शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांना निवेदनपत्रे सादर करणे सोयीचे होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेले विशेष पोर्टल |
कोल्हापूर, दि. २२ जानेवारी: विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय
कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्था यांचे विविध स्तरावरील प्रलंबित
प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ हा अभिनव उपक्रम घोषित केला आहे. या उपक्रमाची सुरवात येत्या २५ जानेवारी
रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठामध्ये ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ने होणार आहे. हा उपक्रम पूर्णतः यशस्वी करण्याचा निर्धार विद्यापीठ
प्रशासनाने केला असून त्यासाठी आवश्यक तयारी वेगात चालविली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भात असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित घटकांना संचालक, सहसंचालक,
विद्यापीठ, मंत्रालय व इतर कार्यालयांत यावे लागते.
विशेषतः त्यांच्या प्रश्नांसंदर्भात वारंवार विविध प्रशासकीय
कार्यालयात भेट देऊन काही कारणांमुळे प्रलंबित असल्याने अनेकांचा वेळ, ऊर्जा व निधी खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन उच्च व तंत्र विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत विभागीय
ठिकाणीच उपस्थित राहून सर्व संबंधित घटकांची भेट घेऊन प्रश्नांची
तत्काळ सोडवणूक करण्याचा मानस मंत्री
उदय सामंत यांनी व्यक्त केला. त्यानुसार विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय
कर्मचारी, शैक्षणिक संस्था यांच्या
अडी-अडचणी सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात बैठका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याची सुरूवात कोल्हापूर विभागापासून होत आहे.
त्यानुसार ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमाची सुरवात सोमवार,
दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब
सभागृहात होणार आहे.
निवेदने स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पोर्टल
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विविध समित्या गठित करून कामकाजास प्रारंभ केला आहे.
विशेषतः विविध घटकांच्या प्रश्नांची निर्गत समाधानकारक पद्धतीने करता यावी, यासाठी
विद्यापीठाने निवेदने स्वीकारण्यासाठी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ याच नावाने स्वतंत्र पोर्टल निर्माण केले आहे. याची लिंक विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या वेबसाईटच्या होमपेजवर ठळकपणाने
देण्यात आली आहे. त्यावर जाऊन नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले
प्रश्न मांडता येणार आहेत. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे केली
आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे १०८ व्यक्ती, संघटनांनी ऑनलाईन निवेदने सादर
केली आहेत. त्यांच्याशी अनुक्रमे मा. मंत्री महोदय संवाद साधतील. त्यानंतर ऐनवेळी निवेदने
घेऊन येणाऱ्या नागरिकांनाही मंत्री श्री. सामंत वेळ देतील.
“उच्च व तंत्र शिक्षणाशी संबंधित घटकांनी सहभाग नोंदवावा”
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात विभागाच्या प्रधान सचिवांसह राज्य सामाईक
प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त, तंत्रशिक्षण
संचालनालयाचे संचालक, उच्च शिक्षण संचालक, कला संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक, सह संचालक तसेच उच्च व तंत्र शिक्षण
विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या अभिनव उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य,
शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या अडचणी सोडवून
घ्याव्यात, असे आवाहन कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर यांनी केले आहे.
राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात तयारी वेगात
शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमासाठी कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने शासन तथा युजीसी यांनी जारी
केलेल्या निर्देशांचे पालन करीत मंत्री महोदयांसाठी खुला कक्ष उभा करण्याचे काम
गतीने सुरू आहे. सुरक्षित शारिरीक अंतर राखून मंत्री महोदयांना संबंधित व्यक्ती,
संस्था आदींचे प्रतिनिधी यांचे गाऱ्हाणे ऐकता येईल, त्यावर तोडगा काढता येईल, या
पद्धतीने या सभागृहात मंत्र्यांसह सचिव, आयुक्त तसेच अन्य सर्व अधिकारी, कर्मचारी
व अभ्यागत यांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या
वतीने प्रवेशद्वारात सॅनिटायझर, ताप तपासणी आदी सुविधा करण्यात येत आहेत. येणाऱ्या
प्रतिनिधींनी त्यास सहकार्य करावे, तसेच मास्क व सुरक्षित शारिरीक अंतर यांचे पालन
करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.
समस्या जागेवर सोडविण्यासाठी अभिनव उपक्रम: मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथून या कार्यक्रमाविषयी माहिती देताना म्हटले आहे की, असा उपक्रम याआधी कधीही झालेला नसून सर्वांच्या अडचणी त्या - त्या ठिकाणी तत्काळ सोडविण्यासाठी या अभिनव उपक्रमाची सुरूवात होत आहे. आपल्या समस्यांसाठी मुंबईला येत असताना प्रवास, निवासाची व्यवस्था आणि यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वांनी आपल्या प्रश्नांसाठी मंत्रालयात येण्यापेक्षा मंत्रालय आपल्या विभागात आले तर ते तत्काळ आपले प्रश्न सोडवू शकते, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
Nice activity
ReplyDeleteया अभूतपूर्व उपक्रमाबद्दल मा.उदयजी सामंत साहेब यांचे खूप खूप आभार. यासाठी प्रयत्न करणारे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब यांचेही अभिनंदन.
ReplyDelete