Wednesday 13 January 2021

‘करवीर छत्रपती दुसरे शिवाजी’ ग्रंथाचे विद्यापीठात पुनर्प्रकाशन

 

'करवीर छत्रपती दुसरे शिवाजी' ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) राहुल भल्ले, आशिष कुलकर्णी, वैभवराज राजेभोसले, डॉ. अवनिश पाटील, राहुल मेहता, पारस मेहता आदी.


कोल्हापूर, दि. १३ जानेवारी: करवीर छत्रपती दुसरे शिवाजी या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनामुळे करवीर रियासतीचा एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्वाचा दस्तावेज नव्या पिढीला वाचनासाठी उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

येथील पार्श्व पब्लिकेशनच्या वतीने (कै.) डॉ. कमलाकर श्रीखंडे लिखित करवीर छत्रपती दुसरे शिवाजी या ऐतिहासिक ग्रंथाचे पुनर्प्रकाशन आज शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, दुसरे शिवाजी यांना प्रदीर्घ कारकीर्द लाभली तरी त्यांना शेजारी संस्थानांशी चौफेर संघर्ष करावे लागले. त्यातून त्यांना उसंत लाभली नाही. तरीही त्यांनी करवीर संस्थानाचे प्राणपणाने रक्षण केले. इतकी संघर्षशील कारकीर्द आजही दुर्लक्षित राहिली. ती या निमित्ताने सामोरी येते आहे. या पुस्तकाचे इतिहासप्रेमी नागरिक स्वागत करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनिश पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी दुसरे यांची कारकीर्द करवीर संस्थानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असूनही दुर्लक्षित राहिली. डॉ. श्रीखंडे यांनी अथक संशोधन करून त्यांच्या कारकीर्दीला उजाळा देण्याचे महत्त्वाचे काम केले. या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनामुळे त्यांचे कार्य नव्याने जनतेसमोर येते आहे, ही महत्त्वाची बाब आहे.

यावेळी वैभवराज राजेभोसले यांनी छत्रपती दुसरे शिवाजी यांचा चरित्रग्रंथ जनतेसमोर येत असल्याचा आनंद व अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी पार्श्व पब्लिकेशनचे राहुल मेहता, पारस मेहता, आशिष कुलकर्णी, राहुल भल्ले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment