Tuesday, 19 January 2021

शिवाजी विद्यापीठाचा बरद्वान विद्यापीठाशी

अवकाश संशोधनाबाबत सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ व बरद्वान विद्यापीठ यांच्या दरम्यान सामंजस्य करार कार्यक्रम प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व ऑनलाईन सहभागी झालेले  मान्यवर.

शिवाजी विद्यापीठ व बरद्वान विद्यापीठ सामंजस्य करार प्रसंगी (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

ग्लोबल सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीमबाबत होणार संशोधन

कोल्हापूर, दि. १९ जानेवारी: अवकाशविषयक तंत्रज्ञान आणि ग्लोबल सॅटेलाईट बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम (जी.एन.एस.एस.) यांच्या संशोधनात आघाडीवर असलेल्या पश्चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. ऑनलाईन पद्धतीने सोमवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या सामंजस्य कराराचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सुरवात जीएनएसएसविषयक संशोधन सहकार्याने होत असली तरी केवळ तेवढ्यापुरताच हा करार मर्यादित राहू नये, तर दोन्ही विद्यापीठांतील विविध अधिविभागांनी पुढे येऊन हे शैक्षणिक व संशोधनविषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास त्याची अधिक उत्तम फळे मिळतील. दोन्ही विद्यापीठांना त्याचा चांगला लाभ होईल.

बरद्वान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ए.के. पाणिग्रही म्हणाले, शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला हा सामंजस्य करार आनंददायी क्षण आहे. अवकाश संशोधनाच्या अनुषंगाने डाटा विश्लेषणात शिवाजी विद्यापीठाची कामगिरी उच्च दर्जाची आहे. या सहकार्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांचा अवकाश संशोधनातील लौकिक निश्चितपणे वाढीस लागेल. काही चांगले संशोधन प्रकल्प या अंतर्गत हाती घेता येतील आणि काही चांगले शोधनिबंधही त्यातून आकाराला येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, अवकाश संशोधनाबरोबरच पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यात भूपृष्ठीय हवामान, अवकाशीय हवामान, वातावरणातील बदल, भूचुंबकत्व आदी अनेक अनुषंगिक क्षेत्रे आहेत. त्यात जितके सूक्ष्म स्तरावर जावे, तितके अधिक वैविध्यपूर्ण, अभिनव निष्कर्ष हाती लागू शकतील. त्या दृष्टीनेही हा करार खूप महत्त्वाचा आहे.

सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी तर बरद्वान विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. अभिजीत मझुमदार यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, बरद्वान विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.के. चक्रवर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. के.वाय राजपुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. राजीव व्हटकर आणि बरद्वान विद्यापीठाचे डॉ. अनिंद्य बोस यांनी सामंजस्य कराराचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

असा आहे सामंजस्य करार

पश्चिम बंगालमधील बरद्वान विद्यापीठामध्ये जी.एन.एस.एस. संदर्भात प्रशिक्षण व संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे. अवकाश संशोधनासाठी हे विद्यापीठ विशेष प्रसिद्ध आहे. शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्र (एस.आर.सी.) हे सुद्धा अवकाश संशोधनासाठी विशेषतः डाटा विश्लेषणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. इस्रोच्या आय.आर.एन.एस.एस. या उपग्रहाचा रिसिव्हर विद्यापीठाच्या पन्हाळा येथील उपकेंद्राच्या ठिकाणी कार्यान्वित आहे. भूपृष्ठीय वातावरणीय बदलांच्या संशोधनाच्या बाबतीतही शिवाजी विद्यापीठ अग्रेसर आहे. तसेच, विश्लेषणासाठी आवश्यक असणारी अनेक साधने येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या तसेच भविष्यातील जी.एन.एस.एस. तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे अवकाश संशोधन केंद्र आणि बरद्वान विद्यापीठाचे जीएनएसएस संशोधन केंद्र यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत दोन्ही विद्यापीठे एकमेकांना जी.एन.एस.एस. च्या अनुषंगाने शैक्षणिक व संशोधनपर सहकार्य करणार आहेत. डाटा एक्स्चेंजबरोबरच शोधनिबंध प्रकाशनेही करण्यात येणार आहेत.

 

No comments:

Post a Comment