Monday, 18 January 2021

मराठीचे विद्यार्थीही लिहीताहेत ही अभिमानाची बाब: डॉ. बी.एम. हिर्डेकर

शिवाजी विद्यापीठात विष्णू पावले, सयाजीराव गायकवाड यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

 

विष्णू पावले यांच्या 'पधारो म्हारो देस' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. बी.एम. हिर्डेकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. व्ही.एन. शिंदे.

डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या 'मराठी पोवाडा (तीन भाग)' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. बी.एम. हिर्डेकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह (डावीकडून) विष्णू पावले, डॉ. रणधीर शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. व्ही.एन. शिंदे.


कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे केवळ शिक्षकच नव्हे, तर विद्यार्थी सुद्धा लिहीताहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होत असलेल्या मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आज लेखक विष्णू पावले यांच्या पधारो म्हारो देसणि डॉ. सयाजी गायकवाड यांच्या मराठी पोवाडा (तीन भाग)या पुस्तकांचे प्रकाशन विद्यापीठात डॉ. हिर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. पावले यांच्या पधारो म्हारो देस या राजस्थानच्या प्रवासवर्णनाविषयी बोलताना डॉ. हिर्डेकर म्हणाले, हे पुस्तक म्हणजे उत्तम प्रवास वर्णनाचा नमुना आहे. छोटी वाक्ये, प्रासादिक व ओघवती भाषा ही पावले यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणून या लेखनात दिसतात. त्यांची नर्मविनोदी शैलीही अधूनमधून डोकावते आणि वाचकाला ते आपल्या प्रवासात सामावून घेतात. त्यांच्या भाषेचा बाज उत्तम असून त्यांच्यासारखी गरुडभरारीची स्वप्ने पाहणारे विद्यार्थी लेखक विद्यापीठाला लाभले, ही आनंदाची गोष्ट आहे.

पावले यांच्या पुस्तकातील घडी पुरानी है... या वाक्याचा संदर्भ घेत डॉ. हिर्डेकर म्हणाले, घडी पुरानी है, समय खराब है, लेकिन आप लिख रहे है, ये बडी अच्छी बात है।

डॉ. गायकवाड यांनी मराठी पोवाडा (तीन भाग) हा प्रचंड असा संशोधनग्रंथ साकारून मराठी साहित्याच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याचे सांगून डॉ. हिर्डेकर म्हणाले, सध्याच्या सार्वत्रिक बधीरीकरणाच्या कालखंडात पोवाड्यासारख्या प्रेरित करणाऱ्या, जागृत करणाऱ्या लोककलांच्या अनुषंगाने साहित्यनिर्मिती होणे हे फार मोठे सुलक्षण आहे. या निर्मितीमुळे पोवाड्याचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य असा सर्वंकष दस्तावेज मराठी समाजाच्या हाती आला आहे. या माध्यमातून लोककलांचा वारसा पुढे जाण्यास मोलाची मदत होणार आहे.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, दोन्ही ग्रंथांचे विषय वेगवेगळे असले तरी मराठी अधिविभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी ते लिहीले आहेत, हा त्यातील समान धागा आहे. पोवाड्यावरील सर्वंकष माहितीने परिपूर्ण असलेला गायकवाड यांचा ग्रंथ हा संशोधन ग्रंथ कसा असावा, याचा सुंदर वस्तुपाठ आहे. तर पावले यांनी उत्कृष्ट प्रवास वर्णनाचा नमुना सादर केला आहे. या पुस्तकाचे मराठी साहित्यिकांच्या वर्तुळासह वाचकांकडूनही प्रेमाने स्वागत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विष्णू पावले, डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment