केली. शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा त्यांनी या माहितीच्या अधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काय उपाययोजना करता येतील, याची मांडणीही त्यांनी या शोधनिबंधात केली आहे. पंजाब, कर्नाटक आणि केरळमध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यास त्या त्या सरकारला यश आले आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मात्र त्या होत आहेत. याच्या मुळाशी असलेल्या विविध कारणांचा परामर्श प्रा. तळुले यांनी घेतला आहे. त्यांचे हे संशोधन ‘इकॉनॉमिक अ‍ॅन्ड पोलिटिकल विकली’मध्ये प्रकाशित झाले. हाच शोधनिबंध सन २०१९-२०२० मधील सर्वोत्तम पाचमधील एक ठरला आहे.

Friday, 1 January 2021

डॉ. ठकार, डॉ. झारी यांच्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन

मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रात नितीमूल्यांचे महत्त्व असाधारण: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

 शिवाजी विद्यापीठात डॉ. एच.एम. ठकार व डॉ. ताहीर झारी लिखित संदर्भग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अॅड. व्ही.एन. पाटील यांच्यासमवेत लेखकद्वयी व अन्य शिक्षक.


कोल्हापूर, दि. १ जानेवारी: मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रात नैतिक मूल्यांचा संकोच झाल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण होते. म्हणून या संदर्भात नितीमूल्यांचे असाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या एमबीए युनिटचे डॉ. एच.एम. ठकार आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. ताहीर झारी यांनी लिहीलेल्या ‘एथिकल परस्पेक्टीव्ह्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आपल्या देशातील लोकसंख्येकडे आपण भार म्हणून न पाहता आपली मनुष्यबळाची ताकद म्हणून पाहिले आणि त्या दृष्टीने या मनुष्यबळाचा विकास केला, तिचा योग्य तऱ्हेने विनियोग केला, तर निश्चितपणाने आपल्या देशाचे चित्र पालटेल. उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये या मनुष्यबळाचा उत्तम वापर करता येईल. या मनुष्यबळ विकास क्षेत्रात प्रामाणिकपणा, समर्पण वृत्ती आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेलाही तितकेच मोठे महत्त्व आहे. त्यांचा संकोच झाल्यास मनुष्यबळावर त्याचा विपरित परिणाम होतोच, पण, उद्योग-व्यवसायांवरही त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याने असा संकोच होणे कोणालाच परवडणारे नाही, याची जाणीव करून देणारा उत्तम संदर्भग्रंथ डॉ. ठकार व डॉ. झारी यांनी निर्माण केला आहे. शोधप्रबंधाचे हे एक उत्तम ग्रंथरुप त्यांनी साकार केले आहे.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, हा संदर्भग्रंथ एमबीएच्या विद्यार्थ्यांसह उद्योग-व्यवसायांत कार्यरत प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा उपक्रम हाती घेणे, यालाही वेगळे महत्त्व आहे. जगातील विविध राष्ट्रे वेगवेगळ्या बाबतीत आघाडीवर आहेत. भारत मनुष्यबळाच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्याचा सकारात्मक लाभ आपण घ्यायला हवा, असे सूचित करणारा हा ग्रंथ आहे.

यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव व ज्येष्ठ विधिज्ञ व्ही.एन. पाटील यांनीही शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. डॉ. एच.एम. ठकार यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. डॉ. झारी यांनी आभार मानले. यावेळी गणित अधिविभाग प्रमुख डॉ. सरिता ठकार, डॉ. केदार मारुलकर, डॉ. दीपा इंगवले, डॉ. अनुप मुळे आदी उपस्थित होते.

‘द अनबिटेबल’ पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

अधिकाधिक उत्तम कामासाठी प्रेरित करणारे पुस्तक: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

'द अनबिटेबल' पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ज्योती क्षीरसागर, विजयसिंह माने, मनिषा माने, डॉ. अजय मस्के, अश्विनी कांबळे, मनिष आपटे आदी.


कोल्हापूर, दि. १ जानेवारी: अधिकाधिक उत्तम काम करण्यासाठी ‘द अनबिटेबल’ हे पुस्तक प्रवृत्त करते. विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी ते आवर्जून वाचायला हवे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

प्रेरक वक्ते म्हणून लोकप्रिय असणारे वाठार येथील डॉ. अजय मस्के आणि अश्विनी कांबळे यांनी लिहीलेल्या ‘द अनबिटेबल: एन एनलाइटन्ड पिक परफॉर्मर’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुरची-तासगाव येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘द अनबिटेबल’ पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. मस्के यांच्या स्वतःच्या अनुभवांतून ते आले आहे. अनुभवांतून आल्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढली आहे आणि त्यांची प्रचिती घेता येऊ शकते. अंगिकृत कोणतेही काम एखादा उत्तम करीतच असतो, पण ते त्याहूनही अधिक चांगले करता येऊ शकते, हे सांगून त्या दिशेने जाण्यास हे पुस्तक वाचकाला प्रवृत्त करते. डॉ. मस्के यांनी विद्यार्थ्यांमधील रोजगाराभिमुखता वाढविण्यासाठी आणि त्यांना रोजगार प्रदान करण्यासाठी ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर म्हणाल्या, डॉ. मस्के यांनी आयुष्यात खूप सुरवातीपासून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम अंगिकारले, त्याची मी साक्षीदार आहे. त्या कार्याचे फलित म्हणजे हे पुस्तक आहे. ते विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विजयसिंह माने यांनीही यावेळी पुस्तकाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सुरवातीला कौस्तुभ बारवडे यांनी स्वागत केले. अश्विनी कांबळे यांनी पुस्तक परिचय करून दिला, तर डॉ. अजय मस्के यांनी आभार मानले. यावेळी डॉ. श्रीकांत पाटील, वारणा कालवे विभाग इस्लामपूरचे कार्यकारी अभियंता डी.डी. शिंदे, रेडिओ मिर्चीचे आरजे मनिष आपटे, स्टेशन हेड विक्रांत हलगली, अकाऊंट व्यवस्थापक नितीन माणगावे, श्री अत्री प्रिंटींग प्रेसचे साई प्रसाद, उमेश सुतार, सूरज चौगुले, अजित शिंदे, सूरज चव्हाण, ओंकार मगदूम आदी उपस्थित होते.