Monday, 18 January 2021

शिवाजी विद्यापीठ परिसरात १२३ पृष्ठवंशीय प्रजातींची नोंद

पक्ष्यांच्या ९० प्रजातींसह १३ सरिसृप, ११ उभयचर आणि ९ सस्तन प्रजातींचा समावेश

 

ब्राह्मणी बदक

स्वर्गीय नर्तक

क्रेस्टेड सर्पंटाईन ईगल (गरूड)

छोट्या कंठाचा चिखल्या

बलून फ्रॉग

कॉमन ट्रिंकेट स्नेक

प्राणिशास्त्र अधिविभागातील डॉ. एस.एम. गायकवाड यांचे संशोधन

कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: येथील शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात १२३ पृष्ठवंशीय पशुपक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीमअंतर्गत प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. एस.एम. गायकवाड यांना मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांतर्गत गेल्या वर्षभरात ही नोंदणी करण्यात आली आहे. या संशोधनाचा अहवाल विद्यापीठास सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार विद्यापीठ परिसराच्या जैववैविध्यतेला मोठी पुष्टी लाभली आहे.

Dr. S.M. Gaikwad

रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीमही शिवाजी विद्यापीठाने अधिविभागातील संशोधकांसाठी घोषित केलेली महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत स्टडिज ऑन डायव्हर्सिटी ऑफ व्हर्टिब्रेट्स इन द शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस, कोल्हापूर (महाराष्ट्र, इंडिया) हा प्रकल्प डॉ. एस. एम. गायकवाड यांना मंजूर करण्यात आला होता. त्या अंतर्गत डॉ. गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरात सुमारे वर्षभर सातत्यपूर्ण पाहणी करून विविध पृष्ठवंशीय प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. सरिसृप, उभयचर, पक्षी आणि सस्तन अशा चार प्रकारांत त्यांची विभागणी करून नोंदी घेण्यात आल्या.

सरिसृप वर्गाच्या एकूण १३ प्रजाती विद्यापीठात आढळून आल्या. त्यामध्ये सापांच्या एकूण सहा प्रजाती आढळल्या. त्यात तस्कर (कॉमन ट्रिंकेट स्नेक) या दुर्मिळ प्रजातीचा सापही परिसरात आढळला. त्याशिवाय सरडे व पालींच्या सहा प्रजाती व कासवाची एक प्रजात आढळून आली.

विद्यापीठ परिसरात पक्ष्यांच्या सुमारे ९० प्रजाती आढळल्या आहेत. त्यात थापट्या बदक, शुवई बदक, ब्राह्मणी बदक, छोट्या कंठाचा चिखल्या व स्वर्गीय नर्तक या पाच स्थलांतरित प्रजातींसह तीन स्थानिक स्थलांतरित प्रजाती आढळल्या. गरुडाच्या ही बोनेल्स ईगल आणि क्रेस्टेड सर्पंट ईगल या दोन प्रजाती आढळल्या असून अन्य शिकारी पक्ष्यांच्या आठ प्रजाती आढळल्या आहेत.

उभयचर प्राण्यांच्या ११ प्रजाती विद्यापीठ परिसरात आढळल्या. त्यात बेडकांच्या सुमारे दहा प्रजाती आढळल्या. बलून फ्रॉग या दुर्मिळ बेडकाची नोंदही या अंतर्गत करण्यात आली आहे.

सस्तन प्राण्यांच्या एकूण ९ प्रजाती नोंदविण्यात आल्या असून वटवाघळाच्या तीन प्रजातींसह साळिंदराच्या एका प्रजातीहची नोंदही करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या अनुषंगाने माहिती देताना संशोधक डॉ. एस.एम. गायकवाड म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा परिसर जैवविविधतेने किती समृद्ध आहे, याची प्रचिती या प्रकल्पाचे काम करताना आली. विद्यापीठाने प्रदान केलेल्या रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीममुळेच हे संशोधन करणे शक्य झाले. या संशोधनाचा सविस्तर अहवाल विद्यापीठास सादर करण्यात आला आहे. भविष्यात या संदर्भात अधिक व्यापक संशोधन करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

उपयुक्त संशोधनास बळ देणारी विद्यापीठाची योजना: कुलगुरू डॉ. शिर्के

रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीम ही विद्यापीठातील संशोधकांना उपयुक्त संशोधनासाठी प्रेरित करणारी योजना असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा जैवविविधतेने समृद्ध आहे, हे सर्वश्रुत, सर्वज्ञात आहेच. मात्र, तो किती समृद्ध आहे, यावर डॉ. गायकवाड यांचे संशोधन नेमकेपणाने प्रकाशझोत टाकते, ही बाब महत्त्वाची आहे. भविष्यातही अशा उपयुक्त संशोधनांना सदर स्कीमअंतर्गत विद्यापीठ बळ देत राहील, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी या संशोधनासंदर्भात बोलताना व्यक्त केली.

 

9 comments: