मंत्री उदय सामंत यांचा अभिनव उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य
कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज झालेल्या ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमांतर्गत उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांकडून ऑनलाईन व
ऑफलाईन स्वरुपात सुमारे १४२५ अर्जप्राप्त झाले होते. यापैकी ३९४ जणांना आपले
प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. त्यापैकी २७० प्रकरणे आज दिवसभरात निकाली काढण्यात
आली, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार
परिषदेत दिली.
कोविड-१९ साथीनंतर पुन्हा महाविद्यालये सुरू
करण्यासाठी येत्या आठवड्यात आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीमार्फत मा.
मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री.
सामंत यांनी यावेळी दिली.
विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य,
शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्था यांचे विविध स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी
लावण्यासाठी मंत्री सामंत यांनी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय
आपल्या विभागात’ हा अभिनव उपक्रम घोषित केला. या
उपक्रमाची सुरवात आज कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातून झाली. सकाळी साधारण साडेअकरापासून
ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे सुमारे सहा तास मंत्री श्री. सामंत यांनी
या सर्व घटकांच्या समस्या एक क्षणभरही मंच न सोडता मनापासून ऐकून घेतल्या आणि त्या
समस्यांवर योग्य तोडगा सुचविण्याचे काम केले. त्यांच्या अर्जांवर स्वहस्ताक्षरात
शेरे देऊन ते संबंधित यंत्रणांकडे पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ सुपूर्द केले.
त्यामुळे सभागृहातून बाहेर पडताना या सर्वच घटकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
ज्यांच्या समस्यांमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, त्यांनाही त्याविषयी खुलासेवार
समजावून सांगून दिलासा देण्याचे काम मंत्री श्री. सामंत यांनी केले.
या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमानंतर त्याविषयी माहिती
देण्याकरिता मंत्री श्री. सामंत यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेस संबोधित केले. ते
म्हणाले, या उपक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने वर्षभरातील एकूण ३६३५ प्रकरणांमधील
आजच्या २७०सह एकूण ३०३४ प्रकरणे मार्गी लावण्यात यश आले आहे. अनुकंपा तत्त्वावरील
प्रलंबित १७ पैकी सात प्रकरणे आज सकारात्मकपणे निकाली निघाली. त्यांना आज नियुक्ती
आदेश देण्यात आले. शासनमान्य ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या सकारात्मक
पद्धतीने सोडवित असताना ऑनलाईन वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या
योजनेचा प्रारंभ कोल्हापूर जिल्ह्यापासून करण्यात आला. त्यांना शासकीय ओळखपत्रे
देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभही येथून करण्यात आला.
सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक
विकासासाठीच्या योजनांविषयी सांगताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची तीन अभ्यास केंद्रे सीमाभागात सुरू करण्यास मान्यता
देण्यात आली आहे. आर.बी. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड, म्हैसाळ महाविद्यालय,
म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमदी, ता.
जत, जि. सांगली या तीन महाविद्यालयांच्या अभ्यास केंद्र मान्यतेची पत्रे संबंधित
प्राचार्यांना देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शिनोळी (ता. चंदगड) या सीमाभागात
बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठाकडून पाच कोटी रुपये देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या
संदर्भात शिवाजी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
यांच्या दरम्यान सामंजस्य करार होतो आहे, ही आनंदाची बाब आहे. शासकीय
तंत्रनिकेतनमध्ये ज्वेलरी अभ्यासक्रम हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास आज मंजुरी
देण्यात आली. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठात शिवभोजन थाळी आणि रुग्णवाहिका सेवा
सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
‘शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन
व्यवस्थेमुळे कामकाज सुरळित’
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा हा उपक्रम जाहीर
झाल्यानंतर नागरिकांची निवेदने दाखल करून घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष
पोर्टल निर्माण केले. या पोर्टलमुळे काम सुरळित व गतीने झाले. विद्यापीठाचे हे पोर्टल उपयुक्त सिद्ध झाले असून अन्य विभागातील कार्यक्रमांसाठीही
त्याचा वापर जरुर करू, असे कौतुकोद्गार मंत्री श्री. सामंत यांनी काढले.
विद्यापीठाच्या पोर्टलवर सुमारे ९०० निवेदने ऑनलाईन
सादर झाली. त्यामध्ये आलेली तक्रार अगर निवेदन संबंधित विभागाकडे पाठवून त्याविषयीची
सविस्तर माहिती घेतली गेली. नेमकी समस्या काय आहे, याचे विश्लेषण करणे त्यामुळे सोपे
गेले आणि नागरिकांना योग्य तो निर्णय देता येणे शक्य झाले. ऑनलाईन निवेदने सादर
केलेल्या प्रत्येक घटकास टोकन क्रमांक देण्यात आला. त्या क्रमानेच मंत्री महोदयांची
भेट त्यांना देण्यात आली. त्यामुळे वेळ वाचून प्रकरणांचा निपटारा गतीने करणे शक्य
झाले.
No comments:
Post a Comment