Saturday 30 January 2021

‘मूलद्रव्यांची दुनिया’ विविध भाषांत अनुवादित व्हावे: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठातर्फे उपकुलसचिव व विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे.
 
शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव व विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिकारी वर्ग.


शासनाच्या साहित्य पुरस्काराबद्दल विद्यापीठात डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा गौरव

कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: ‘आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाचा अनुवाद विविध प्रादेशिक भाषांत होऊन सर्वच भाषांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल सायंकाळी येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सन २०१९साठी उत्कृष्ट विज्ञान ग्रंथ म्हणून महात्मा जोतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त डॉ. शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विज्ञान लेखन करीत असताना त्यामधील वस्तुनिष्ठतेला कोणताही धक्का न लावता अत्यंत ओघवत्या गोष्टीरुप पद्धतीने समजावून सांगण्याची शैली डॉ. शिंदे यांना साधली आहे. त्यामुळे वाचकाला ते आपल्याशेजारी बसून सांगताहेत की काय, असा भास निर्माण होतो. त्यामुळे अवघड विषय समजावून घेणे सोपे जातेच, शिवाय ते कायमस्वरुपी लक्षात राहते. आवर्तसारणीसारखा क्लिष्ट विषयही त्यांच्या या शैलीमुळे अत्यंत वाचनीय झाला आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य वाचकालाही हा विषय रुक्ष वाटणार नाही, तर विज्ञानाची गोडीच निर्माण होईल, असा त्यांनी मांडला आहे. हे पुस्तक हिंदी, इंग्रजीसह कन्नड, तेलगू, तमीळ आदी विविध भारतीय भाषांतून अनुवादित झाल्यास देशातील प्रादेशिक विद्यार्थ्यांचीही मोठी सोय होईल. त्यांनी असेच लिहीते राहावे आणि स्वतःबरोबरच शिवाजी विद्यापीठाचाही लौकिक वृद्धिंगत करावा, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, डॉ. शिंदे यांच्यात विद्यार्थी दशेपासूनच सातत्याने काही तरी वेगळे करीत राहण्याची ऊर्मी आहे. ती आजतागायत अबाधित आहे, याचा आनंद व अभिमान वाटतो. त्यांची लेखन व निवेदन शैली अत्यंत रंजक असून वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. या पुढील काळातही त्यांनी विज्ञान लेखनातील आपली वाटचाल जोमाने चालू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सत्काराला उत्तरादाखल बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, वाचन आणि लेखनाच्या प्रेरणा माझ्यात जागृत करण्याचे काम माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. तेव्हापासून विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून माझ्या प्रत्येक पुस्तकाचे लेखन केले. एका लेखापासून सुरू झालेला प्रवास केवळ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेपोटी आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकापर्यंत येऊन ठेपला. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार लाभला, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची व जबाबदारीची जाणीव करून देणारी बाब आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ, विद्यापीठाचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ज्येष्ठ कवी संजय कृष्णाजी पाटील, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा लेखन प्रवास

डॉ. शिंदे यांनी एककांचे मानकरी, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार आणि आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया ही पुस्तके लिहीली आहेत. क्रायोजेनिक्स अँड इट्स एप्लीकेशन्स या पुस्तकाचे सहसंपादन व सक्सेस गाईड फॉर एमएचसीईटी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. एककांचे मानकरी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए. भाग-१ या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. डॉ. शिंदे यांनी विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले आहे. अनेक दिवाळी अंकातून लिहीले आहे. ब्लॉगलेखनही ते नियमितपणे करीत असतात. त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारही लाभले आहेत. त्यामध्ये क्रायोजेनिक्स विषयातील संशोधनासाठी प्रा. एम्.सी. जोशी पुरस्काराचे सहमानकरी, वसुंधरा पर्यावरण संरक्षण व संशोधन संस्था, वारणानगर यांचा राज्यस्तरीय वसुंधरा निसर्ग मित्र पुरस्कार, एककांचे मानकरी या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा प्रतिष्ठेचा कृ. गो. सुर्यवंशी पुरस्कार तसेच मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेचा पुरस्कार यांचा समावेश आहे.

 

No comments:

Post a Comment