Thursday, 14 January 2021

वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांच्या काव्यसंग्रहांना

शिवाजी विद्यापीठाचा पंडित आवळीकर काव्य पुरस्कार

 

गणेश आत्माराम वसईकर

दिनकर मनवर


सुप्रिया आवारे



नामदेव कोळी


कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: कवी गणेश आत्माराम वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे आणि नामदेव कोळी यांच्या काव्यसंग्रहांना शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणारे पंडित आवळीकर काव्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि शिवाजी विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने सदर पुरस्कारांचे वितरण २८ जानेवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. ही माहिती मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाने मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक पंडित आवळीकर यांच्या नावे पंडित आवळीकर काव्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आवळीकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीमधून सदर पुरस्कार दोन वर्षातून एकदा देण्यात येणार आहे.

सन २०१४ ते २०२० या कालावधीतील एकूण चार काव्यसंग्रहांना एकाच वेळी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन २०१४-१५साठी गणेश आत्माराम वसईकर यांच्या मधल्या मध्ये या काव्यसंग्रहास, सन २०१६-१७ साठी दिनकर मनवर यांच्या अजूनही बरंच काही, सन २०१८-१९साठी सुप्रिया आवारे यांच्या न बांधल्या जाणाऱ्या घरात आणि सन २०२०साठी नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या कविता संग्रहांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर (बांदा) आणि प्रा. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment